मुंबई, २६ डिसेंबर (वार्ता.) – पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील ‘मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली’ या आस्थापनेमुळे होणार्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असा तारांकित प्रश्न आमदार महेश बालदी यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात उत्तर दिले की, पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील ‘मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली’, या आस्थापनेमुळे होणार्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची बाब खरी असून रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार सदर परिसरातील श्वसनविकार, नेत्ररोग, त्वचारोग अशा रोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे; तथापि, परिसरातील कोणत्या उद्योगांमुळे सदर रुग्णवाढ झाली याची निश्चितता नमूद केली नाही किंवा याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात उल्लेख नाही.
नवी देहली येथील हरित लवाद यांच्या आदेशानुसार ‘मे. रॉयल कार्बन ब्लॅक प्रा. लि. वानिवली’ या उद्योगास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि निरी, नागपूर यांनी १२ ऑगस्ट २०२१ या दिवशी भेट देऊन संपूर्ण परिसरातील हवेची गुणवत्ता पडताळली होती. त्यानुसार सदर परिसरातील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानकेनुसार विहित मर्यादेत आढळून आली.