जत तालुक्यातून ५० सहस्र ऊसतोड कामगारांचे स्थलांतर !

प्रतिकात्मक चित्र

जत (जिल्हा सांगली), ७ डिसेंबर (वार्ता.) – दुष्काळी परिस्थितीमुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जत तालुक्यातील ५० सहस्र ऊसतोड कामगारांनी स्थलांतर केले आहे. २० एकर शेती असलेला शेतकरी ऊसतोड कामगार आहे. दुष्काळजन्य परिस्थिती मुळे आष्टा, भिलवडी, सांगली, वाळवा, कर्नाटक राज्य या ठिकाणी अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. जत तालुक्यात कामगारांच्या कामासाठी एकही मोठा उद्योग नाही. तरुण बेरोजगारांची संख्याही अधिक आहे.

जत साखर कारखाना राजकीय स्पर्धेत बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकासह कामगार आणि सभासद यांची मोठी हानी झाली आहे. ऊसतोड कामगार शासनाच्या अनेक सोयी-सुविधा यांपासून वंचित आहे. ऊसतोड कामगारांना मजुरी वाढवून दिली जात नाही. ‘ऊसतोड कामगार महामंडळा’ची घोषणा हवेतच विरली आहे. या महामंडळात आरोग्य विमा, आरोग्य सेवा, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शाळेची व्यवस्था इत्यादी गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

याविषयी जत येथील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘आमचा १ क्रमांकाचा शत्रू दुष्काळ आहे. त्याला हद्दपार करायचे आहे. त्याचसमवेत आमचा दुसरा शत्रू माता-भगिनींच्या हातातील उसाचा कोयता आहे. तो आम्हाला हद्दपार करायचा आहे. यासाठी मला जतच्या जनतेने निवडून दिले आहे. ऊसतोड कामगारांची संख्या अल्प करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेच्या जत तालुक्यातील कामांना गती देणार आहे.’’