सातारा येथे ‘राष्ट्रवादी भवना’वर दगडफेक करणार्‍यांची चौकशी करा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

पक्षातील कार्यकर्ते स्वतःच्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करत असतील, तर असे कार्यकर्ते असणार्‍या पक्षाचा कारभार कसा असेल ? – संपादक 

अजित पवार

सातारा, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्हा बँक निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी भवना’वर दगडफेक केल्याचे माझ्या कानावर आले. मी तातडीने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संपर्क करून दगडफेक करणार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

अजित पवार पुढे म्हणाले की, सहकारातील निवडणुका या राजकारणविरहित असतात. तेथील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी या निवडणुका असतात. या निवडणुका पक्षीय करून त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होतात. त्यामध्ये पक्षाचा काहीही संबंध नसतो. सातारा येथील दगडफेकीची घटना दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी होणार आहे.