मुंबई, २४ डिसेंबर (वार्ता.) – दोन वर्षांपूर्वी जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, त्यांना ५० सहस्र रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे सरकारने विधानसभेत घोषित केले होते; मात्र अशी घोषणा होऊनही शेतकर्यांना ५० सहस्र रुपयांचा लाभ झालेला नाही, असे मत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केले. ते सभागृहात प्रश्नोत्तरांच्या घंट्यामध्ये बोलत होते.
श्री. आबीटकर म्हणाले, ‘‘एकीकडे आपण आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना साहाय्य करतो; मात्र प्रामाणिकपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना आपण नेमके काय देतो ?’’ यावर उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘५० सहस्र रुपयांच्या अनुदानाची घोषणा झाली आणि लगेच कोरोना महामारी चालू झाली. त्यामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीत जवळपास १ ते दीड लाख कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे आपण हे साहाय्य देऊ शकलो नाही. असे असले तरी जे नियमित कर्ज भरतात त्यांना परत पीककर्ज घेण्यासाठी ० ते ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याज पूर्णत: माफ करण्याचे धोरण सरकारने घोषित केले. काही अधिकोष त्याही पुढे जाऊन ४ आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हा लाभ देतात. त्यामुळे पुरवणी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून आम्ही नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना हे अनुदान देऊ.’’