…चौथा स्तंभ डळमळला !

संपादकीय

शोध पत्रकारितेद्वारे अपकृत्ये उघड करुन देशाचे रक्षण करणे, हे पत्रकारांचे राष्ट्रकर्तव्य !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लोकशाहीचे कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था आणि पत्रकारिता हे ४ महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या ४ स्तंभांपैकी चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारितेला उर्वरित ३ आधारस्तंभांवर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करावे लागते; पण त्याच पत्रकारितेविषयी भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केलेले विधान देशासाठी धक्कादायक आहे. १५ डिसेंबर या दिवशी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी बोलतांना ते म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम्) नामशेष होत आहे आणि ‘आजूबाजूला सर्वकाही आलबेल आहे’, असेच दाखवले जात आहे. एखाद-दुसरा अपवाद सोडता त्या क्षमतेची शोध पत्रकारिता पहायला मिळत नाही.’’ एन्.व्ही. रमणा यांनी त्यांच्या तारुण्यात पत्रकार म्हणून प्रथम नोकरी केली असल्याचेही या वेळी सांगितले. भारताच्या सरन्यायाधीश पदावरील अतीमहनीय अशा व्यक्तीने पत्रकारितेविषयी मांडलेल्या मताचा निश्चितच गांभीर्याने विचार व्हायला हवा. शोध पत्रकारिता म्हणजे काय ? तर विविध अयोग्य, अनुचित, तसेच अवैध घटना किंवा घोटाळे उघडकीस आणण्यासाठी त्यासंदर्भात भक्कम पुरावे मिळवणे, त्यासंदर्भात सखोल संशोधन करणे होय. या माध्यमांतून संबंधितांची गैरकृत्ये उघडकीस येतात, नव्हे नव्हे चव्हाट्यावर येतात. मग कालांतराने त्यांच्यावर कारवाई होते किंवा त्यांना कठोर शिक्षा केली जाते. त्यातून आपसूकच अपकृत्यांना काही प्रमाणात का होईना, आळा बसतो. त्यामुळे संपूर्ण देशात शोध पत्रकारिता करणारे आणि तशी वृत्ते उघड करणारे यांच्याप्रती दरारा निर्माण झालेला असतो. गुन्हेगार, भ्रष्टाचारकर्ते यांनाही या शोध पत्रकारितेचा एकप्रकारे वचक बसतो. हे सर्व पहाता पत्रकारांनी स्वतःहून शोध पत्रकारिता अंगीकारून अपकृत्यांचा सातत्याने शोध घ्यायला हवा आणि वेळोवेळी ती प्रकाशझोतात आणून देशाचे संभाव्य दुष्परिणामांपासून रक्षण करायला हवे. हे पत्रकारितेचे राष्ट्रकर्तव्यच आहे. अर्थात् यातून कुणाची निंदा-नालस्ती होऊ नये, याचेही भान पत्रकारांनी ठेवायला हवे.

भारतीय पत्रकारितेची सद्यःस्थिती !

वर्ष १९७० च्या काळात भारतामध्ये शोध पत्रकारितेचा प्रारंभ झाला. त्यानंतर मध्यप्रदेशातील आदिवासी भागात होणारी स्त्रियांची विक्री, भागलपूर (जिल्हा बिहार) येथील कारागृहात बंदीवानांच्या डोळ्यांत आम्ल (ॲसिड) घालण्याचा घडलेला धक्कादायक प्रकार, ‘क्युओ’ आस्थापनाशी भारत सरकारने केलेला तेल खरेदीचा व्यवहार, महाराष्ट्रातील उच्च पदस्थांनी सिमेंटच्या कोट्याच्या बदल्यात मिळवलेल्या देणग्या, ‘बोफोर्स’ खरेदी प्रकरणात उच्चपदस्थांनी घेतलेली लाच अशी अनेक प्रकरणे, घोटाळे विविध पत्रकारांनी शोध पत्रकारितेचा अवलंब करून उघडकीस आणले. सध्याच्या काळात पाहिल्यास ‘कॉमनवेल्थ’ खेळामध्ये झालेला भ्रष्टाचार, तसेच ‘आदर्श’ सोसायटीतील घोटाळ्याचे प्रकरण हेही शोध पत्रकारितेद्वारेच उघड करण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून काही घटनांमध्ये संबंधितांना न्याय मिळाला, तर काही घटनांमध्ये व्यापक चर्चा झाल्या. वादविवाद झाले, तसेच काहींमध्ये संबंधितांवर तीव्र स्वरूपात टीकाटिपणीही करण्यात आली. मध्यंतरी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर सामाजिक माध्यमांतून भारताच्या खेळाडूंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका करण्यात आली. यात गोलंदाज महंमद शमी हे मुसलमान असल्याने त्यांनाही ‘ट्रोल’ करण्यात येत असल्याचा आरोप काही धर्मनिरपेक्षतावाद्यांनी केला होता; मात्र ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या शोध पत्रकारितेनंतर शमी यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून करण्यात आलेली टीका पाकिस्तानी लोकांनीच जाणीवपूर्वक केल्याचे उघड झाले. अशी शोध पत्रकारिता सर्वांनीच केल्यास खोट्याचे बिंग उघडकीस येईल. ही झाली चांगली बाजू; पण शोध पत्रकारितेच्या काळ्या आणि वाईट बाजूकडेही दुर्लक्षून चालणार नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीलोलूप पत्रकार आशिष खेतान याने गुजरात दंगलीतील आरोपी बाबू बजरंगी यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. यामुळे बजरंगी यांना शिक्षा झाली. यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे खेतान यांनी चौफेर उधळलेल्या वारूप्रमाणे अनेक प्रकरणांत द्वेषापोटी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात, तसेच देशद्रोह्यांच्या साहाय्यासाठी पत्रकारिता केली. प्रसिद्धीपोटी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्याचाही प्रयत्न केला. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शोध पत्रकारितेचे माध्यम वापरून सर्वांना त्रास देणारे असे पत्रकार काय कामाचे ? या प्रकाराला ‘शोध’ नव्हे, तर ‘द्वेषपूर्ण’ पत्रकारिता’ असेच खेदाने म्हणावे लागेल. देशासाठी लाभदायक ठरणार्‍या ‘शोध’ पत्रकारितेची ‘द्वेषपूर्ण’ पत्रकारिता होऊ न देणे, हे पत्रकारांचे दायित्व आहे.

पुनश्च हरिओम् !

गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये ‘इंटरनेट’मुळे पत्रकारितेला सर्वसमावेशक, तसेच सुनियंत्रित स्वरूप प्राप्त होत आहे. पत्रकारितेच्या कक्षा निश्चितच विस्तारल्या आहेत; परंतु याचा लाभ काही प्रमाणात, तर अपलाभ अधिक प्रमाणात उठवला जातो. या सर्वांना कारणीभूत आहे तो म्हणजे प्रसिद्धी आणि पैसे यांच्यासाठी असलेला हपापलेपणा ! यातूनच नैतिकता आणि चारित्र्य घसरत आहे. दुटप्पीपणा आणि द्वेष यांच्या चष्म्यातून पाहिले जात असल्याने डोळसपणा अन् संवेदनशीलता नष्ट होत आहे. माणुसकी आणि निःपक्षपातीपणा यांचे मूल्य न्यून होत आहे. आधीच्या काळात असणारी उरलीसुरली पारदर्शकताही संपत चालली आहे. यातूनच लक्षात येते की, पत्रकारितेची मूल्ये पालटत चालली आहेत. पत्रकार बटीक होत आहेत, हे पत्रकारितेचे अपयशच म्हणावे लागेल. ‘शोध पत्रकारिता’ म्हणजे देशाचा विकास आणि संरक्षण यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी तळपती लेखणीच आहे. भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !