अररिया (बिहार) येथील जिल्हा न्यायालयाकडून एकाच दिवसांत सुनावणी करून बलात्कार्‍याला जन्मठेपेची शिक्षा !

न्यायालयांनी अशा प्रकारे गतीशील कामकाज करावे, असेच जनतेला वाटते ! – संपादक

अररिया (बिहार) – येथील जिल्हा न्यायालयाने ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत प्रविष्ट करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यावरील खटल्यावर एकाच दिवसांत साक्ष आणि युक्तीवाद ऐकून आरोपी दिलीप यादव याला दोषी ठरवले अन् त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५० सहस्र रुपये दंडाचीही शिक्षा दिली. न्यायालयाने सरकारला पीडितेला ७ लाख रुपयांची हानी भरपाई देण्याचा आदेश दिला. पॉक्सो कायद्यासाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे. २३ जुलै या दिवशी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करून  न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.

यापूर्वीही न्यायाधीश शशिकांत राय यांनी १० वर्षांच्या मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या यांप्रकरणी एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. अन्य एका प्रकरणात ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला शेवटच्या श्‍वासापर्यंत कारागृहात रहाण्याची शिक्षा सुनावली होती.