पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांची लक्षवेधी सूचना

मुंबई – महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती कायदा’ संमत झाला; मात्र त्यानंतर त्याची काटेकोर कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे, तसेच पीडितेला तक्रार नोंदवतांना दिली जाणारी वागणूक आधी पालटायला हवी, अशी लक्षवेधी सूचना नमिता मुंदडा यांनी २४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. शक्ती कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी एका संयुक्त समितीचे गठन करण्यात आले होते. त्यानंतर सुधारणांसह यासंबंधीचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले गेले आणि २३ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्याने या कायद्याला संमती दिली.

या वेळी नमिता मुंदडा म्हणाल्या, ‘‘शक्ती कायदा आल्यानंतर त्याची काटेकोर कार्यवाही करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ कायदा आणून उपयोग होणार नाही. या शक्ती कायद्याचा लाभ आणि संरक्षण होणेही तितकेच आवश्यक आहे. ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. अशा परिस्थितीत संबंधित पीडितेला आधार देणारी पोलीस प्रशासन आणि यंत्रणा असावी, यासमवेतच संबंधित पीडितेच्या घरी जाऊन तिच्या सर्व वैद्यकिय चाचण्या पार पाडाव्यात. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.’’