प्रेमभाव, तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्या वाराणसी येथील श्रीमती सुमती सरोदे (वय ६० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
रामनाथी (गोवा), ८ डिसेंबर (वार्ता.) – सतत सेवारत असणार्या, प्रेमभाव आणि तळमळ आदी विविध गुणांद्वारे जिज्ञासूंना साधनेस उद्युक्त करणार्या मूळच्या वर्धा येथील आणि सध्या वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणार्या सनातनच्या साधिका श्रीमती सुमती सरोदे या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या. ७ डिसेंबर या दिवशी एका सत्संगात सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या आनंदमय क्षणी पू. नीलेश सिंगबाळ यांनी श्रीमती सरोदे यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या सोहळ्याला श्रीमती सरोदे यांची मुले श्री. सुमित आणि श्री. अमित सरोदे, सून सौ. अदिती अमित सरोदे, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची नात कु. ओजस्वी, बहीण सौ. सुनंदा चौधरी, बहिणीची मुलगी सौ. सौख्या चौधरी आणि बहिणीचा मुलगा श्री. विवेक चौधरी अन् त्यांची पत्नी सौ. गौरी, बहिणीचा ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा नातू श्री. श्रीहरि चौधरी आदी नातेवाइकही उपस्थित होते.
सेवेशी एकरूप होऊन धर्मप्रसाराची सेवा करणार्या श्रीमती सरोदे आणि श्रीमती डगवार या आदर्श ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
‘प्रसाराची सेवा करतांना श्रीमती सरोदेकाकू आणि ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी डगवारकाकू त्या सेवेशी एवढ्या एकरूप होत की, ‘घरी जाण्यापूर्वी कोणते साहित्य इत्यादी घेऊन जायचे आहे’, हेही विसरायच्या. विदर्भातील तीव्र उन्हाळ्यातही त्यांनी झोकून देऊन प्रसारसेवा केली आहे. श्रीमती सरोदेकाकू आणि श्रीमती डगवारकाकू या सेवेशी एकरूप होऊन सेवा करण्याचे आदर्श उदाहरण आहेत ! अशी झोकून देऊन सेवा केली, तर आध्यात्मिक प्रगती का होणार नाही ? साधकांना ‘सेवेत चुका होतील’, अशी भीती वाटत असते; परंतु साधकांनी लक्षात घ्यावे, ‘मनापासून सेवा केलेली सेवा परिपूर्ण होते’ ! चुकांची भीती बाळगून सेवा करण्यापेक्षा शिकण्याच्या स्थितीत राहून आणि स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्याविषयी सतर्क राहून प्रयत्न होत आहेत ना, याकडे साधकांनी लक्ष द्यावे !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली श्रीमती सुमती सरोदे यांची गुणवैशिष्ट्ये
१. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे
वाराणसी येथील वास्तूचे नूतनीकरण चालू होते. कोरोनामुळे परिस्थिती कठीण होती. कामगार त्या ठिकाणी आले की, साधकांची व्यवस्था दुसरीकडे करावी लागत असे. असे असूनही सरोदेकाकूंनी त्या काळात मनापासून सेवा केली. वेगवेगळी परिस्थिती सहजतेने स्वीकारणे, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य आहे !
२. पहिल्याच संपर्कात जिज्ञासूंना साधनेशी जोडून घेणे
काकू पहिल्याच संपर्कात समोरील व्यक्तीला साधनेशी जोडतात. हा त्यांचा दैवी गुण आहे. प्रासंगिक साधना करणार्या एका साधिकेच्या घरी काकू प्रथमच गेल्या होत्या. त्या साधिकेचे यजमान शेती करतात. काकूंनी त्यांना अर्पणाचे महत्त्व सांगितले. नंतर त्यांच्या माध्यमातून अन्य शेतकरीही धर्मकार्याशी जोडले गेले. आता ते सर्व शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील भाजी पूर्णवेळ धर्मप्रसाराची सेवा करणार्या साधकांच्या भोजनासाठी अर्पण स्वरूपात देतात. आम्ही अनेक वर्षांपासून साध्य करू शकलो नाही, ते काकूंना पहिल्या भेटीतच साध्य झाले !
उत्तर भारतात जिज्ञासूंना भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांना साधना सांगणे, ही मुख्य सेवा असते. त्यात सरोदेकाकू महत्त्वाची भूमिका निभावतात.
अशी झाली घोषणा !
‘कौटुंबिक स्तरावर साधनेचे प्रयत्न कसे करावेत ?’, यासंदर्भात एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘कुटुंबियांसमवेत असतांना कोणते दोष उफाळून येतात आणि त्या वेळी कोणते प्रयत्न होतात ?’, याविषयी साधक स्वतःची विचारप्रक्रिया सांगत होते. तेव्हा श्रीमती सुमती सरोदे यांनीही त्या कुटुंबियांच्या समवेत असतांना त्या करत असलेले प्रयत्न सांगितले. ते ऐकून सर्वांना पुष्कळ शिकायला मिळाले. ‘त्यांचे हे प्रयत्न प्रेरणादायी आहेत’, असे सांगून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्रीमती सुमती सरोदे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, ही आनंददायी घोषणा केली. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतरही श्रीमती सरोदेकाकू पुष्कळ स्थिर आणि सहजस्थितीत होत्या, हे त्यांचे वैशिष्ट्यच !
श्रीमती सरोदे यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत
परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच हे साध्य होऊ शकले ! – श्रीमती सुमती सरोदे
‘मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे’, त्यांच्या कृपेनेच हे झाले आहे. त्यांना अपेक्षित असे प्रयत्न करण्यासाठी मी अजूनही पुष्कळ अल्प पडते. त्यांच्या कृपेने मला हलके आणि पुष्कळ स्थिर वाटत आहे.
श्रीमती सुमती सरोदे यांच्या कुटुंबियांनी कथन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
१. श्रीमती सुमती आमच्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेते ! – सौ. सुनंदा चौधरी (श्रीमती सरोदे यांची मोठी बहीण)
श्रीमती सुमती साधनेचे जे प्रयत्न करते, ते आम्हा सर्व कुटुंबियांनाही सांगते. ती घरातील सर्वांच्या चुका सांगून त्या चुका सुधारण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करवून घेते.
२. आईने प्रथमपासून साधनेसाठीच प्रोत्साहन दिले ! – श्री. सुमित सरोदे (श्रीमती सरोदे यांचा धाकटा मुलगा)
जी ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवते, ती आपली खरी आई असते. आईने पहिल्यापासून आम्हा मुलांना व्यावहारिक जीवनापेक्षा साधनेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशी आई मिळणे दुर्मिळ गोष्ट आहे. आईने कधी स्वत:च्या सुखाचा विचार केला नाही. तिने नेहमीच ‘अध्यात्मप्रसार अधिकाधिक कसा करता येईल ?’, याकडे लक्ष दिले.
३. आईने स्वतःत पालट करण्याची शिकवण दिली ! – श्री. अमित सरोदे (श्रीमती सरोदे यांचा मुलगा)
‘एके ठिकाणी जात असतांना रस्त्यावरून जाणार्या वाहनातील एक व्यक्ती थुंकल्यामुळे माझे कपडे खराब झाले. या प्रसंगात ‘मी त्या व्यक्तीला थांबवून मी जाब विचारायला हवा होता का ?’, असे प्रश्न माझ्या मनात आले. मी याविषयी आईला विचारले असता आई मला म्हणाली, ‘‘संत एकनाथ महाराज नदीवर स्नानाला गेले असतांना एक व्यक्ती त्यांच्यावर अनेक वेळा थुंकली. तेव्हा एकनाथ महाराजांनी प्रत्येक वेळी शांतपणे पुन:पुन्हा स्नान केले. शेवटी त्या व्यक्तीलाच स्वत:च्या चुकीची जाणीव झाली. या उदाहरणातून आपण शिकायला हवे. अशा प्रसंगातून स्वत:चे अहं निर्मूलन होत असते.’’ आईने मला नेहमी स्वतःत पालट करण्याची शिकवण दिली.
