ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्‍या देवाला काय अपेक्षित आहे?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

बालवयातच साधनेची तीव्र तळमळ असणारी आणि साधनेतील प्रगल्भता दर्शवणारी पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या एका भेटीत कु. प्रार्थना पाठक हिच्या साधनेच्या तळमळीविषयी जाणवलेली आणि तिची साधनेतील प्रगल्भता दर्शवणारी काही अमूल्य सूत्रे येथे दिली आहेत. ती सर्वच साधकांनी अभ्यासण्यासारखी आहेत.

कु. प्रार्थना पाठक

१. कु. प्रार्थना हिची साधनेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले अपरंपार कौतुक !

परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रार्थनाची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे, त्यामुळे ती लवकर संत होईल ना ! (प्रार्थनाला उद्देशून) नंतर तू संतांच्या रांगेत बसायचेस हो !

सौ. स्वाती शिंदे : कु. प्रार्थनाचे वैशिष्ट्य आहे, ‘ती आपले सनातनचे सर्व ग्रंथ अभ्यासपूर्ण वाचते आणि त्यांतून शिकायला मिळालेली सूत्रे ती वहीत लिहून ठेवते. ती तिला शिकायला मिळालेली सूत्रे इतर साधकांनाही चांगल्या प्रकारे समजावून सांगते. प्रार्थना अपालाला (कु. अपाला औंधकर हिला (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)) दैवी बालकांचा सत्संग घेण्यासाठी साहाय्यही करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सनातनचे सर्व ग्रंथ वाचले आहेत, असे किती साधक आहेत ? ही एकटीच असेल ना ! आणि तेही एवढ्या लहान वयात ! ती दुसर्‍यांना सांगण्यासाठी त्यातील टीपणेही लिहून ठेवते. यावरून ‘ती लवकरच संत होईल, हे योग्य आहे ना ?’

२. स्वामी विवेकानंद यांच्या गोष्टीतून ईश्वरप्राप्तीची तळमळ शिकणारी कु. प्रार्थना !

कु. प्रार्थना पाठक : परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), ‘ईश्वरप्राप्तीची तळमळ कशी असायला पाहिजे ?’, हे मला श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील एका प्रसंगातून शिकायला मिळाले.

२ अ. श्री रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्रला (स्वामी विवेकानंद यांना) ‘तुला सिद्धी हव्यात का ?’, असे विचारून त्यायोगे तू महान कार्य करू शकशील’, असे सांगणे : श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यामधील हा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद यांचे आधीचे नाव ‘नरेंद्र’ होते. एके दिवशी दक्षिणेश्वरला पंचवटीमध्ये नरेंद्र आणि श्री रामकृष्ण परमहंस बसले होते. तेव्हा श्री रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्रला विचारले, ‘‘मी कठोर तपश्चर्या करत असतांना मला काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. त्या तुला पाहिजेत का ? त्यामुळे तू महान कार्य करू शकशील. देवी कालीमातेने मला हे तुला विचारून घेण्यास सांगितले आहे.’’

२ आ. ‘ज्या सिद्धींच्या प्राप्तीने ईश्वरप्राप्ती होणार नाही, त्या सिद्धी मला नकोत’, असे श्री रामकृष्ण परमहंसांना सांगणारे स्वामी विवेकानंद ! : तेव्हा नरेंद्र त्वरित म्हणाले, ‘‘या ज्या सिद्धी आहेत, त्या मला ईश्वरदर्शन किंवा ईश्वरप्राप्ती यांसाठी आवश्यक किंवा उपयोगी आहेत का ?’’ तेव्हा श्री रामकृष्ण परमहंस म्हणाले, ‘‘नाही. त्या तुला ईश्वरदर्शन किंवा ईश्वरप्राप्ती यांसाठी उपयोगी नाहीत; परंतु त्यामुळे तू महान कार्य करू शकशील.’’ तेव्हा नरेंद्र म्हणाले, ‘‘मग मला त्या सिद्धी नकोत. जोपर्यंत मला ईश्वरदर्शन किंवा ईश्वरप्राप्ती होत नाही, तोपर्यंत मी सिद्धींचा विचारच करणार नाही. मला ईश्वरप्राप्ती झाल्यानंतरच मी त्याविषयी विचार करीन.’’

नरेंद्रचे हे उत्तर ऐकून श्री रामकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले.

या प्रसंगातून मला ‘ईश्वरप्राप्तीची तळमळ कशी असली पाहिजे ?’, हे शिकायला मिळाले. परम पूज्य, आपणच माझ्यामध्ये ती तळमळ निर्माण करावी आणि माझ्याकडून तसे प्रयत्न करवून घ्यावेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘आपणच माझ्यात तळमळ निर्माण करावी’, अशी केवळ प्रार्थना आहे, असे नाही, तर ‘त्यासाठी मी प्रयत्न करते’, हे महत्त्वाचे आहे. फारच सुंदर ! प्रार्थना किती वाचते आणि टीपणे (नोट्स) काढते, ते ऐकले होते. आज त्याचे हे उदाहरण मिळाले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना दिलेल्या ध्येयांची पूर्ण जाणीव असणारी कु. प्रार्थना !

कु. प्रार्थना पाठक : परम पूज्य, आपण आम्हा साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना अशी २ ध्येये दिली आहेत. व्यष्टी साधनेचे ध्येय आहे ‘ईश्वरप्राप्ती’ आणि समष्टीचे साधनेचे ध्येय आहे ‘हिंदु राष्ट्र’ !


महिलांनी गर्भधारणा झाल्यापासूनच नामजपादी उपाय केल्यास जन्माला आलेल्या बाळाला आध्यात्मिक त्रास अल्प असल्याचे किंवा नसल्याचे लक्षात येणे

पू. तनुजा ठाकूर

१. आध्यात्मिक त्रासामुळे साधना सोडून देणार्‍या साधकांना गर्भावस्थेपासूनच आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात येणे

‘मार्च १९९७ पासून मला सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार धर्मप्रसार करण्याची संधी मिळाली. ईश्वराच्या कृपेने माझी सूक्ष्म ज्ञानेंद्रिये जागृत असतात. त्यामुळे मला धर्मप्रसाराची परिणामकारक सेवा करण्यात पुष्कळ साहाय्य होते. धर्मप्रसार करतांना माझ्या लक्षात आले, ‘काही साधकांना साधना करण्याची इच्छा असते आणि त्यांची आध्यात्मिक पातळीही ४० टक्क्यांहून अधिक असते, तरी ते काही वेळा अधिक काळ व्यष्टी अन् समष्टी साधना करू शकत नाहीत.’ बाल्यावस्थेपासूनच माझी वृत्ती समस्येच्या मुळापर्यंत जाऊन तिचे निराकरण करण्याची आहे; म्हणून मी साधकांकडून साधना करवून घेण्यासाठी त्यांच्या समस्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना त्यांच्या त्रासानुरूप साधना सांगण्याचाही प्रयत्न करते. या सूत्राचा अभ्यास करतांना माझ्या लक्षात आले, ‘आध्यात्मिक त्रासामुळे जे साधक साधना सोडून देतात, त्यांना गर्भावस्थेपासूनच आध्यात्मिक त्रास असतात.’

२. ‘हिंदु राष्ट्र्र चालवण्यासाठी सिद्ध होणार्‍या पिढीतील साधकांना जन्मतः वाईट शक्तींचा त्रास नसल्यास ते धर्मकार्य वेगाने आणि परिणामकारक करू शकतील’, असे वाटणे

पूर्वी ‘उत्तर भारतातच ही समस्या आहे’, असे मला वाटायचे. वर्ष २०१० पासून मी ‘वैदिक उपासना पीठ’ या संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रसार करू लागले आणि याच काळात मी देश-विदेशांत भ्रमण करून धर्मप्रसार केला. तेव्हा ही समस्या संपूर्ण जगभरात असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी त्यावर उपाययोजना शोधू लागले. हिंदु राष्ट्र्र चालवण्यासाठी सिद्ध होणार्‍या नव्या पिढीतील साधकांना जन्मतः वाईट शक्तींचा त्रास अल्प प्रमाणात असल्यास किंवा नसल्यास ते धर्मकार्य अधिक जलद गतीने आणि परिणामकारक करू शकतील.

३. ‘दैवी बालकाचा जन्म व्हावा’, यासाठी ‘गर्भवती स्त्री आणि गर्भ’ यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर सांगितलेल्या उपायांचा चांगला परिणाम झाल्याचे जाणवणे

ऑगस्ट २००९ पासून मी माझ्या वडिलांच्या मूळ गावी प्रयोग करायला आरंभ केला. ‘एखादी साधिका गर्भवती आहे’, असे मला समजल्यावर मी तिच्या गर्भस्थ बाळाभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी तिला स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर विविध प्रकारचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगू लागले. ‘या उपायांचा गर्भवती स्त्री आणि गर्भ यांच्यावर काय परिणाम होतो ?’, याचा मी अभ्यास करू लागले. ‘बाळाच्या जन्मानंतर त्या उपायांचा त्याच्यावर किती प्रभाव पडला ?’, याचेही मी निरीक्षण करू लागले. ‘गर्भवती मातांना नामजपादी उपाय सांगितल्यानंतर दैवी बालकांचा जन्म होऊ लागला’, असे माझ्या लक्षात आले. ही मोठी आनंदाची गोष्ट होती. ज्या गर्भवती महिलांनी मी सांगितलेल्या गोष्टींचे तंतोतंत पालन केले, त्यांच्या बालकांना वाईट शक्तींचा त्रास मुळीच नव्हता. ज्या गर्भवती महिलांनी मी सांगितलेल्या गोष्टींचे काही प्रमाणात पालन केले, त्यांच्या मुलांना जन्मतः काही प्रमाणात त्रास असल्याचे आढळून आले. या २ वर्षांत या संदर्भात मला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळू लागला. तेव्हा ही गोष्ट मी सार्वजनिक ठिकाणीही सांगण्यास आरंभ केला.

‘आज समाजातील महिलांना त्यांच्या पोटी सात्त्विक मुले जन्माला येण्यासाठी कसे आचरण करायला हवे ?’, हे शिकवण्याची आवश्यकता आहे. यातून ‘हिंदु धर्माचा र्‍हास किती अधिक प्रमाणात झाला आहे ?’, हे लक्षात येते.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासना पीठ. (१२.११.२०२१)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक