सातारा जिल्ह्यातील ११ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे !

सर्व आगारांतून धावल्या २१५ बस

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १५ डिसेंबर (वार्ता.) – एस्.टी. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दीड मासापासून या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. काही आगारातून बससेवा चालू झाली असली, तरी काही कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तसेच काही कामगारांच्या अनुपस्थितीमुळे नियोजनामध्ये अडचणी येत होत्या. १३ डिसेंबरपर्यंत जे कर्मचारी कामावर उपस्थित रहातील, त्यांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्याप्रमाणे सातारा विभागातील ११ कर्मचारी कामावर उपस्थित झाल्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे १३ डिसेंबर या दिवशी जिल्ह्यातील विविध मार्गांवर २१५ बस धावल्या. यामध्ये ५६ खासगी शिवशाही, तर १५९ साध्या बसचा समावेश आहे.

सातारा विभागात १३ डिसेंबरपर्यंत १ सहस्र २० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. विभागातील ११ आगारांतून बस सेवा पूर्ववत् होत असून बसस्थानकातील गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.