४. आई सर्वत्र तळमळीने प्रसार करतात ! – सौ. अदिती अमित सरोदे (श्रीमती सुमती सरोदे यांची सून)
एकदा आम्ही दुचाकीवरून जातांना पायाने अधू असलेली एक व्यक्ती आम्हाला दिसली. त्या वेळी आईंनी थांबून त्याला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप ऐकवला. मी विचारले, त्याला काय सांगितले ? तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘बाकी काही लक्षात राहिले नाही, तरी तो आता किमान ‘दत्त’ तरी म्हणेल आणि त्याचा त्रास कमी होईल.’’ एकदा रेल्वेत त्यांनी सहप्रवाशांना साधनेविषयी सांगितले होते. अशा प्रकारे त्या सर्वत्र तळमळीने प्रसाराची सेवा करतात. वाराणसीला थंडी आणि उन्हाळाही तीव्र असतो. ते वातावरणही त्यांनी सहजतेने स्वीकारले.
५. मावशीने आमच्यावर लहानपणीपासूनच चांगले संस्कार केले ! – सौ. सौख्या चौधरी (श्रीमती सुमती सरोदे यांच्या बहिणीची मुलगी)
मावशीने लहानपणापासूनच आमच्यावर सात्त्विक वेशभूषा करणे आणि काटकसर करणे आदी संस्कार केले. मावशीची आर्थिक स्थिती चांगली असूनही ती काटकसरीने साड्या वापरते. ती मला नेहमी सांगते की, ‘सर्व दु:ख परम पूज्यांना सांग.’ तिच्या या वाक्याने मला पुष्कळ आधार मिळतो. पूर्वी मावशीला काही प्रसंगांत ‘स्वतःचे दोष स्वतःच्या लक्षात येत नाहीत’, याची खंत वाटत असे. तिने तसे सांगितल्यावर मी माझ्या लक्षात आलेल्या तिच्या काही चुका अथवा दोष सांगितल्यास त्या स्वीकारून मावशी त्यावर प्रयत्न करत असे. त्यावरून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे, हे माझ्या लक्षात आले.
श्रीमती सरोदे यांच्या सहसाधकांनी कथन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
१. ‘काकू काही दिवसांसाठी गोवा येथे कुटुंबियांकडे गेल्या असतांना वाराणसी येथील एका सेवेसाठी साहाय्य हवे होते. ‘ही सेवा कोण करू शकते’, असा विचार केल्यानंतर आमच्या डोळ्यांसमोर सरोदेकाकूंचे नाव आले. काकूंना याविषयी विचारले असता त्यांनी ती सेवा गोवा येथून भ्रमणभाषद्वारे समन्वय करून पूर्ण केली. वाराणसी येथे सरोदेकाकू सेवा करत असलेल्या ठिकाणी दैवी सुगंध येत होता. ‘काकूंमधील भावामुळे हा दैवी सुगंध येत होता’, असे मला जाणवले.’ – सौ. श्रेया प्रभु (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), वाराणसी
२. ‘एकदा वाळत घातलेल्या चादरीला एक छिद्र पडले होते. सरोदेकाकूंनी स्वत:हून त्याला एक कापड लावून ते शिवले. काकूंनी ती चादर इतक्या सुंदर प्रकारे शिवली की, ‘तिला यापूर्वी छिद्र होते’, असे वाटतच नव्हते. काकूंकडे अशी विविध प्रकारची कौशल्ये आहेत.’ – सौ. सानिका सिंह, वाराणसी
३. ‘कधी काही अडचणींमुळे काकूंच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत खंड पडला, तर त्याची त्यांना पुष्कळ खंत वाटते.’ – सौ. प्राची जुवेकर, वाराणसी
४. ‘सरोदेकाकू रामनाथी आश्रमात वर्षातून एकदाच येतात, तरीही मला त्यांच्याविषयी पुष्कळ जवळीक वाटते.’ – श्रीमती कमल गरुड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
श्रीमती सुमती यांनी सर्व सेवा आणि परिस्थिती स्वीकारली आहे ! – श्रीमती मंदाकिनी डगवार (श्रीमती सुमती सरोदे यांची मैत्रीण, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)
आम्ही शाळेत नोकरी करत असतांना धर्मप्रसाराची सेवाही एकत्रित करत असू. ग्रंथवितरणाचे ध्येय ठरवून त्याप्रमाणे प्रयत्न करत असू. श्रीमती सुमती वाराणसीला गेल्यानंतर धर्मप्रसाराच्या सेवेसह धान्य निवडणे, वाहन चालवणे, याही सेवा ती करत आहे. तिने सर्व सेवा आणि परिस्थिती स्वीकारली आहे. तिच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना तिच्यामध्ये भाव जाणवतो. तिच्या छायाचित्रातील मुखावर पुष्कळ तेज जाणवले. आम्ही मैत्रिणी असूनही आमच्यात कधी मायेतील विषयांसंदर्भात बोलणे होत नाही. आमचे नेहमी साधनेविषयीच बोलणे होते.
