सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर आणि रामनाथी आश्रमात शिबिराला येण्याच्या आधीपासूनच तेथील चैतन्य अनुभवणार्‍या सौ. कामिनी लोकरे !

‘सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर श्रीकृष्णाच्या सान्निध्यात आले असून ईश्वरच काळजी घेत आहे’, असे अनुभवणार्‍या आणि रामनाथी आश्रमात शिबिराला येण्याच्या आधीपासूनच तेथील चैतन्य अनुभवणार्‍या सौ. कामिनी लोकरे !

२२ ते २४.११.२०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मराठी भाषिक साधना शिबिर झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या सौ. कामिनी लोकरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. कामिनी लोकरे

१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी

१ अ. पूर्वी अनेक प्रकारचे शिक्षण घेऊन आणि अनेक प्रकारच्या नोकर्‍या करूनही आनंद न मिळणे : ‘पूर्वी माझा भ्रमणभाषवर ‘अनावश्यक गप्पा मारणे, इतरांची निंदा करणे’ यात अनेक घंटे वेळ वाया जात असे. त्यामुळे मला पुष्कळ मनस्ताप व्हायचा. माझ्यासमोर काहीच ध्येय नव्हते. पूर्वी माझी कोणतीही कृती भावपूर्ण होत नव्हती. काहीही केले, तरी माझा तोंडवळा नेहमी उतरलेलाच असायचा. मी अनेक नोकर्‍या सोडल्या. मी ‘कॉम्प्युटर’चे अनेक ‘कोर्स’ केले, तरीही माझे चित्त स्थिर होत नव्हते आणि मला कशातूनही आनंद मिळत नव्हता.

२. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर

२ अ. सात्त्विक अन् असात्त्विक यांविषयी ठाऊक होणे, सात्त्विक वेशभूषेने चैतन्य मिळत असल्याचे जाणवणे, साधना चालू केल्यावर या सर्वांतून आनंद मिळू लागणे : मला सात्त्विक आणि असात्त्विक यांविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यामुळे मी कुठलेही कपडे घालायचे. सनातन संस्थेत आल्यापासून मला सात्त्विक अलंकार, कपडे आणि वेशभूषा यांविषयी माहिती मिळाली. सात्त्विक कपडे आणि अलंकार यांतून मला चैतन्य मिळत गेले. त्यामुळे माझ्या मनाला स्थिरता आली. मी प्रार्थना आणि नामजप करायला लागल्यानंतर माझे मन शांत झाले. हे पाहून माझ्या घरातील सासरची मंडळी ‘ही इतकी शांत कशी झाली ? हिला काही आजार झाला आहे का ?’, असे म्हणत होती; पण मला कुणाविषयीही काहीच वाटत नव्हते. मला केवळ नामजप, ईश्वरप्राप्ती आणि ईश्वरी अनुसंधान यात आनंद मिळायला लागला. माझे अंतर्मन जणू आनंद आणि ईश्वरप्राप्ती यांसाठीच व्याकुळ झाले होते.

२ आ. सनातन संस्थेच्या सान्निध्यात आल्यावर साधना करू लागणे, ‘नामजप, प्रार्थना आणि ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे’, यांमुळे पुष्कळ आनंद मिळणे : मला सनातन संस्थेचा सत्संग लाभला. तेव्हा ‘आता जणू मी श्रीकृष्णाच्या सान्निध्यात आले असून ईश्वरच माझी काळजी घेत आहे’, असे मला वाटले. ‘प्रत्येक क्षणी साधना कशी करायची ? आपला एक सेकंदही वाया न घालवता साधना आणि सेवा करतांना ईश्वराचे सान्निध्य कसे अनुभवायचे ?’, हे मला सत्संगात शिकायला मिळाले. साधना करू लागल्यानंतर ‘अन्य गोष्टी व्यर्थ आहेत. मला ईश्वरप्राप्तीसाठी अल्प वेळ आहे’, याची मला जाणीव झाली. त्यामुळे आता मी वेळ वाया न घालवता नामजप, प्रार्थना आणि ग्रंथवाचन करते. त्यामुळे आपोआपच माझे भ्रमणभाषवर बोलणे न्यून झाले. मला साधना करतांना पुष्कळ आनंद मिळत आहे.

२ इ. रामनाथी आश्रमात शिबिराला येण्याच्या आधीपासूनच तेथील चैतन्य अनुभवता येणे, त्यामुळे मन स्थिर आणि शांत होणे, आतूनच ‘ॐ’काराचा नामजप ऐकू येणे; मात्र ते शब्दांत सांगता न येणे : रामनाथी आश्रमात येण्याच्या काही दिवस आधीपासूनच मला तेथील चैतन्य अनुभवता येत होते. ‘ईश्वराच्या भेटीच्या आधीच आपल्या वर्तनात कसा पालट होतो ?’, हे मला शिकता आले. इथे येण्याच्या काही दिवस आधीपासूनच माझे मन शांत झाल्याचे मी अनुभवत होते. आश्रमात येण्याआधी प्रथम मला माझ्या कानात ‘ॐ’चा ध्वनी ऐकू येत होता आणि अनाहतचक्रावर चांगली स्पंदने जाणवत होती. ‘माझ्या आतूनच कुणीतरी नामजप करत आहे आणि मी जे अनावश्यक बोलत आहे, ते कुणीतरी थांबवून माझे लक्ष नामाकडे खेचून घेत आहे’, असे मला मधूनमधून जाणवू लागले होते. आता मला ‘ॐ’चा ध्वनी अंतर्मनातून जाणवत आहे. या चैतन्याच्या अनुभवाविषयी शब्दांत सांगणे कठीणच आहे. आपण केवळ हे अनुभवू शकतो.

२ ई. रामनाथी आश्रमात आल्यानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ ई १. ‘रामनाथी आश्रमात म्हणजे ‘प्रत्यक्ष विष्णुलोकातच आले आहे’, असा अनुभव येणे : इथे प्रत्येक वस्तूत चैतन्य आहे. इकडे विटा, माती, भिंती, सगळ्या निर्जीव वस्तू आणि झाडे साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी तळमळत आणि धडपडत आहेत. त्यांचीही साधना होत असल्यामुळे येथील प्रत्येक वस्तू आनंदी आहे; म्हणून इथे भूमीवरून चालतांनाही आनंद होतो. येथील वातावरण पाहून येथे माता श्री लक्ष्मीदेवी, श्री सरस्वतीदेवी, परमेश्वर श्रीकृष्ण आणि देवता यांचा सतत वास असून त्यांचे प्रत्येक साधकाकडे लक्ष आहे. त्यांच्या चैतन्याने येथे सर्वत्र सात्त्विक वातावरण निर्माण झाले आहे. ‘इकडे जणू विष्णुलोक अवतरला असून श्रीकृष्ण मला या विष्णुलोकात घेऊन आला आहे’, असे मला वाटले. परमेश्वराने, श्रीकृष्णाने या चराचरात किती चैतन्य भरले आहे ! मला या चैतन्याचा किती लाभ होत आहे ! माझे मन निर्विचार आणि शांत झाले आहे. आता ‘मला काही बोलावे, असे वाटतच नाही’, इतके इथे येऊन माझे मन शांत झाले आहे. माझ्या मनात कुठलाच विचार नाही.

२ ई २. शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ ई २ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दीपप्रज्वलन करत असतांना त्यांच्याकडून सर्वत्र पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे आणि त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचा आरंभ केला. दीपप्रज्वलन चालू असतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून सगळीकडे पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे. त्यांनी परिधान केलेली साडी आणि अलंकार यांतूनही पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे. त्याचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला ही अनुभूती दिल्यामुळे मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

२ ई २ आ. ‘ॐ’कार ऐकू येणे : साधना शिबिर ज्या सभागृहामध्ये होते, तेथे मला सतत ‘ॐ’ चा ध्वनी ऐकू येत होता. ‘इकडे पुष्कळ शांत असतांनाही मला ‘ॐ’कार का ऐकू येत आहे ? इकडे ध्वनीक्षेपक लावला आहे का ?’, असे मला वाटले.

२ ई २ इ. वक्त्यांच्या मागे पुष्कळ प्रमाणात पांढर्‍या रंगाची ऊर्जा दिसणे : २०.९.२०१९ या दिवशी शिबिरात मार्गदर्शन करणार्‍या कु. तेजल पात्रीकर आणि मानसोपचार तज्ञ यांचे बोलणे ऐकत असतांना अकस्मात् माझे मन पूर्णपणे त्यांच्या बोलण्यावर एकाग्र झाले. मला त्यांच्यामागे प्रचंड प्रमाणात पांढरी ऊर्जा दिसत होती. ‘हे कसे होत आहे ? मला असे का दिसले ?’, याविषयी मला काही कळत नव्हते. ‘ती ईश्वराने मला दिलेली अनुभूती होती’, असे मला वाटले.

२ ई २ ई. शिबिर चालू असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अधून-मधून भिंतीतून आत सगळ्यांकडे पहात आहेत’, असे मला सूक्ष्मातून जाणवत होते.

