मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

दीपावलीच्या आरंभी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकांच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा !

मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी (वय ४९ वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर (वय ६० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

रामनाथी (गोवा), १५ नोव्हेंबर (वार्ता.) – दीपावलीत घरोघरी सजावट केली जाते. दिव्यांमुळे घर उजळून निघते. सनातनच्या साधकांसाठी मात्र दीपावली ही वर्षातून केवळ एकदाच नसून प्रतिदिनच असते; कारण गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने प्रतिदिनच साधक साधनेचे प्रयत्न करून अंतरात भक्तीरूपी सजावट आणि ज्ञानरूपी प्रकाश अनुभवण्यासाठी, म्हणजेच आत्मदीपावली साजरी करण्यासाठी प्रयत्नरत असतात. साधकांचा आत्मोद्धार, हीच खरी आत्मदीपावली ! याचाच दिव्य अनुभव यंदाच्या वसुबारसच्या शुभदिनी (१ नोव्हेंबर २०२१ या दिवशी) रामनाथी आश्रमातील साधकांनी घेतला.

सौ. निवेदिता जोशी यांचा सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
सौ. रेखा माणगावकर यांचा सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

मूळच्या नंदुरबार येथील आणि सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (वय ४९ वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा राघवेंद्र माणगावकर (वय ६० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे एका अनौपचारिक सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले. या सत्संगाला सौ. निवेदिता जोशी यांची कन्या कु. सानिका जोशी, मुलगा श्री. ईशान जोशी, तसेच सौ. रेखा माणगावकर यांचे पती श्री. राघवेंद्र माणगावकर, मुलगा श्री. वैभव, कन्या सौ. श्रेया गावकर आणि जावई श्री. रेषक गावकर यांच्यासह प्रसारसेवा करणारे काही साधक उपस्थित होते. सौ. निवेदिता जोशी यांचे पती श्री. योगेंद्र जोशी हे संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाईन) या सत्संगात सहभागी झाले होते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकांविषयी काढलेले कौतुकोद्गार

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सौ. रेखा माणगावकर भावाच्या स्तरावर राहून साधनेचे प्रयत्न करतात !

‘सौ. रेखा माणगावकर यांच्या मनात गुरूंविषयी अपार भाव आहे. त्या भावाच्या स्तरावर राहून साधनेचे प्रयत्न करत असतात. सौ. माणगावकर यांच्यामध्ये पुष्कळ तळमळ आहे. पूर्वी त्या कर्नाटकातील धारवाड ते कित्तुर असा ३० कि.मी.चा प्रवास करून धर्मप्रसार करायच्या आणि धर्मप्रेमी अन् हितचिंतक यांना धर्मकार्यात जोडून ठेवायच्या. बरेच साधक समाजात जाऊन साधनेचे महत्त्व सांगतात, समाजातून धर्मकार्यासाठी अर्पण घेतात; पण नातेवाइकांकडून अर्पण घेतांना काही साधकांना संकोच वाटतो. तेथे गुरुकार्यापेक्षा वैयक्तिक नातेसंबंध भावनिकतेने जपण्याकडे कल जाणवतो. सौ. माणगावकर काकूंचे नातेवाइकांवर खरे प्रेम आहे, त्यामुळे केवळ भावनिक नाते जपण्याऐवजी त्यांचे कल्याण व्हावे, यासाठी त्या नातेवाइकांनाही साधना सांगतात. गुरुकार्यासाठी प्रसंगी त्यांच्याकडून अर्पण घेतांना काकूंना संकोच वाटत नाही. अशा प्रकारे काकू नातेवाइकांना आध्यात्मिक स्तरावर जोडून ठेवतात. पूर्वी कर्नाटक येथे प्रसारसेवा करून त्या आता गोव्यात स्थायिक झाल्या आहेत. असे असूनही त्यांनी कर्नाटकातील धर्मप्रेमी आणि प्रतिष्ठित यांना धर्मकार्याशी जोडून ठेवले आहे. भगवंताचे कार्य दैवी असल्याने ते होतच असते; पण ज्याची तळमळ असते, त्याला भगवंत माध्यम म्हणून निवडतो.’

२. सौ. निवेदिता जोशी या चैतन्याच्या स्तरावर भगवंताशी जोडलेल्या आहेत !

