मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे ! – मानाच्या गणपतींकडून सकारात्मक भूमिका

पुणे येथील संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचा वाद

पुणे – आम्ही सगळे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असलो तरी उत्तरदायी पुणेकर नागरिक आहोत. १२५ वर्षांहून अधिक पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून, समाजप्रबोधन आणि समाजहिताला प्राधान्य दिले आहे. संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीविषयी आमचा कधीही विरोध नव्हता. कोरोनाच्या काळात साधेपणाने उत्सव साजरा केला. प्रशासनाला सहकार्य केले. अशी परंपरा असलेल्या गणेशोत्सवामुळे या वेळी संभाजी पुलावरील पुलाच्या कामास आम्ही विरोध करत नाही. मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे, असे शहरातील मानाच्या ५ गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी स्पष्ट केले आहे. संभाजी पूल (लकडी पूल) येथील मेट्रोच्या मार्गिकेला शहरातील काही गणेशोत्सव मंडळांनी विरोध केल्याने गेल्या ३ मासांपासून हे काम ठप्प होते; पण प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.