‘क्रांतीकारकांच्या उत्कट राष्ट्रभक्तीचे आपण वारसदार आहोत’, याचा सार्थ अभिमान हवा !

आपल्या देशात अहिंसावादाचा अतिरेक झाला. परिणामी शस्त्राविषयी घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हा एककलमी कार्यक्रम ठरला. सशस्त्र क्रांतीकारकांविषयी अभिमान बाळगण्याची मानसिकता राहिली नाही. त्यांना खुनी, अमानुष ठरवून त्यांची निर्भत्सना करण्यात धन्यता मानणारा शिक्षित वर्ग पुढे आला. देशातील क्षात्रवृत्ती, क्षात्रतेज काळवंडून गेले. आज पोलीस दलातील आणि सैन्यदलातील विरांना शौर्य गाजवता येणार नाही, अशी अवस्था अन् व्यवस्था निर्माण झाली. आतंकवाद्यांना कंठस्नान घालणार्‍यांना, गुंड आणि गुन्हेगार यांच्यावर वचक बसवणार्‍यांना दोषी ठरवून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. शत्रूसाठी बिर्याणीची ताटे सजवण्याची पाळी शौर्यपदकाच्या मानकर्‍यांवर आली.

श्री. दुर्गेश परुळकर

१. राजकारण्यांकडून छत्रपती शिवरायांना ‘निधर्मीवादी’ ठरवण्याचा प्रयत्न

आज पाठ्यपुस्तकातून परकीय आक्रमकांना, अत्याचारी सत्ताधिशांना सहिष्णु, न्यायी, मानवतावादी म्हणून गौरवण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांप्रमाणे शौर्य गाजवता येत नाही. त्यांच्या रणनीतीला, त्यांच्या वीरत्वाला उजळमाथ्याने, अभिमानाने स्वीकारण्यासाठी लागणारे मानसिक आणि वैचारिक सामर्थ्य नाही अन् शिवरायांच्या राजनीतीवर टीकाही करता येत नाही; म्हणून आजच्या राजकारण्यांनी छत्रपती शिवरायांनाच ‘निधर्मीवादी’ ठरवून त्यांची इतिहासाला ज्ञात नसलेली प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न आता चालू केला आहे.

२. गेल्या ६६ वर्षांत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षणाचे धडे दिले न जाणे

स्वातंत्र्यपूर्व काळातील युवकांसमोर वीर सावरकर यांनी देश स्वातंत्र्याचे ध्येय ठेवले. त्यासाठी उत्कट राष्ट्रभक्तीचे बाळकडू पाजले. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या नंतरच्या पिढीतील सशस्त्र क्रांतीकारकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन दिले. तोच कित्ता पुढे सावरकर बंधूंनी गिरवला.

आजच्या आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तरुणांसमोर राष्ट्रहिताच्या दृष्टीने कोणतेही भव्य ध्येय वा स्वप्न आपण ठेवू शकलेलो नाही. आपल्या शाळकरी अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपण गेल्या ६६ वर्षांत राष्ट्रीय शिक्षणाचे धडे देऊ शकलो नाही. ‘आपला देश कोणत्याही रक्तपाताखेरीज, शस्त्राखेरीज स्वतंत्र झाला’, असे बेधडक सांगितले जाते आणि त्याविषयी कोणालाही खंत वा खेद वाटत नाही. पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून पाश्चात्त्यांनी लिहिलेला इतिहास आपण मुलांना शिकवतो आणि ६६ वर्षांत आपण आपल्याच मुलांची प्रतिकारशक्ती मारून टाकली.

३. राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव इतिहासाच्या वाचनाने अधिक तीक्ष्ण होणे

आपल्या देशातील तरुण पिढी हुशार आहे. विदेशात जाऊन हे तरुण तिथेच स्थायिक होतात. त्यांना स्वदेशाविषयी ओढ आहे, असे म्हणण्याचे धाडस होत नाही. आपल्या मुलांच्या मनावर देशभक्तांच्या उत्कट कार्याचे, त्यागाचे, राष्ट्रनिष्ठेचे आदर्श संस्कार करायला हवेत. त्यांना त्यांच्या जीवन चरित्राचा परिचय करून द्यायला हवा. त्यासाठी त्यांना इतिहासाकडे वळवायला हवे. इतिहासाच्या वाचनाने गतकाळातील घटनांचा अभ्यास करून स्वतःच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव अधिक तीक्ष्ण करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचे महत्त्व पटवून द्यायला हवे. ज्या समाजाची इतिहासाचा अभ्यास करण्याची वृत्ती नष्ट होते, तो समाज अधोगतीला जातो. ते राष्ट्र मृतवत बनते. केवळ भौतिक आणि आर्थिक विकासाने राष्ट्र बलाढ्य होत नाही. त्यासाठी अव्यभिचारी राष्ट्रनिष्ठा असावी लागते. दृढनिश्चयी मन हवे. राष्ट्ररक्षणार्थ लढण्यासाठी लागणारी प्रतिकार निष्ठा हवी. या सर्व गोष्टी इतिहासाच्या अभ्यासानेच प्राप्त होऊ शकतात.

४. वीर सावरकर यांची भावना देशातील प्रत्येक तरुणामध्ये निर्माण होणे आवश्यक !

आज आपला देश अनेक समस्यांनी घेरला गेला आहे. ‘ओंगळवाणा देश’ अशी आपल्या देशाची जगात ओळख होत आहे. आपल्या देशात ‘शिस्त आणि स्वच्छतेचा अभाव आहे’, अशी कारणे देऊन विदेशात स्थायिक होणारे आपलेच देशबांधव आहेत. उलट देश संकटग्रस्त, बेशिस्त, अस्वच्छ असतांना आपण अन्यत्र जाऊन स्थायिक होणे, हा राष्ट्रभिमान नाही. उलट ‘स्वयंशिस्त आणि राष्ट्रभिमानाचे पाठ आपल्या बांधवांना देण्यासाठी निष्ठापूर्ण कार्य करण्यासाठी लागणारी वृत्ती मी माझ्या बांधवांमध्ये निर्माण करीन’, असे ध्येय उराशी बाळगणारी तरुणांची सेना हवी आहे. येथे अनेक प्रासाद असले, तरी मला माझ्या देशातील माझ्या आईची झोपडीच अधिक प्रिय आहे, अशी आर्तभावना जगणारे वीर सावरकर यांचे स्मरण आज किती तरुणांना होते ?

देशाविषयी ओढ, उत्कट भावना नसेल, तर त्या देशाच्या उत्कर्षासाठी काही करण्याचे स्वप्न तरुणांना पडणार नाही. ‘मी संपादन केलेले ज्ञान, मिळवलेली विद्या देशासाठीच तिचा उपयोग झाला, तरच तिचे सार्थक होईल अन्यथा तो भार, ते ओझेच आपण आयुष्यभर सांभाळले’, ही वीर सावरकर यांची भावना देशातील प्रत्येक तरुणाची व्हावी; म्हणून शिक्षण व्यवस्थेने प्रयत्न करायला हवा. देशभक्त क्रांतीकारकांची सेवाभावी वृत्ती, कृतज्ञता भाव आणि पराकोटीची त्यागी वृत्ती, लढाऊ बाणा हा आजच्या पिढीने वारसा हक्काने आपला आहे, असे मानून तसे वागले, तर देशाच्या सर्व समस्या सुटतील आणि देश बलाढ्य होईल.

५. देशविघातक गोष्टी रोखण्यासाठी पूर्वजांच्या पराक्रमाचा परिचय आवश्यक !

देशातील नक्षलवाद, आतंकवादी कारवाया, चीनची घुसखोरी, बांगलादेश, पाकिस्तान यांचा वैरभाव जो देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात करतो आहे. तिथल्या देशातील नागरिक देशात घुसून हैदोस घालत आहेत. भूमी हडप करत आहेत. देशाचे लचके तोडण्याचे उद्योग ही चालू आहेत. सरकारकडून या सर्वांना आळा घातला जात नाही. नागरिक उदासीन आहेत. अशा परिस्थितीत आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा आणि त्यांची विजिगीषू वृत्ती यांचा परिचय आपल्याला होणे आवश्यक आहे.