‘सौ. निवेदिता जोशी या रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांनी रामनाथी भूवैकुंठ असल्याचे भावाच्या स्तरावर अनुभवण्याचा प्रयत्न केला. देवतांना प्रत्यक्ष पहाण्याएवढी आपली क्षमता नाही; पण चैतन्याच्या माध्यमातून आपण देवतांचे सूक्ष्मातील अस्तित्व अनुभवू शकतो. भावावस्थेत राहून देवतांचे अस्तित्व अनुभवणार्‍या सौ. निवेदिता जोशी या अशा प्रकारे चैतन्याच्या स्तरावर भगवंताशी जोडलेल्या आहेत.

सनातनच्या आश्रमात अनेक साधक साधना शिकण्यासाठी येतात. आश्रमातील चैतन्य आणि साधनेला अनुकूल असलेले वातावरण यांमुळे साधकांना ‘आश्रमातच राहून साधना करावी’, ‘नियोजित कालावधी संपल्यानंतरही घरी परत जाऊ नये’, असे वाटते. जिल्ह्यांमध्ये अध्यात्मप्रसार, धर्मप्रसार करणार्‍या साधकांना दीर्घकाळ रामनाथी आश्रमातच रहावे वाटणे, हा व्यष्टी साधनेच्या स्तरावरचा विचार झाला ! सौ. जोशीकाकूंना ‘आपण आश्रमात साधना शिकून येथे शिकायला मिळालेली सूत्रे स्वत: आचरणात आणण्यासह समष्टीमध्येही जाऊन सांगावी’, अशी तळमळ आहे. यावरून लक्षात येते की, त्यांची व्यष्टी साधनेसहित समष्टी साधनाही चांगल्या प्रकारे चालू आहे.


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

१. गुरुकृपेने साधनेचे क्रियमाण  वापरून प्रारब्धावरही मात करू शकतो !

प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) साधकांवर अपार कृपा आहे. आपले गुरु एवढे महान आहेत की, ते प्रत्येक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारच आहेत. ते प्रत्येकाला मोक्षाला घेऊन जाणारच आहेत. त्यामुळे अशा महान गुरूंवर अपार श्रद्धा ठेवून आपण साधनेचे क्रियमाण वापरूया. साधनेचे योग्य क्रियमाण वापरल्यास गुरुकृपेने आपण प्रारब्धावरही मात करू शकतो.

२. साधकांनी झोकून देऊन साधना केल्यास  हिंदु राष्ट्र येण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही !

मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला त्यांच्या दिव्य चरणांशी आणले आहे. प्रत्येक साधकामध्ये अशी तळमळ हवी की, गुरुदेवांनी माझ्यासाठी एवढे केले आहे, तर मी गुरुचरणी किती कृतज्ञता व्यक्त करू ? गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी मी स्वत:ला किती झोकून देऊ ? ‘आपल्याला प्रयत्न करायला हवेत’, असा केवळ विचार नको, तर ते प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे. साधकांनी झोकून देऊन व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यास हिंदु राष्ट्र येण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. गुरुकृपेने ते प्रत्यक्षात शीघ्रतेने अवतरेल.

३. गुरुतत्त्व अनुभवत गुरूंची कीर्ती सर्वत्र करूया !

गुरूंच्या कृपेने धर्मप्रसारही पुष्कळ वाढत आहे. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’लाही पुष्कळ प्रतिसाद मिळत आहे, हे आपण अनुभवत आहोत. साक्षात् गुरूंचीच ज्ञानशक्ती सर्वत्र कार्यरत झाली आहे आणि तीच सर्व कार्य करत आहे. आपण सर्वत्रच ही अनुभूती घेत आहोत की, प्रत्यक्ष गुरुतत्त्वच सर्वत्र अध्यात्मप्रसार आणि धर्मप्रसार यांचे दैवी कार्य करत आहे. आपला देह, मन आणि बुद्धी यांना मर्यादा आहेत; मात्र गुरुतत्त्वाला कार्य करण्यास कोणत्याच मर्यादा नाहीत. ते अमर्याद आहे. या गुरुतत्त्वाची आपणही अनुभूती घेत गुरूंची कीर्ती सर्वत्र करूया !

अशी झाली सौ. निवेदिता योगेंद्र जोशी आणि सौ. रेखा राघवेंद्र माणगावकर यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंददायी घोषणा !

‘सत्संगाच्या आरंभी भावार्चना करण्यात आली. या भावार्चनेमध्ये साधकांना ‘गुरुदेवांनी आतापर्यंत आपल्यासाठी काय काय केले ?’ हे आठवून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगण्यात आले. साधकांनी ‘भावार्चनेच्या वेळी काय अनुभवले ?’ याविषयी सांगितले.

रामनाथी आश्रमात सौ. निवेदिता जोशी यांना आलेल्या अनुभूती !

