छत्तीसगड येथे १ सहस्र २०० धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

छत्तीसगड येथे १२०० लोकांची हिंदू धर्मात ‘घर वापसी’

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील पत्थलगावातील खुंटापानी येथे जशपूर राजपरिवारचे सदस्य तथा भाजपचे प्रदेश मंत्री प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी ४०० परिवारांतील १ सहस्र २०० लोकांचे पाय धुवून त्यांना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला. या वेळी रायगड राजघराण्याचे देवेंद्र प्रताप सिंह, आर्य समाजाचे अंशुल देव महाराज यांच्यासह सहस्रो जण उपस्थित होते. हा कार्यक्रम आर्य समाज आणि हिंदूंनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी येथे आर्य समाजाकडून ‘कलश यात्रा’ काढण्यात आली. यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. यासह येथे ३०० युवकांनी दुचाकी वाहनाद्वारे फेरी काढली होती. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. पुनर्प्रवेश केलेल्या हिंदूंच्या पूर्वजांनी ३ पिढ्यांपूर्वी धर्मांतर केले होते. ते त्या वेळी अत्यंत गरीब होते. त्यांना विविध आमीषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.

हिंदुत्वाचे रक्षण करणे, हा माझ्या जीवनाचा एकमात्र संकल्प ! – प्रबल प्रताप सिंह जूदेव

या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना प्रबल प्रताप सिंह जूदेव म्हणाले की, हिंदुत्वाचे रक्षण करणे, हा माझ्या जीवनाचा एकमात्र संकल्प आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत आहेत. कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्‍यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.