-
राज्याचे अन्न आणि औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित !
-
तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न !
बुलढाणा – सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ३ दिवसांपासून चालू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला १९ नोव्हेंबर या दिवशी हिंसक वळण लागले. या आंदोलनाची प्रशासनाकडून नोंद न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी रस्ता बंद करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर रात्री अज्ञातांनी येथील तहसीलदार कार्यालयात उभ्या असणार्या तहसीलदारांच्या वाहनाला पेटवण्याचा प्रयत्न केला; मात्र समयसूचकतेने वेळीच वाहनाला लागलेली आग विझवण्यात आली. या प्रकरणी तहसील विभागाकडून वाहन पेटवण्याविषयी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
१. ‘सोयाबीनला प्रतिक्विंटल दर ८ सहस्र रुपये आणि कापसाचा दर प्रतिक्विंटल १२ सहस्र रुपये स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, पाम तेलावरील आयात कर पूर्वीप्रमाणे ३० टक्के करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला ‘जी.एस्.टी’ हटवण्यात यावा, छोट्या व्यापार्यांवरील मर्यादित साठा उठवण्यात यावा, कापणी पश्चात हानीच्या संदर्भातील दिनांकाचा घोळ न घालता महाराष्ट्राच्या कृषी विभागानुसार विम्याची रक्कम संमत करावी आणि राज्य सरकारने अतीवृष्टीग्रस्तांना ५० सहस्र रुपये तात्काळ साहाय्य करावे, तसेच कृषीपंपाची वीज तोडणी थांबवावी, या मागण्यांसाठी नागपूर येथील संविधान चौक येथे १७ नोव्हेंबरपासून तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटनेने अन्नत्याग आंदोलन चालू केले होते. रविकांत तुपकर यांनी तिसर्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन चालूच ठेवले होते.
२. १८ नोव्हेंबर या दिवशी तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ‘गाव बंद’ आंदोलन केले.
३. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची सरकार स्तरावर कोणतीही नोंद न घेतल्यामुळे १९ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफीक आणि शेख करीम यांनी तुपकर यांच्या आंदोलन मंडपासमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना वेळीच रोखण्यात आले. त्यांना नंतर उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन स्थगित !
बुलढाणा – राज्याचे अन्न आणि औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी २० नोव्हेंबर या दिवशी आंदोलन स्थगित केले आहे. डॉ. शिंगणे यांनी सकाळीच आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तुपकर यांच्या मागण्यांच्या संदर्भात अधिकार्यांसमवेत येत्या २४ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयात बैठक घेतली जाईल आणि केंद्र सरकारकडील मागण्यांच्या संदर्भात राज्यशासनाकडून पाठपुरावा केला जाईल’, असे आश्वासन दिले. राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दूरभाषद्वारे केंद्र सरकारमधील शेतकर्यांसाठी ज्या मागण्या आहेत, त्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या वेळी तुपकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.