सौ. निवेदिता जोशी

या वेळी सौ. निवेदिता जोशी म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी मला या रामनाथी आश्रमात आणले, तसेच ते मला विविध माध्यमांतून पुष्कळ शिकवत आहेत, यासाठी कृतज्ञता वाटते. रामनाथी आश्रमात आल्यापासून ‘मी भूतलावर नसून वैकुंठातच आहे’, असे वाटते. चालतांना ‘मी भूमीवर चालत नसून हवेत तरंगत आहे’, असे वाटते. थोडे जेवण केले, तरी पोट भरते. वापरून झालेले कपडे धुतांनाही ‘ते स्वच्छच आहेत. त्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी साबणचुरा (कपडे धुण्याची पावडर) वापरण्याची आवश्यकता नाही’, असे वाटते. वैकुंठात (रामनाथी आश्रमात) एवढे चैतन्य आहे की, स्वत:वर आवरण येतच नाही, असे जाणवते. सतत आनंदच अनुभवता येतो.’’

सेवा आणि साधना यांसाठीच गुरुदेवांनी कठीण प्रसंगातून वाचवले असल्याची अनुभूती घेणार्‍या सौ. रेखा माणगावकर !

सौ. रेखा माणगावकर

सौ. रेखा माणगावकर यांनी स्वत: अनुभवलेली भावस्थिती सांगितली. सत्संगाच्या आरंभीपासूनच सौ. माणगावकरकाकू यांचा भाव जागृत होत होता. भावार्चनेच्या वेळी त्यांनी अनुभवलेली भावस्थिती सांगतांना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी ‘जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये गुरुदेवांनी आपल्याला (सौ. माणगावकरकाकूंना) कसे वाचवले ?’ याविषयीचे १-२ प्रसंग अत्यंत कृतज्ञताभावाने सांगितले. सौ. माणगावकरकाकू म्हणाल्या, ‘‘माझ्याकडून सेवा आणि साधना करवून घेण्यासाठीच गुरुदेवांनी मला वाचवले आहे’, असे मला वाटते. मारुतीने छाती फाडल्यानंतर जसे त्याच्या हृदयात श्रीरामाचे दर्शन झाले, त्याप्रमाणे आपल्या हृदयातही केवळ गुरुचरणच असायला हवेत.’’

हे आत्मनिवेदनरूपी मनोगत व्यक्त करत असतांना सौ. माणगावकरकाकूंचा भाव दाटून आला. अशा प्रकारे सौ. निवेदिता जोशी आणि सौ. रेखा माणगावकर या दोघींचे भावपूर्ण मनोगत ऐकून साधक भावावस्था अनुभवत असतांनाच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्या दोघी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले. त्यामुळे साधकांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.


६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर सौ. निवेदिता जोशी यांनी व्यक्त केलेले मनोगत

‘पातळी घोषित झाल्यावर सूक्ष्मातून गुरुचरण दिसले आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. मी साधनेचे प्रयत्न करण्यात अजून पुष्कळ अल्प पडते. ‘अजून पुष्कळ प्रयत्न केले पाहिजेत’, असे वाटत आहे. मधे मधे स्वतःची ६० टक्के आध्यात्मिक पातळी व्हावी, असे विचार यायचे, तेव्हा मी विचार करत असे की, आपण वैकुंठात (रामनाथी आश्रमात) आहोत, यापेक्षा मोठे भाग्य ते काय !  ‘येथे जे जे अनुभवले आणि जे जे शिकायला मिळाले, ते प्रसारात जाऊन कधी एकदा सर्वांना सांगू ?’, असे वाटत आहे.’


६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर सौ. रेखा  माणगावकर यांनी व्यक्त केलेले मनोगत

‘मला एकदा स्वप्न पडले होते. त्यामध्ये मला गुरुदेवांनी विचारले, ‘‘तुला आध्यात्मिक पातळी हवी कि मी हवा ?’’ तेव्हा मी गुरुदेवांना म्हटले, ‘‘आध्यात्मिक पातळी नसली, तरी चालेल; पण मला केवळ आणि केवळ गुरुचरणच हवे आहेत.’’ एवढे बोलताच सौ. माणगावकरकाकूंचा भाव दाटून आल्याने त्या पुढे काहीच बोलू शकल्या नाहीत.’


सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. योगेंद्र जोशी (पती)

‘ही आनंदवार्ता ऐकून गुरूंविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. सौ. निवेदिता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंडपणे गुरुस्मरण करत असतात. गुरुवारचा राष्ट्रीय भक्तीसत्संग त्या अत्यंत समरस होऊन ऐकत असतात. त्यांना पाहून मलाही सत्संग ऐकावेसे वाटतात. सौ. निवेदिता जेव्हा साधकांचे व्यष्टी साधनेचे आढावे आणि सत्संग घेतात, तेव्हा त्या पुष्कळ तळमळीने साधकांना साधनेविषयी सांगत असतात. ते पाहून बर्‍याचदा मीही ते सत्संग ऐकण्यासाठी तेथे बसतो. त्या एवढ्या निर्मळतेने सांगत असतात की, मी तो भाव अनुभवायला स्वत: किती अल्प पडतो, याची जाणीव होते.

२. कु. सानिका जोशी (कन्या)

ही वार्ता ऐकून अत्यंत आनंद झाला. आधी आईला इतरांकडून अपेक्षा असायच्या. आता त्या न्यून झाल्या आहेत. ‘तिची प्रगती होत आहे’, असे जाणवत होते. नंदुरबार जिल्ह्यातील साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना आई साधकांमध्येही तळमळ जागृत होईल, एवढ्या तळमळीने सूत्रे सांगते.

३. श्री. ईशान जोशी (मुलगा)

आईला लहानपणापासूनच संतांची सेवा करायला मिळाली. तिच्या या पुण्याईमुळेच तिला आज हा दिवस पहायला मिळाला. तिच्यामुळेच मी आणि माझी बहीण साधनेत आलो. आम्ही आश्रमात पूर्णवेळ आहोत, ते तिच्या पाठिंब्यामुळेच !’


सौ. रेखा माणगावकर यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. राघवेंद्र माणगावकर (पती)

‘सौ. माणगावकर यांच्यामध्ये साधना आणि सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. त्या पूर्वी अध्यात्मप्रसाराची सेवा करत होत्या. त्या वेळी त्यांनी अनेक जिज्ञासूंना सनातनच्या कार्याशी जोडले आहे. (याविषयी १-२ प्रसंग सांगतांना श्री. माणगावकर यांचाही भाव जागृत झाला.)

२. श्री. वैभव माणगावकर (मुलगा)

आज सत्संग असल्याचा निरोप मिळाल्यावर ‘आईची आध्यात्मिक पातळी घोषित होईल’, असे वाटत होते.

३. सौ. श्रेया रेषक गावकर (कन्या)

मागील काही वर्षांपासून आईमध्ये पालट जाणवत आहेत. ‘तिची आध्यात्मिक पातळी कधी घोषित होईल ?’, याची मी वाटच पहात होते. आईला पातळीविषयी विचारल्यावर ‘आपल्याला पातळीत अडकायचे नाही. आपल्याला देवाच्या चरणी जायचे आहे’, असे ती म्हणायची.

४. श्री. रेषक गावकर (जावई)

‘सौ. माणगावकरकाकू प्रतिष्ठित धर्माभिमान्यांना धर्मकार्याशी कसे जोडून ठेवतात ?’ हे शिकण्यासाठी मी त्यांच्यासमवेत थांबतो, म्हणजे मला आमच्या भागातही असाच धर्मप्रसार करता येईल. काकूंकडून पुष्कळ शिकायला मिळते. श्री. माणगावकरकाका आणि काकू दोघेही आमच्या घरी आले, तरी त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अन् नामजप चालूच असतात.

क्षणचित्रे

१. ‘सत्संगानंतर सौ. रेखा माणगावकर आणि त्यांचा मुलगा श्री. वैभव माणगावकर यांची पुष्कळ भावजागृती झाली. दोघेही हात जोडून एकमेकांना नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त करत होते. सौ. माणगावकर श्री. वैभव यांना म्हणाल्या, ‘‘तुमच्यामुळे झाले. (प्रगती झाली)’’ श्री. वैभव आईला म्हणाले, ‘‘तुझ्यामुळे आम्हाला गुरुदेव मिळाले !’’ आई आणि मुलगा यांची ही भावमय भेट अनुभवतांना उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला.’’

२. सौ. निवेदिता जोशी आणि सौ. रेखा माणगावकर यांनी एकमेकींना प्रेमाने आलिंगन दिले. त्या वेळी ‘गुरुदेवांनी आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले, याचा आनंद त्या व्यक्त करत आहेत’, असे उपस्थितांना जाणवले.

३. सत्संगाच्या वेळी ढग गडगडून पाऊस आला. जणू निसर्गाने ही आनंददायी घोषणा ऐकून आनंद व्यक्त केल्याचे जाणवले.’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक