पू. संदीप आळशी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०१६-२०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. संदीपदादा यांना अल्पाहार, जेवण आदी देण्याची सेवा करण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. प्रथमेश खांडेकर

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. ‘प्रत्येक कृती तारतम्याने करावी’, हे शिकवणे : मला पू. दादांच्या कपड्यांना इस्त्री करण्याची संधी मिळाली. त्या वेळी ‘कपड्याला सुरकुती राहू नये’, असा विचार करून मी बारकाव्यांनिशी इस्त्री करत असे. एकदा पू. दादा मी इस्त्री करत असलेल्या ठिकाणी आले आणि त्यांनी मला ‘चित्रीकरणासाठी घालायचा सदरा, नेहमी घालायचा सदरा आणि वापरायचा सदरा’, अशी कपड्यांची वर्गवारी करून दिली, तसेच ‘कोणत्या कपड्यांसाठी किती वेळ देणे अपेक्षित आहे ?’, हे सांगितले. त्या वेळी ‘प्रत्येक कृती तारतम्याने करावी’, हे सूत्र त्यांनी मला सहजतेने सांगितले.

१ आ. न लागणारी औषधे त्वरित चिकित्सालयात जमा करायला सांगणे : पू. दादा वैद्यकीय सूत्रे, औषधोपचार आणि पथ्य यांचे काटेकोर पालन करतात. आधुनिक वैद्यांनी औषधे पालटायला सांगितली, तर ते लगेचच आधीची औषधे चिकित्सालयात जमा करायला सांगतात.

२. आलेल्या अनुभूती

२ अ. साधकाला होणार्‍या मानसिक त्रासाविषयी काहीही सांगितले नसतांना ‘तंतोतंत लागू पडतील’, असे मंत्रोपाय सांगणे : पू. संदीपदादांनी ‘मला मानसिक त्रास होतो’, हे जाणून घेऊन त्यावर प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्रोपाय स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले. मी त्यांना ‘मला कोणता मानसिक त्रास होतो ?’, हे नेमकेपणाने सांगितले नव्हते, तसेच हे त्रास निर्माण होण्याची कारणेही अभ्यासली नव्हती, तरी त्यांनी दिलेल्या मंत्रांचा अर्थ वाचल्यावर ‘ते मंत्र माझ्या मानसिक त्रासाच्या लक्षणांना तंतोतंत लागू पडत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. यातून मला संतांची सर्वज्ञता लक्षात आली आणि कृतज्ञता वाटली.

२ आ. पू. दादांनी सांगितलेले उपाय केल्यावर मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून होऊन सुचू लागणे : एकदा माझ्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे सुचेनासे झाल्याने माझ्याकडून सेवेत एक चूक झाली. तेव्हा पू. दादांनी मला त्वरित बोलावून ‘ॐ’चा नामजप आणि मुद्रा करायला सांगितली. ते उपाय केल्याने माझा त्रास उणावला आणि मला सुचू लागले.

२ इ. पू. दादांनी मारुतिरायांच्या जागृत देवस्थानातील प्रसाद म्हणून दिलेले कुंकू लावल्याने त्रासातून बाहेर पडण्यास बळ मिळणे : आमच्या घराच्या विक्रीची प्रक्रिया चालू केल्यावर त्यात अनेक अडचणी आल्या. त्या वेळी मला होणार्‍या त्रासाचे प्रमाण वाढले. त्या वेळी पू. दादा ‘घराची विक्री होईल’, असे सांगून मला मधे मधे धीर द्यायचे. एकदा घरी जाण्यापूर्वी मी त्यांना मला होणार्‍या त्रासाविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला बोलावून आम्हाला मारुतिरायांच्या जागृत देवस्थानातील कुंकू प्रसाद म्हणून दिले. त्यांनी दिलेले कुंकू आम्ही प्रवासात सतत आमच्याजवळ ठेवून मधे मधे लावत होतो. त्यामुळे आम्हाला त्रासातून बाहेर पडण्यास बळ मिळाले.

२ ई. संतांनी पाठवलेला प्रसाद पू. दादांनी आठवणीने साधकाला देणे आणि त्या वेळी ‘पू. दादा लढण्यासाठी एक प्रकारे बळ देत आहेत’, असे वाटणे : अन्य संत किंवा साधक यांनी त्यांच्यासाठी पाठवलेला खाऊ आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणचा प्रसाद ते माझ्यासाठी आठवणीने काढून ठेवत असत. काही वेळा मला तो घेण्यास संकोच वाटत असे, तरीही ते मला तो देत असत. त्या वेळी ‘ते मला त्रासाशी लढण्यासाठी एक प्रकारे बळ देत आहेत’, असे मला वाटायचे. माझ्या नामजपात वाढ होण्यासाठी त्यांनी मला स्वतः वापरलेले नामजप मोजण्याचे यंत्र दिले होते.

२ उ. पू. दादा जवळच नामजपाला बसलेले असतांना स्वतःवर उपाय होत असल्याचे जाणवणे : एकदा मी नामजपादी उपायांच्या खोलीत नामजपाला बसलो होतो. त्या वेळी मला पू. दादांची आठवण येऊ लागली. अकस्मात् ते माझ्यापुढे असलेल्या आसंदीवर येऊन बसले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर जसे माझ्या शरिरात चैतन्य पसरते आणि माझ्यावर उपाय होतात, तसेच उपाय माझ्यावर होऊ लागले. त्या वेळी मला ‘त्याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते.

२ ऊ. पू. दादांच्या कपड्यांना इस्त्री करतांना मला सुगंध येतो आणि ‘तो घेत रहावा’, असे मला वाटते.

मला संतांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. संदीपदादा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रथमेश खांडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२४.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक