|
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पाऊस चालू आहे. त्यामुळे भातशेतीसह अन्य पिके आणि बागायती यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना फवारणीसाठी औषधे द्यावीत, तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा, असा ठराव २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, विषय समिती सभापती, सदस्य, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
रेडी गावात नवीन खाण प्रकल्प होणार
रेडी गावात नवीन खाण प्रकल्प होणार आहे. याविषयी तेथील ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. ग्रामसभेत ‘हा प्रकल्प होऊ नये’, अशी भूमिका घेण्यात आली आहे. हा प्रकल्प रेडी गावात झाल्यास गावाची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी होणारी जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी सदस्य रणजीत देसाई आणि दादा कुबल यांनी केली. तसा ठराव या सभेत घेण्यात आला.
इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या अर्जात अन्य धर्मांचा उल्लेख; मात्र हिंदु धर्माचा उल्लेख टाळला ! – उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचा आक्षेप
महाराष्ट्रील विद्यमान महाविकास आघाडी सरकार हे हिंदुद्वेष्टे आहे. या सरकारने इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या अर्जातून ‘हिंदु’ शब्द गाळला आहे. या अर्जावर इतर सर्व धर्मांची नावे आहेत. केवळ हिंदु धर्माचे नाव नाही. त्याऐवजी ‘अल्पसंख्य नसलेले’, असा शब्द वापरला आहे. त्यामुळे या अर्जात तात्काळ पालट करावा, अशी मागणी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केली. (आतापर्यंत विविध माध्यमांतून हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न होत आहे. आता शासकीय स्तरावरूनही हिंदु धर्माचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे यातून स्पष्ट होते. यावर आक्षेप घेणारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचे अभिनंदन ! इतर हिंदू लोकप्रतिनिधींनीही म्हापसेकर यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या स्तरावर हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! – संपादक)