दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना हानीभरपाईसाठी ८ कोटी संमत !

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान

पुणे – जून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव यांसह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये बाधित शेतकरी आणि लोक यांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली. तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाकडून साहाय्य मिळण्याच्या प्रतीक्षेत होते; मात्र आमदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी असंख्य वेळा पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी ८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी संमत केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार संबंधित तालुक्यांना एका दिवसात या निधीचे वाटप केले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी दिली. चक्रीवादळामध्ये घरे, गुरांचे गोठे, पॉलिहाऊस, कांद्याच्या बराखी तसेच नेटशेड यांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती. पुणे जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ७७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. अतिरिक्त १० कोटी निधीच्या केलेल्या मागणीपैकी शासनाने ८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.