सनातन परंपरा आणि अब्राह्मिक पंथ यांत मोठे अंतर असून त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ या परिसंवादात ‘सनातन परंपरा विरुद्ध अब्राह्मिक (टीप) पंथ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !

टीप : अब्राह्मिक म्हणजे ब्रह्म न मानणारे अर्थात् इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू पंथ !
श्री. रमेश शिंदे

जयपूर (राजस्थान) – समधर्मसमभाव म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांना भारतावर राज्य करायचे होते, तर सनातन धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) असे म्हणतो. ‘धर्मयुद्ध’ आणि ‘जिहाद’ या शब्दांचा अर्थ एकच आहे’, असे सांगितले जाते; परंतु महाभारतात भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या प्रारंभीच ‘हे युद्ध व्यक्ती, पंथ यांच्याविरुद्ध नाही, तर अधर्माच्या विरुद्ध आहे’, हे स्पष्ट केले होते. दुसरीकडे मुसलमान आणि ख्रिस्ती यांना संपूर्ण विश्वात त्यांचे वर्चस्व स्थापन करायचे आहे. ‘धर्मयुद्ध’ हे लूट करण्यासाठी नाही, तर लोकांच्या कल्याणासाठी झाले, तर याउलट ‘जिहाद’ करतांना प्रत्येक वेळी लोकांवर पर्यायाने हिंदूंवर अत्याचारच झाले आहेत. त्यामुळे धर्मयुद्ध आणि जिहाद यांची तुलना होऊ शकत नाही. हिंदूला ‘तू धर्मांतर केले, तर जन्नत (इस्लामी विचारसरणीनुसार स्वर्ग) अथवा हेवन (ख्रिस्ती विचारसरणीनुसार स्वर्ग) मिळेल’, असे सांगितले जाते; पण हिंदु धर्म कर्माच्या आधारावर व्यक्तीची मृत्यूनंतरची गती सांगतो. त्यामुळे सनातन परंपरा आणि अब्राह्मिक पंथ यांत मोठे अंतर आहे. त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही, तसेच ते एकाच गटात मोडत नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स २०२१’ या परिसंवादात २४ डिसेंबर २०२१ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात ते बोलत होते.

जयपूर येथील श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन परंपरा विरुद्ध अब्राह्मिक (ब्रह्म न मानणारे अर्थात् इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू) पंथ’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. या चर्चासत्रात उदयपूर (राजस्थान) येथील इस्लामचे अभ्यासक प्रा. महावीर प्र. जैन आणि कर्णावती (गुजरात) येथील श्री. नीरज दवे हेही सहभागी झाले होते. ‘आतंकवादाचा निषेध कसा करावा ?’, या विषयावरही मान्यवरांनी त्यांची मते व्यक्त केली. श्री. निधीश गोयल यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सध्या ‘आम्ही हिंदूंच्या विरोधात नाही, हिंदुत्वाच्या विरोधात आहोत’, असे म्हटले जाते. हे नवे षड्यंत्र आहे. प्रत्यक्ष हिंसा करणारा आणि वैचारिक आतंकवाद यांतील भेद समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत हिंदूंनी सनातन धर्माला समजून त्यासाठी कार्य करणे महत्त्वाचे आहे.

जगभरातील अनेक लोक राक्षसी प्रवृत्तीच्या पंथांना कंटाळले आहेत ! – नीरज दवे

सनातन धर्म सर्वांना सामावून घेतो. अब्राह्मिक पंथांची विचारसरणी तशी नाही. हिंदु धर्म मनुष्याला वैचारिक, व्यवहार, आचार, आस्तिकता-नास्तिकता आदी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देतो. त्यामुळेच सनातन हिंदु धर्म लाखो वर्षांपासून टिकून आहे. याउलट अब्राह्मिक पंथ नेहमी स्वत:चे नियम, जीवनपद्धती दुसर्‍यांवर लादून तेच चालू ठेवायचे कार्य करतात. नालंदा विश्वविद्यालयातील ४ लाख ग्रंथ जाळण्याचे विचार असलेल्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे. ते इतरांसमवेत एकत्र राहू शकत नाहीत. या प्रवृत्तीला कंटाळून अमेरिका, युरोप आणि पाकिस्तान येथील अनेक लोक ‘अथेइस्ट’ (निरीश्वरवादी) बनले आहेत.

असत्य अधिक काळ टिकू शकत नाही ! – प्रा. महावीर प्र. जैन, इस्लामचे अभ्यासक

मोहनदास गांधी यांनी सर्व धर्म समान सांगून भ्रम पसरवला. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) ही विचारसरणी असलेले आणि सर्व जगावर अधिपत्य गाजवण्याची मनोवृत्ती असणारे यांना समान कसे म्हणता येईल ? प्राचीन असूनही आजच्या काळातही अनुकरणीय असल्याने हिंदु धर्माला ‘सनातन’ असे म्हटले जाते. शीख, जैन आणि बौद्ध यांना सनातन हिंदु धर्मापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे; परंतु या पंथांतील अनेक वचने आणि वेदांतील वचने यांत समानता आढळते. यामुळे ते वेगळे नाही, तर सनातन धर्माचेच एक अंग आहेत. असत्य अधिक काळ टिकू शकत नाही, शेवटी सत्याचाच विजय होतो.

‘अब्राह्मिक पंथ’ या शब्दाचा अर्थ

महर्षि दयानंद स्वरस्वती यांनी सांगितलेली व्याख्या : सनातन हिंदु धर्म ‘अहं ब्रह्मास्मि ।’ हे सांगतो, म्हणजे ‘जो निर्गुण (कोणतेही दोष नसलेला) निराकार आहे, तो ब्रह्म माझ्यातच वास करतो’, असे सांगून व्यक्तीला स्वत:तील मूळ ईश्वरी तत्त्वाची जाणीव करून देतो. याउलट ख्रिस्ती आणि इस्लाम पंथ यांचे प्रेषित स्वतःला ईर्ष्यालू (ईर्ष्या करणारे अर्थात् इंग्रजीमध्ये ‘जेलस गॉड’) म्हणतात. ‘सनातन धर्म ईर्ष्या दूर केली, तर ब्रह्म मिळतो’, असे सांगतो. यावरून जे ब्रह्माला नाकारतात, ते अब्राह्मिक पंथीय आणि अब्राह्म म्हणजे जो ब्रह्माला नाकारतो तो !