मुलांची आई-वडिलांप्रती असणारी कर्तव्ये !

‘आई-वडील हे आपले मालक नाहीत, हे जितके खरे आहे, तितकेच ते आपले नोकर नाहीत, हेही खरे आहे. या जगात विनामूल्य काहीच मिळत नाही; पण आपले आई-वडील आपल्याला प्रतिदिन अन्न, वस्त्र आणि निवारा विनामूल्य देतात. ते इतर अनेक गोष्टीही देत असतात. ते चांगले शिक्षण आणि संस्कारही देतात. त्यासाठी वह्या, पुस्तके इत्यादी विविध साधनेही देतात. त्या बदल्यात आपण त्यांना काय देतो ? एक पैसुद्धा देत नाही आणि देऊही शकत नाही. आपण आजारी पडलो, तर ते दिवसरात्र आपली सेवा करतात. आपले लहानपणी मल-मूत्र स्वच्छ करणे, कपडे धुणे आदी कितीतरी कामे करतात. तेही न कंटाळता, न कुरकुरता आणि केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर प्रेमाने ! त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची आपण परतफेड करू शकत नाही. त्याचे पैशाने मोलही होऊ शकत नाही. निदान त्यांना मान देऊन त्यांनी सांगितलेली सेवा आणि कामे करणे, त्यांच्याप्रती कृतज्ञताबुद्धी बाळगून वागणे, उत्तम ज्ञान घेऊन त्यांना आणि स्वतःला आनंद मिळवून देणे, एवढे आपल्या हाती आहे. माणूस हातातल्या गोष्टीही करत नाही, तेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात. आपण आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि स्वतःमध्ये चांगले गुण वाढवले, तर चमत्कार घडेल !’

(साभार : मासिक ‘मनशक्ती’, जून २००४)