२ ई ३. एरव्ही काही लिहायला न सुचणे; पण इथे आल्यावर पुष्कळ लिहिता येणे, तेव्हा ‘निर्जीव गोष्टी श्रीकृष्णावर प्रेम करतात, मग मीही केले पाहिजे’, असे वाटणे : एरव्ही मला लिहायला काही सुचत नाही. मला काही कळतही नाही; पण या विष्णुलोकात आल्यापासून माझे अंतर्मन आणि माझे वही-पेन पुष्कळ आनंदी अन् प्रसन्न झाले आहे. ‘त्यांना श्रीकृष्णाविषयी काय लिहू आणि काय नको ?’, असे झाले आहे. मी केवळ वहीवर पेन ठेवले की, जणू अंतर्मन, वही आणि पेन यांच्यात संवाद चालू होतात अन् माझा हात पकडून ते लिहिण्यासाठी सज्ज होतात. वही-पेन यांसारख्या निर्जीव वस्तूंनाही पुष्कळ आनंद होऊन ते मला सतत लिहिण्यासाठी आग्रह करतात. ‘या निर्जीव वस्तू श्रीकृष्णावर इतके भरभरून प्रेम करतात, तर मग मी का करू नये ?’, असे मला वाटले.

२ ई ४. इथे प्रत्येक निर्जीव वस्तूच्या भोवतीही पांढरा प्रकाश जाणवतो.

२ ई ५. मला येथे रात्री शांत झोप लागली आणि सकाळी वेळेवर जाग आली. सकाळी उठल्यावर मला प्रसन्न आणि शांत वाटत होते. माझ्या मनात कुठलेही विचार नव्हते आणि माझा नामजप चालू होता.

३. घरी गेल्यावर साधनेचे महत्त्व लक्षात येणे

३ अ. चित्रपटातील गाणी ऐकू लागल्यावर मन अस्थिर होऊन चिडचिड होऊ लागणे, सर्वच कृती चुकीच्या होऊ लागणे, त्यातून बाहेर पडता न येणे, मंदिरात जाऊन बसून भजने ऐकू लागल्यावर दीड मासाने स्थितीत पालट होणे : मी प्रतिदिन भजने आणि देवाची गाणी ऐकत होते, तेव्हा माझे चित्त स्थिर, आनंदी आणि शांत होते. मी चित्रपटातील गाणी ऐकायला लागल्यावर माझे चित्त अस्थिर होऊ लागले आणि मला राग येऊ लागला. मी अनावश्यक बोलू लागले. माझी कपडे घालण्याची पद्धतही बिघडली. मला दुसर्‍याचा अपमान करण्यात आनंद वाटू लागला. त्या स्थितीतून बाहेर यायला मला एक ते दीड मास लागला. मला प्रार्थना आणि नामजप यांचे भानच नसायचे. मला सतत आळस यायचा. मंदिरात जाऊन बसून भजने ऐकू लागल्यानंतर माझी स्थिती पालटली.

३ आ. अनेकांनी ‘साधनेचा नाद सोडा’, असे सांगणे; मात्र जो आनंद इथे मिळतो, तो कुठेही मिळत नसणे : रामनाथी आश्रमाची वास्तू चैतन्याने भारीत आहे. तशी ‘आपली स्पंदने चैतन्यमय होण्यासाठी आणि सदासर्वकाळ चैतन्य मिळावे’, यासाठी आपल्याला साधना करण्याचीच आवश्यकता आहे’, हे माझ्या लक्षात आले. साधना करायला लागल्यापासून मला आनंदी आनंद जाणवतो ! अनेक जण मला म्हणाले, ‘हा नाद सोडा’; पण हे सर्व सोडल्यावर जगण्यासाठी आहेच काय ? जो आनंद साधनेने मिळतो, जो ईश्वराच्या सान्निध्यात मिळतो, तो कुठेही मिळत नाही. ईश्वर दिसत नसला, तरी तो आणि त्याचे चैतन्य चराचरात आहे’, हे मला अनुभवता आले. या चैतन्याने मन निर्विचार आणि शांत झाले. आता माझ्या मनात कुठलाच विचार रहात नाही.

४. प्रार्थना आणि कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होत नाही, तरीही श्रीहरि माझ्यावर किती प्रेम करतो ! ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना ! परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने मला या अनुभूती आल्या. या अनुभूती नसून ‘ईश्वर या अनुभूतीतून मला साधना शिकवत आहे आणि माझा दृष्टीकोन पालटत आहे’, असे मला वाटते. त्यासाठी ईश्वर चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. कामिनी लोकरे, ठाणे (२.१२.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक