|
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दान घेतलेल्या १३ सहस्र ७५८ श्री गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जन केले. मग या मूर्ती दान केल्या असे म्हणता येईल का ? असा प्रश्न करत महापालिकेकडून दान घेतलेल्या मूर्तींचे विसर्जन करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे. २९ सहस्र ९८ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले, तर एकही मूर्ती दान झाली नसल्याची माहिती महापालिकेने नाईक यांना दिली आहे.
याविषयी बोलतांना नाईक म्हणाले की, महापालिकेकडून मूर्तीदान घेतल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात दान केलेल्या मूर्ती एका बंद पडलेल्या खाणीमध्ये नेल्या जातात आणि तिथे यंत्राद्वारे विसर्जित केल्या जातात. मूर्तींचे विधीवत् विसर्जन केले जात नाही. मग या मूर्ती दान केल्या असे म्हणता येईल का ? नागरिकांनीच मूर्तींचे विसर्जन केले, तर महापालिकेला काय अडचण आहे ? महापालिका नागरिकांचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही. नागरिकांनीच मूर्ती विसर्जित केल्या तर श्रद्धा जपली जाईल.