संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी मनोविकारावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी मनोविकारावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

गायनसाधना

‘श्री. प्रदीप चिटणीस यांनी मनोविकार दूर करण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील पुरिया कल्याण, हंसध्वनी आणि देस हे ३ राग गायले. यांतील प्रत्येक रागाचा मनोविकारावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो. हे राग मनोविकार दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात ? यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. राग – पुरिया कल्याण

१ अ. राग पुरिया कल्याण ‘श्वासाची गती अल्प करून मनाचे कार्य अल्प करणे’, या तत्त्वावर मनोविकार दूर करण्याचे कार्य करत असल्याचे जाणवणे : राग पुरिया कल्याण आरंभ झाल्यावर माझ्या श्वासाची गती एकदम मंदावली. श्वास आत घेण्याचे आणि बाहेर सोडण्याचे प्रमाणही पुष्कळ अल्प झाले. श्वासाची गती एवढी अल्प झाली की, माझा श्वास चालू आहे कि नाही ?, असा प्रश्न मनात आला. श्वासाची गती अल्प झाल्यावर माझे ध्यान लागू लागले. ‘श्वासाची गती अल्प झाल्यावर आपल्या मनाचे कार्यही अल्प होते’, या तत्त्वावर ‘हा राग मनोविकार दूर करण्याचे कार्य करतो’, असे लक्षात आले.

१ आ. या रागामुळे मला माझ्या अनाहतचक्रावर थंडगार स्पंदने जाणवू लागली.

१ इ. ‘या रागाची स्पंदने लाटांसारखी नागमोडी, हळूवार आणि आनंददायी आहेत’, असे जाणवले.

१ ई. या रागामुळे माझी सुषुम्ना नाडी चालू झाली, तसेच माझ्या हाताच्या बोटांची आपोआपच आकाशतत्त्वाची मुद्रा

(अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे) झाली होती. (आकाशतत्त्व हे शांती देणारे आहे.)

१ उ. रागामुळे झिणझिण्या आल्यासारखी स्पंदने देहाच्या अवयवांत जाणवून तो तो अवयव शिथिल होत जाणे : या रागामुळे प्रथम माझ्या हातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखी स्पंदने निर्माण झाली. त्यानंतर माझे हात शिथिल झाले. पुढे माझ्या पायांत मला झिणझिण्या आल्यासारखी स्पंदने जाणवून माझे पायही शिथिल झाले. अशा रितीने माझा पूर्ण देह शिथिल झाला.

१ ऊ. संपूर्ण देह शिथिल झाल्यामुळे माझे ध्यान लागू लागले.

१ ए. ‘या रागामुळे मन अकार्यरत आणि संपूर्ण शरीर शिथिल होत असल्याने हा राग निद्रानाशाच्या विकारावरही परिणामकारक ठरेल’, असे मला वाटले.

श्री. प्रदीप चिटणीस

२. राग – हंसध्वनी

अ. रागाच्या आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. राग उत्साहवर्धक वाटला.

इ. मला अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला. रागाचा अनाहतचक्रावरच पूर्णपणे परिणाम होत असल्याचे जाणवले. अनाहतचक्रावर परिणाम होणे, म्हणजे मनावर परिणाम होणे.

ई. माझी सूर्यनाडी कार्यरत होऊ लागली. थोड्या वेळाने सूर्यनाडी पूर्णपणे कार्यरत झाली.

उ. रागाचा परिणाम चैतन्याच्या स्तरावर होत असल्याचे जाणवले.

ऊ. मला अनाहतचक्रावर पुष्कळ प्रमाणात थंडावा जाणवू लागला.

ए. या रागामुळे मन स्थिर आणि उत्साही होते, तसेच ते भक्तीरसात डुंबून जाते. अशा प्रकारे या रागाचा मनावर परिणाम होतो.

३. राग – देस

अ. देस रागाच्या आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

आ. देस रागाचा माझ्या अनाहतचक्रावर परिणाम होऊ लागला आणि तेथे मला थंडावा जाणवू लागला. ही प्रक्रिया केवळ २ मिनिटांत घडली.

इ. त्यानंतर मला माझ्या आज्ञाचक्रावर देस रागाची स्पंदने जाणवू लागली. या स्पंदनांचा परिणाम संपूर्ण डोक्यावर न होता केवळ आज्ञाचक्रावर होत होता. रागाची स्पंदने जडत्वविरहीत आणि हळूवार प्रक्रिया करणारी होती.

ई. पुढे २ मिनिटांतच माझी सूर्यनाडी कार्यरत असण्यासह चंद्रनाडीही कार्यरत होऊ लागली. याद्वारे माझी सुषुम्ना नाडी कार्यरत होण्याकडे प्रवास आरंभ झाला. तेव्हा माझी श्वास घेण्याची गती हळू होऊ लागली.

उ. या देस रागाची स्पंदने प्रथम २ मिनिटे अनाहतचक्रावर आणि त्यानंतर पुढे शेवटपर्यंत आज्ञाचक्रावर जाणवत होती. याचा अर्थ हा राग मन आणि बुद्धी यांना शांत करणारा आहे; पण अधिकतर बुद्धीला शांत करणारा आहे.

ऊ. देस रागगायन संपल्यावर मन शांत आणि हलके वाटू लागले, तसेच डोकेही हलके वाटू लागले. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत होती.

४. पुरिया कल्याण, हंसध्वनी आणि देस या रागांचा परिणाम

थोडक्यात, पुरिया कल्याण हा राग आपल्या श्वासाची गती अल्प करून शरीर आणि मन यांची चंचलता अल्प करतो. मन शांत करतो. मन शांत झाल्याने मनातील विचारही न्यून होतात. त्यामुळे मनाची अस्वस्थता दूर होते. एकदा मनाची अस्वस्थता दूर झाली की, त्यानंतर हंसध्वनी हा राग मनाला उत्साहित करण्याचे कार्य करतो; कारण तो राग उत्साहवर्धक आणि चैतन्य देणारा आहे. पुरिया कल्याण आणि हंसध्वनी हे दोन्ही राग अनाहतचक्रावर, म्हणजेच मनावर आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारे आहेत. राग देस मात्र अधिकतर आज्ञाचक्रावर, म्हणजेच बुद्धीवर आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारा आहे. त्या रागामुळे बुद्धी शांत होते. आधी मन शांत झाले की, बुद्धी सहजतेने शांत होते. अशा प्रकारे हे तिन्ही राग ऐकल्याने मन आणि बुद्धी स्थिर होते, तसेच त्यांना उत्साहही मिळतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.९.२०१८)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/530458.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक