देवस्थानच्या भूमी हडप झाल्याच्या तक्रारींची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी करण्याचा विचार ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

अंबेजोगाई देवस्थानच्या भूमी अपहाराच्या तक्रारीचे प्रकरण !

शंभूराज देसाई

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – बोगस खातेदार उभे करून देवस्थानच्या भूमी हडप करण्यात आलेल्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. देवस्थानच्या भूमी काहींनी स्वत:च्या नावावर करून घेतल्या आहेत. यामागील सत्य जनतेपुढे आणावे लागेल. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम चर्चा प्रस्तावावर उत्तर देतांना त्यांनी वरील माहिती दिली.

अपर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करणार ! – अब्दुल सत्तार, राज्य महसूलमंत्री

मुंबई, २८ सप्टेंबर (वार्ता.) – खोटी कागदपत्रे सादर करून अंबेजोगाई देवस्थानची भूमी लाटल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीडच्या अपर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती राज्य महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. विधीमंडळात अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देतांना सत्तार यांनी वरील माहिती दिली. वक्फ मंडळाच्या हडप करण्यात आलेल्या भूमींविषयीही महसूलविभागाद्वारे चौकशी करण्यात येईल, असे या वेळी सत्तार यांनी सांगितले.