६. सरकारने कुविचारांच्या स्वातंत्र्याला लगाम घालणे आवश्यक

आज मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य यांच्या नावाखाली अपशब्द, अन्याय आणि असत्याचा, कुविचारांचा प्रसार होत असेल, तर ते विचार स्वातंत्र्य अन् मतस्वातंत्र्य देशाला समाजाला हानीकारक आहे; म्हणून त्याला बंधनच घातले पाहिजे. अशा स्वातंत्र्याला लगाम घालण्याचे धाडस सरकार करत नाही. परिणामी देशात वैचारिक गोंधळाला, गदारोळाला रान मोकळे मिळते. इतिहासाचा अभ्यास नसतांना ऐतिहासिक घटनांवर भाष्य करून अयोग्य पद्धतीने त्यांचे विश्लेषण करणारी विद्वानांची मांदियाळी आपल्या देशात आहे.

७. तारुण्यातील वीरता, शौर्य आणि विजिगीषू वृत्ती यांनी राष्ट्र उन्नत होणे

तारुण्याचा काळ हा मौजमजा, मस्ती यात व्यतीत करायचा नाही, तर तो राष्ट्रकार्यासाठी व्यय करायचा. नुसता रंगेलपणा हा माणसाचे आणि समाजाचे जीवन अधःपतीत करतो. कलंकित करतो. तारुण्यातील वीरता, शौर्य, क्षात्रतेज, विजिगीषू वृत्ती समाजाला आणि राष्ट्राला उन्नत बनवते. हे स्वातंत्र्यपूर्व काळातील २० ते २५ वर्षे वयोगटातील युवक देशभक्तांना उमगले होते आणि त्यांनी तशी कृती केली.

८. वस्तू आणि इंद्रिये यांचा गुलाम न होणे, हा खरा पुरुषार्थ !

आजच्या तरुणांनी वासनाविकारांवर मात करून स्वतःचे आणि समाजाचे मानसिक, वैचारिक आरोग्य जपून संयत जीवन जगण्याचे संस्कार करायला हवेत. राष्ट्रभक्तीची नशा जडली की, भौतिक सुखाची ओढही रहात नाही. विषयांध होऊन शरीरसुखात लोळत पडणार्‍या कुणाच्याही स्मृती राष्ट्र घडवण्याचे संस्कार घडवू शकत नाहीत. ही लंपटता म्हणजे गुलामगिरीच ! मी वस्तू आणि इंद्रिये यांचा गुलाम होणार नाही. यात खरा पुरुषार्थ आहे. पोवाडे विरांचे गायले जातात, विषयांधांचे नाही. याचे विस्मरण होऊ नये.

आज आपल्या समाजात स्त्रियांवर होणार्‍या बलात्काराच्या घटनांमुळे मन विषण्ण होते. परस्त्री मातेसमान मानायला लावणारी आपली संस्कृती आहे, तरीही स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पहाणार्‍या लोकांविषयी संताप येतो.

९. क्रांतीकारकांच्या बलीदानाची नोंद न घेणे, ही कृतघ्नताच !

आजच्या लुबर्‍या, लाचार, भ्रष्ट नेत्यांचे बेगडी राष्ट्रप्रेम पाहून किळस येते, तर क्रांतीकारकांची ही उत्कट राष्ट्रभक्ती पाहून आपण यांचेच वारसदार आहोत, याचा सार्थ अभिमान वाटतो. मान आदराने त्यांच्यासमोर झुकते.

आज भ्रष्ट नेत्यांचा जयजयकार होण्यासह त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणारे फलक शहराशहरांत झळकतात; पण क्रांतीकारकांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे स्मरणही होत नाही. त्यांच्या बलीदानाची नोंदही आपण घेत नाही. ही कृतघ्नता आहे, याचीही जाण नाही.’

– सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : ‘धर्मभास्कर’, जून २०१४)