गाळ काढण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
सावंतवाडी – कोकणातील नदीकाठच्या शहरांत सातत्याने निर्माण होणार्या पूरस्थितीविषयी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत नद्यांतील गाळ काढण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिली आहे.
तालुक्यातील बांदा, माडखोल, तसेच दोडामार्ग तालुक्यात प्रतिवर्षी निर्माण होणार्या पूरस्थितीवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठक झाली. या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यंमत्री प्रवीण भोसले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करा – अजित पवार https://t.co/r8iQ04HSpl
— LoksattaLive (@LoksattaLive) December 15, 2021
कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून अनेक ठिकाणी गाळ साठून बेटे निर्माण झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता घटली आहे. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असते. गेल्या काही वर्षांत कोकणात सातत्याने अतीवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. सातत्याने होणारी ही हानी टाळण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर करावे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी जलसंपदा विभागाने तातडीने वितरित करावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २६ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
कुडाळ – उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार २६ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात उपमुख्यमंत्री पवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून कोरोना, अतीवृष्टी, तसेच तौक्ते वादळ यांमुळे झालेल्या हानीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.