खिळखिळे पाकिस्तान !

 संपादकीय

पाकच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचा लाभ करून घेऊन भारताचे त्याला चारी मुंड्या चीत करावे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

आपल्याकडे ‘पेराल तसे उगवते’, अशी म्हण प्रचलित आहे. ही म्हण तंतोतंत सार्थ ठरवणारे उदाहरण म्हणजे पाकिस्तान ! पाकिस्तान त्याच्याच (कु)कर्मांची फळे भोगत आहे आणि यापुढेही भोगणार आहे. ‘आमच्या सरकारकडे देश चालवण्यापुरतेही पैसे शेष राहिलेले नाहीत’, अशी जाहीर स्वीकृती स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतीच दिली आहे. ‘हे आमच्यासमोरील मोठे आव्हान आहे’, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेने देशाच्या विकासावर पैसे अल्प व्यय केले; मात्र आतंकवाद पोसण्यासाठी प्रतिदिन कोट्यवधी रुपये उधळले. परिणामी आता पाकच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. एकीकडे अवाजवी सरकारी खर्च होत आहे आणि दुसरीकडे पैशांअभावी कर्जाचा डोंगर वाढत आहे. तेथे महागाईनेही उच्चांक गाठला आहे. इकडून तिकडून जमवाजमवी करून पैसे गोळा करण्याची वेळ इम्रान खान सरकारवर ओढावली आहे. त्यामुळे ‘पाकची अर्थव्यवस्था शेवटच्या घटका मोजत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक राष्ट्रांनी ‘जशास तसे’ ही नीती अवलंबत पाकला साहाय्य करणे बंद केले आहे. अर्थव्यवस्थेचे मोडलेले कंबरडे घेऊन पाकला जगभर भीख मागत हिंडावे लागणार आहे. ही स्थिती काही अचानक निर्माण झालेली नाही; पण ही होत आहे, हे लक्षात येत असतांनाही पाकने त्याचा आतंकवाद यत्किंचितही न्यून केला नाही. ही परिस्थिती उद्भवण्यास केवळ अन् केवळ तोच कारणीभूत आहे. अर्थकारण पाकला कधी जमलेच नाही. पाकने धर्मकारणाच्या नावाखाली केवळ भारतद्वेष जोपासला. धर्माच्या सूत्रावरूनच काश्मीरची मागणी सातत्याने लावून धरली आणि त्यासाठी आतंकवादाची कास धरली, तरी ‘भारताचे नंदनवन असणारे काश्मीर त्याला कधीच मिळणार नाही’, हीसुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे. ‘पाकिस्तानचा धर्म’ जोडण्याचे नव्हे, तर तोडण्याचेच काम अधिक करत असल्याने केवळ हिंसेच्या बळावर सत्ता टिकवून ठेवण्याचे तंत्र पाकला स्वतःलाच आता नेस्तनाबूत करायला निघाले आहे.

आतापर्यंत भारतद्वेषाच्या मुळावरच पाकिस्तान पोसला गेला आहे. पाकमधील हिंदूंवर होणारे अत्याचार, तेथे असणारे आतंकवादनिर्मितीचे कारखाने, तेथे कार्यरत असणार्‍या आतंकवादी संघटना, मोठ्या प्रमाणात केली जाणारी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची निर्मिती या सगळ्यांच्या विळख्यात पाकिस्तान पुरता अडकलेला आहे. याचा परिणाम देशाच्या विकासासाठी न होता देशाला दारिद्र्याकडे नेण्यात झाला आहे. पाकिस्तान आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यानेच निर्माण केलेल्या विवरात अडकला आहे. आज सर्व जग आतंकवादाने त्रस्त आहे. पाकची सद्यस्थिती पहाता त्याला साहाय्य करणार्‍या अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्याला आर्थिक कोंडीत पकडून तेथील आतंकवाद नष्ट करण्यास भाग पाडायला हवे. भारतानेही या संधीचा लाभ उठवून पाकला जगाच्या नकाशावरूनच पुसून टाकण्याच्या दिशेने काय संधी साधता येतील ? हे पहायला हवे !