‘सतत इतरांसाठी झटणे’, हा स्थायीभाव असलेले आणि सर्वांगांनी परिपूर्ण जीवन जगणारे पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी !

‘सतत इतरांसाठी झटणे’, हा स्थायीभाव असलेले आणि सर्वांगांनी परिपूर्ण जीवन जगणारे पू. सदाशिव परांजपेआजोबा (वय ७९ वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (वय ७३ वर्षे) !

‘एकदा माझी पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांच्या सहज बोलण्यातून माझ्या अल्पमतीला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. सदाशिव आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

पू. सदाशिव परांजपेआजोबा

१. सतत कार्यरत असणे

अ. पू. परांजपेआजोबा सांगली येथे असतांना सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत कार्यरत असायचे. त्यांच्या घराच्या परिसरातील बागेत १३ नारळाची आणि अन्य फळा-फुलांची झाडे होती. तेथील झाडांना आलेले नारळ पू. आजोबा स्वतः फोडायचे. ते तेलाच्या घाणीत जाऊन खोबरेल तेल काढून आणायचे.

आ. त्यांचे शीतपेये विकण्याचे दुकान होते. त्या दुकानात त्यांना कुणी साहाय्यक नव्हता. ते सकाळी दहा वाजता दोन्ही वेळचा जेवणाचा डबा घेऊन दुकानात जायचे.

इ. आता ते या वयातही चारचाकी चालवत सकाळी रामनाथी आश्रमात येतात आणि संध्याकाळी घरी जातात.

२. पुत्राचे कर्तव्य निभावणे

त्यांनी त्यांच्या आईला तीर्थयात्रा घडवून आणली. त्यांनी त्यांच्या आईच्या शेवटच्या आजारपणात तिची मनोभावे सेवा केली.

३. त्यांनी नातेवाईक, तसेच परिचित यांना त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी निरपेक्षभावाने आर्थिक साहाय्य केले.

४. सेवेचा ध्यास

ते उतारवयात संगणक हाताळायला आणि टंकलेखन करायला शिकले. ते या वयातही लिखाणाचे टंकलेखन करण्याची सेवा करतात आणि ते साधकांसाठी नामजप करतात.

५. कठीण प्रसंगात सकारात्मक रहाणे

सांगली येथे आलेल्या महापुराचे पाणी त्यांच्या घरात शिरून घरातील साहित्याची पुष्कळ हानी झाली. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘त्या वेळी मी विचार केला, ‘आमच्या तिन्ही कन्यांचा विवाह झाला आहे. देवाने आम्हा दोघांना आवश्यक तेवढेच साहित्य ठेवले.’’

पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी

१. जवळीक साधणे

‘तोंडवळ्यावर सदैव स्मितहास्य असलेल्या पू. (सौ.) परांजपेआजी सहजतेने बोलून समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेतात.

२. कौटुंबिक दायित्व निभावणे

अ. पू. आजींनी त्यांच्या तिन्ही सुकन्यांचे शिक्षण आणि विवाह चांगल्या प्रकारे केले.

आ. पू. आजींनी पू. आजोबांच्या साहाय्याने स्वतःच्या भावाच्या तीन मुलींची लग्ने केली.

पू. आजींचे कुटुंब मोठे आहे. पू. आजींनी त्यांच्या कुटुंबातील महिलांच्या मंगळागौरी आणि बाळंतपणे केली.

इ. त्या घरचे सर्व आवरून त्यांच्या दुकानातही जात असत.

ई. त्यांनी त्यांच्या सासूबाई आणि आई यांची शेवटच्या आजारपणात मनोभावे सेवा केली. त्या घरचे सर्व आवरून दुचाकीने १२ किलोमीटर प्रवास करून अडीच वर्षे एक दिवसाआड माहेरी आईच्या आजारपणात तिची सेवा करण्यासाठी जात असत.

३. इतरांचा विचार करणे

त्यांनी स्वतःच्या बाळंतपणाच्या वेळी साहाय्यासाठी येणार्‍या नातेवाईकांना त्रास होऊ नये, यासाठी धान्य निवडून भरून ठेवणे, डिंक भिजत घालणे इत्यादी केले.

४. कलागुण

अ. पू. आजींनी घरचा व्याप सांभाळून संगीत शिकून संगीताच्या परीक्षा दिल्या. त्या भजनीमंडळात ही जात असत. त्यांच्या घरी ४५ वर्षे प्रत्येक बुधवारी भजनांचा कार्यक्रम होत असे. त्यांच्या भजनीमंडळाने अनेक ठिकाणी विनामूल्य कार्यक्रम केले.

आ. त्यांना शिवणकलाही अवगत आहे. त्या त्यांच्या कन्यांचे, तसेच बाहेरच्या व्यक्तींचे कपडे शिवायच्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील अनेक जणांना बाळंतविडे करून दिले आहेत.

इ. त्यांनी विणकाम आणि भरतकाम करून अनेक कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या आहेत.

५. सेवेचा ध्यास

त्या उतारवयात संगणक हाताळायला शिकून संकलनाची सेवा शिकल्या. आता त्या संकलनाची सेवा करत आहेत. त्या साधकांसाठी नामजपही करतात.

६. अहंशून्यता

अ. त्या स्वतःविषयी सांगत असतांना त्यांच्या बोलण्यात अहंचा लवलेशही जाणवत नव्हता.

आ. काही वर्षांपूर्वी मी त्यांना संकलनाच्या सेवेसंबंधी काही सूत्रे सांगितली होती. आताही त्या मला म्हणाल्या, ‘‘माझ्या सेवेत चुका होत असल्यास सांगा.’’

इ. त्या आश्रमातील प्रत्येक साधकाकडून शिकण्याच्या स्थितीत असतात.

पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी

१. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे देवीस्वरूप कन्यारत्न लाभण्याचे भाग्य !

पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी दोघेही प्रथमपासूनच सद्वर्तनी आणि सन्मार्गी आहेत. दोघांच्याही तोंडवळ्यावर समाधानी वृत्ती जाणवते. त्यांच्या सद्वर्तनी आणि सत्शील वृत्तीमुळे त्यांना ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे देवीस्वरूप कन्यारत्न लाभले.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
सौ. अंजली काणे

२. प्रेमभाव

दोघेही त्यांच्या घरी येणार्‍या व्यक्तीला कधीही रिक्त हस्ते पाठवत नाहीत.

३. त्या दोघांनी कौटुंबिक व्याप सांभाळून अनेक तीर्थयात्रा केल्या आहेत.

४. दोघांमध्येही त्यांची सुपुत्री श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि जावई सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याप्रती आदरभाव आहे. ते दोघेही त्यांची सुपुत्री आणि जावई यांच्याविषयी बोलतांना ‘सद्गुरु’ असा उल्लेख करतात.

५. इतरांना जोडून ठेवणे

पू. परांजपेआजी-आजोबा सांगली येथून गोवा येथे वास्तव्याला येत असतांना अनेक जणांना दुःख होऊन त्यांनी पू. आजीआजोबांना सांगितले, ‘‘तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका.’’

६. साधनेचा ध्यास

ते दोघे या वयातही पहाटे साडेचार वाजता उठून नामजप करतात आणि घरचे सगळे आवरून आश्रमात सेवेसाठी येतात.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

ते सतत ‘आम्ही काडीही हालवू शकत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच सर्व होत आहे’, असे सांगत होते.

कृतज्ञता आणि प्रार्थना

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला अशा सतत इतरांसाठी झटणार्‍या आणि सर्वांगांनी परिपूर्ण अन् कृतार्थ जीवन जगणार्‍या संतरत्नांचा सत्संग लाभला, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि ही संतरत्ने यांच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘या संतरत्नांतील गुण माझ्यात येण्यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्यावेत’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– सौ. अंजली श्रीराम काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक