आजचे ज्येष्ठ नागरिक : एक सकारात्मक बाजू !

प्रातिनिधिक छायाचित्र

‘२० व्या शतकाच्या शेवटच्या दशकात तरुण पिढीपुढील आव्हाने वाढली. पूर्वीचे अभियंते (इंजिनिअर), आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, प्राध्यापक या व्यवसायांसमवेत माहिती तंत्रज्ञान, पर्यटन यांसारखी अधिक आकर्षक आणि भरपूर अर्थार्जन देणारी क्षेत्रे तरुणाईला खुणावू लागली. शहरामध्ये ‘फ्लॅट’ (सदनिका) संस्कृती निर्माण झाली. हातात भ्रमणभाष, कार्यालयात संगणक, हालचालीसाठी दुचाकी, चारचाकी वाहने यांमुळे जीवनाला गती आली. उजाडणारा दिवस केव्हा मावळला हेच समजेनासे झाले. ‘हम दो हमारे दो’ हा विचार मागे पडला. नवरा-बायको दोघेही पैसा आणि करियर यांच्या मागे लागले. परिणामी शहरामध्ये त्रिकोणी, चौकोनी कुटुंबे निर्माण झाली. समंजस तरुणाईने आपल्या आई-वडिलांना त्यात सामावून घेतले. काही जणांना मात्र आपले आई-वडील अडचण आणि अडगळ वाटू लागले. २१ व्या शतकातील नवीन वृद्धांच्या पिढीमध्ये कालप्रवाहानुसार पालट होणे अपरिहार्य आहे. नोकरी-व्यवसायातून निवृत्त झालेले वृद्ध सुशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या ठीक स्थितीत आहेत. निवृत्तीपूर्व नियोजनामुळे आणि गुंतवणुकीची अनेक क्षेत्रे निर्माण झाल्याने जाणकार वृद्ध हे निवृत्तीनंतर सुख-समाधानाने जीवन व्यतित करण्याची शक्यता वाढली. मुलगा म्हणजे, ‘वंशाचा दिवा किंवा म्हातारपणाची काठी’, हा विचार कालबाह्य होत चालला आहे. त्यामुळे मर्यादित संततीवर वृद्ध समाधान मानू लागले आहेत. प्रगत वैद्यकशास्त्र आणि आधुनिक जीवनपद्धती यांमुळे सर्वसाधारण माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले. मोजका आहार, पुरेसा व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यांकडे लक्ष दिल्यास वयाच्या पंच्याहत्तरी, ऐंशीपर्यंत स्त्री-पुरुष ठणठणीत राहू शकतात, हा विचार मान्य झालेला आहे; म्हणून ६० वर्षांवरील व्यक्तीला ‘वृद्ध’ किंवा ‘म्हातारा’ असे न संबोधता ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणावे, ही प्रथा रुढ होऊ पहात आहे. म्हातारपणही पूर्वीसारखे, ‘दंताजीचे उठले ठाणे, फुटले दोन्ही कान, नन्ना म्हणते मान’ असे राहिले नाही. आधुनिक वैद्यकशास्त्राने दातांची कवळी, डोक्यावर चष्मा, कानात श्रवणयंत्र, आवड असल्यास डोक्यावर विग (केसांचा टोप), अशी साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे आजचा वृद्ध हा तरुण झालेला आहे. आरोग्य शिबिरे, त्यातून होणार्‍या चाचण्या यांमुळे आरोग्यविषयीची जाणीव, जागृती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक चळवळीमुळे प्रवासात सवलती, आयकरामध्ये सूट, अधिकोषातील वाढीव व्याज दर आणि सार्वजनिक ठिकाणी अडथळ्याविना प्रवेश या सवलतींमुळे ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आजचे ज्येष्ठ नागरिक हे कीव करण्याजोगे नसून ते समाजाला भारभूत न होता समाजात मानाचे स्थान असलेले आणि देशाचे उत्तरदायी नागरिक म्हणून भूमिका पार पाडण्यास सक्षम आहेत.

वृद्धांचा होणारा लाभ !

या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला आहे की, आजचा ज्येष्ठ नागरिक मुलांचे सहकार्य असेल, तर त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात राहू शकतो. कुटुंब हा सर्वांत उत्कृष्ट वृद्धाश्रम आहे. हे तो जाणून आहे. कुटुंबातील सोपी सोपी कामे करून तो आपले उपयुक्तता मूल्य वाढवतो आणि उपद्रव मूल्य न्यून करतो. नातवंडांनाही आजी-आजोबा मिळतात. अशा रितीने तरुण पिढीला समजावून घेऊन आधुनिक वानप्रस्थाश्रमाचा आनंद घेतो.

मुले, सुना, नातवंडे स्वतंत्र आणि वृद्ध जोडपे स्वतंत्र रहात असेल, तर ‘मुले वेगळी राहिली’, असा मनस्ताप करून न घेता वस्तुस्थिती स्वीकारली जाते. सणावाराला एकत्र येतात. मुला-नातवंडांचे कौतुक करतात. मुले, सुना, नातवंडे परगावी, परप्रांती, परदेशी रहात असतील, तर त्यांच्याशी संपर्क ठेवतात. आपले मित्र, नातेवाईक आणि विशेषतः शेजारी यांच्याशी सतत संपर्कात रहातात; कारण ऐनवेळी तेच उपयोगी पडतात.

वृद्धाश्रम हे कुटुंब वाटण्यासाठी प्रयत्न व्हावेत !

‘आजचे वृद्धाश्रमसुद्धा विस्तारित कुटुंब व्हावे’, अशी अपेक्षा आहे. वृद्धांना खायला, प्यायला घालणार्‍या खानावळी, लॉजेस असे त्यांचे स्वरूप न रहाता ते विस्तारित कुटुंब म्हणजे ‘आपले घर आहे’, असे वृद्धांना वाटावे, या दृष्टीने आधुनिक वृद्धाश्रम होणे ही काळाची आवश्यकता आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्येष्ठांसाठी धोरण घोषित करावे !

ज्येष्ठ नागरिकांमध्ये २५ ते ३० टक्के वृद्ध हे दारिद्र्यरेषेखाली आहेत. हे वृद्ध विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी विभागात रहातात. हातावरचे पोट असलेली कुटुंबे शहरातसुद्धा आहेत. त्यांची स्थिती मात्र दयनीय आहे. दुर्बल आर्थिक स्थिती, अपुर्‍या आरोग्य सुविधा आणि सुरक्षिततेची आबाळ यांमुळे ज्येष्ठांच्या या समुहाकडे समाजाने अन् शासनाने लक्ष देणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यांच्यासाठी निवृत्ती योजना, औषधोपचार सुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांविषयी भरीव तरतूद करणे हे कल्याणकारी राज्याचे कर्तव्य आहे. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्येष्ठांसंबंधीचे त्यांचे धोरण घोषित करावे, अशी आग्रही भूमिका ज्येष्ठ नागरिक संघटना घेत आहेत.’

– राजाराम वाघ (साभार : मासिक ‘मनोहारी मनोयुवा’, नोव्हेंबर-डिसेंबर २०१३)