रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती

कु. अश्विनी खत्री

१. रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी

१ अ. परात्पर गुरुदेवांनी स्वप्नात दर्शन देणे आणि त्यानंतर रामनाथी आश्रमात येऊन सेवा करण्याची संधी मिळणे : ‘परात्पर गुरुदेव, मी रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी आपण माझ्या स्वप्नात आलात आणि मला दर्शन दिले. नंतर आपण मला म्हणालात, ‘आत ये.’ त्यानंतर मला २५ दिवस रामनाथी आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

१ आ. परीक्षा देऊन आश्रमात यायला मिळणार असल्याचे कळल्यावर भाव जागृत होणे : आश्रमात येण्यापूर्वी माझे वडील मला म्हणाले होते, ‘‘आश्रमात जायचे नाही.’’ त्यात माझी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. त्या वेळी मी विचार केला, ‘मला काहीही करून आश्रमात जायला मिळायला हवे’; म्हणून मी २ वेगवेगळ्या दिनांकांची प्रवासाची तिकिटे काढली होती. परीक्षेचा दिनांक अद्याप घोषित झाला नव्हता, तरीही मी दिनांक २४ चे आरक्षण केले. ‘त्या दिनांकाला परीक्षा नसणार’, असे मला वाटले होते. त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक समजले. शेवटचा पेपर दिनांक २४ ला दुपारी १.३० ते ४.३० या कालावधीत होता आणि त्याच रात्री ९ वाजता आमची आगगाडी होती. त्या वेळी माझा भाव पुष्कळ जागृत झाला.

२. रामनाथी आश्रमात आल्यावर

२ अ. सेवा करतांना ‘गुरुदेवच सेवा करवून घेत आहेत’, असे वाटून थकवा न येणे : मी आश्रमात सेवा करते. त्या वेळी ‘२४ घंटे सेवाच करत राहूया’, असे मला वाटते. मला मुळीच थकवा येत नाही; कारण ‘गुरुदेवच सेवा करवून घेत आहेत. मी काहीच करत नाही’, असे मला जाणवते.

२ आ. साडी नेसता येत नसल्याने ‘देवीच साडी नेसवत आहे’, असा भाव ठेवून साडी नेसणे आणि त्यानंतर आश्रमातील साधिकांनी कौतुक करणे : मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘आज मकरसंक्रांत आहे, तर मला साडी नेसायची आहे’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु नंतर मी विचार केला, ‘मला साडी नेसताच येत नाही. मग मी कशी काय साडी नेसणार ?’ त्यानंतर सकाळी उठून स्नान केल्यावर मी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगितले, ‘हे गुरुदेवा, मला साडी नेसता येत नाही, तरी आपणच मला शिकवा.’ तेव्हा ‘देवीच मला साडी नेसवत आहे’, असा भाव ठेवून मी साडी नेसले. तेव्हा आश्रमातील साधिकांनी माझे पुष्कळ कौतुक केले. साधिका म्हणाल्या, ‘‘तू पुष्कळ सुंदर दिसतेस.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मी या साडीत सुंदर दिसणारच; कारण मला साक्षात् देवीने साडी नेसवली आहे.’ त्या वेळी माझा भाव पुष्कळ जागृत झाला.’

– कु. अश्विनी खत्री, उज्जैन, मध्यप्रदेश. (२६.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक