सातारा, १७ डिसेंबर (वार्ता.) – कोरोना संसर्गाने देशात कहर केला आहे. ‘ओमिक्रॉन’ नावाच्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरीएंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढतात. अशा वेळी २५ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात मेजवान्या होतात. यांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे शासनाला परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्त ३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् मेजवान्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या वेळी भाजपचे नगरसेवक विजयकुमार काटवटे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कदम, सरचिटणीस मनीष महाडवाले, युवा नेते गणेश घोरपडे, नगरसेवक विजयकुमार काटवटे, भाजपचे जिल्हा सचिव सिद्धार्थ गुजले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, राजेंद्र सांभारे, सौ. राजेश्वरी सांभारे आदी उपस्थित होते.