नम्र आणि परिपूर्ण सेवेची तळमळ असलेल्या श्रीमती सुमती सरोदे !
१. विनम्रता
सरोदेकाकूंचे वय ६० वर्षे असून त्यांना अनेक क्षेत्रांतील अनुभव आहे. असे असले, तरीही त्यांच्या वागण्यातून त्यांना असलेल्या अनुभवाचे कर्तेपण दिसून येत नाही. त्या सर्वांच्या समवेत विनम्रतेने बोलतात.
२. प्रेमभाव
अ. काकूंमध्ये प्रेमभाव आहे. एखाद्या साधकाला बरे नसेल किंवा कुणाला शारीरिक त्रास होत असतील, तर त्या त्यांची प्रेमाने विचारपूस करतात. त्या त्यांना ठाऊक असलेले घरगुती उपाय संबंधित साधकांना सांगतात.
३. सेवेची तळमळ
३ अ. सरोदेकाकूंमधील तळमळीमुळे जिज्ञासू जोडले जाणे : वाराणसी सेवाकेंद्राचे नूतनीकरणाचे काम चालू असतांना साधकांची रहाण्याची व्यवस्था एका इमारतीत केली आहे. एकदा काकूंची त्या इमारतीतील एका शेजार्यांशी भेट झाली. एका भेटीतच काकूंनी त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि साधना सांगून हिंदी ‘सनातन प्रभात’ पाक्षिकाचे वर्गणीदार बनवले. त्यांना काकूंविषयी पुष्कळ आदर आहे.
३ आ. ‘धान्य खराब होऊ नये’; म्हणून काळजीपूर्वक सेवा करणे : सध्या काकूंकडे धान्याच्या संदर्भातील महत्त्वाची सेवा आहे. ही सेवाही त्या अतिशय परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न करतात. ‘कोणते धान्य आधी संपवले पाहिजे ?’, हे सांगून त्या त्याचे नियोजन करतात. धान्याच्या संदर्भातील सेवा करतांना काकू आवश्यक ती काळजी घेतात. त्यामुळे धान्य अधिक काळ सुरक्षित रहाते. त्या गोव्याला त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी रामनाथी आश्रमात जाऊन धान्याच्या संदर्भातील निरनिराळ्या सेवा शिकून घेतल्या आणि वाराणसीला परत आल्यावर त्या सूत्रांनुसार काकू धान्याची सेवा मन लावून करत आहेत.
३ इ. विविध सेवांचे दायित्व घेणे : जुलै मासात साधकसंख्या न्यून झाल्याने काकूंनी आश्रमातील अनेक सेवांचे दायित्व घेऊन त्या उत्तम प्रकारे केल्या.
४. भाव
अ. काकू देवाला फुले वाहतांना फुलांची सुंदर रचना करतात. काकूंमध्ये असलेल्या भावामुळे अनेकदा पूजेच्या ठिकाणी दैवी सुगंधाची अनुभूती येते.
आ. काकूंच्या मनात पू. नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती फार भाव आहे. काकू पू. दादांनी लक्षात आणून दिलेली सूत्रे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. सूत्रे पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न न्यून पडले, तर त्यांना फार खंत वाटते.
– वाराणसी सेवाकेंद्रातील सर्व साधक, वाराणसी (६.१२.२०२१)