‘हलाल’ गुळाविषयी मुख्य पुजार्यांनी मत मांडावे ! – केरळ उच्च न्यायालयाचा निर्देश
हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिरातील प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर कशासाठी ? हा हिंदुद्रोह असून भक्तांचा विश्वासघात आहे. यासाठी उत्तरदायींवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! यासाठी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनीही पुढाकार घेतला पाहिजे ! – संपादक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिराच्या ‘अरावणा’ आणि ‘अप्पम्’ या प्रसाद बनवण्यासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर केला जात आहे. या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मंदिराच्या मुख्य पुजार्यांना याविषयी त्यांचे मत मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एस्.जे.आर. कुमार यांनी मुख्य पुजार्यांचे मत जाणून घेण्याची मागणी केली होती. मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्या ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ने यापूर्वी न्यायालयात सांगितले होते की, प्रसादामध्ये जो गुळ वापरला जातो, त्याच्या पाकिटावर ‘हलाल’ असे लिहिण्यात आले असून हा गुळ अरब देशांमध्ये निर्यात केला जातो. अशा गुळाचा वापर यंदाच्या वर्षापासून करण्यात येत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये या गुळाची चाचणी केली असता, तो मनुष्याला खाण्यायोग्य नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याचा लिलाव करण्यात आला. प्राण्यांचे जेवण बनवण्यासाठी हा गूळ एका आस्थापनाला देण्यात आला आहे.
१. ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ने कुमार यांच्यावर आरोप करतांना म्हटले आहे की, त्यांनी दिलेली माहिती खोटी आणि आधारहीन आहे. ‘अरावणा’ आणि ‘अप्पम्’ यांची विक्री सध्या रोखण्यात आल्यामुळे ‘बोर्डा’ची आर्थिक हानी होत आहे. (ही ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ला एक प्रकारे मिळालेली शिक्षाच म्हणावी लागेल. यापुढे ‘बोर्डा’ने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये, असा धडा त्याने यातून घेतला पाहिजे ! – संपादक)
२. केरळमधील सत्ताधारी माकपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा ‘बोर्डा’चे अध्यक्ष अनंतगोपाल यांनी म्हटले की, मंदिराला अपकीर्त करण्यासाठी आणि प्रसादाची विक्री अल्प करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही अशा लोकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सायबर विभागाचे साहाय्य घेत आहोत. (येथे ‘बोर्डा’कडूनच न्यायालयात स्वीकृती दिली जात असतांना येथे अफवा पसरवण्याचा काय संबंध ? अशा प्रकारे दिशाभूल करणार्या अध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)