जीवनातील कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर सामोरे जाणार्‍या धाराशिव येथील सौ. सुमन विरुपाक्ष स्वामी (वय ५७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सुमन स्वामी (उजवीकडे) यांना श्रीकृष्णाचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

धाराशिव, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांवर साधनेच्या बळाने मात करणार्‍या, तसेच तळमळीने सेवा करणार्‍या धाराशिव येथील सौ. सुमन विरुपाक्ष स्वामी (वय ५७ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होऊन त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दिली. ३ नोव्हेंबर या दिवशी येथील साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता दिली. या आनंददायी प्रसंगी पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सौ. सुमन स्वामी यांचा श्रीकृष्णाचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांनी सौ. स्वामी यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली, तर सौ. स्वामी यांच्या कुटुंबियांसह साधकांनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.

सौ. सुमन स्वामी

सौ. स्वामी यांनी कुटुंबातील दु:खद प्रसंगावर साधनेच्या बळावर मात केली ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

४ वर्षांपूर्वी सौ. स्वामी यांच्या मुलाचे अचानक निधन झाले होते. या दु:खद प्रसंगावर काकूंनी साधनेच्या बळावर सकारात्मकतेने मात केली. त्यामुळे त्यांची साधनेत जलद प्रगती झाली आहे.

नातेवाइकांचे मनोगत

सौ. स्वामी यांच्यामध्ये सेवेची तीव्र तळमळ आहे ! – श्री. विरूपाक्ष स्वामी (सौ. सुमन स्वामी यांचे पती)

सौ. सुमन स्वामी यांच्यामध्ये सेवेची तीव्र तळमळ आहे. व्यष्टी आढावा देण्याची वेळ आणि जेवणाची वेळ एकच आल्यास त्या आधी व्यष्टी आढावा देण्यास प्राधान्य देतात.

आई सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असते ! – सौ. शीतल बेटकर (सौ. सुमन स्वामी यांची मुलगी)

आई सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असते. ती सेवा करतांना सेवेत पूर्णपणे एकाग्र होऊन सेवा करते. आम्ही काही बोलत असलो, तरी तिच्या मनात सतत सेवेचेच विचार असतात.

गुरुदेव सतत समवेत आहेत याची अनुभूती येते ! – सौ. सुमन स्वामी

मनोगत व्यक्त करतांना सौ. सुमन स्वामी यांनी सांगितले की, कठीण प्रसंगाला सामोरे जातांना गुरुदेवांचा धावा करत होते. मुलाचे अचानक निधन झाल्यानंतर ‘गुरुदेवा तुम्हीच त्याचे रक्षण करा’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती. त्यानंतर मी आणि यजमान रामनाथी आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तुमचा मुलगा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला आहे’, असे कळवल्यावर पुष्कळ आनंद झाला. तो योग्य ठिकाणी गेल्याचे समाधान वाटले. त्यानंतर माझे गुरुदेवांशी सतत अनुसंधान असायचे. मनाचा निश्‍चय केला, ‘कुठेही गेले तरी सेवा चालूच ठेवायची.’ तेव्हापासून प्रत्येक सेवा करतांना ‘गुरुदेव समवेत आहेत’, असे जाणवत आहे.

सौ. सुमन स्वामी यांच्याविषयी पू. (कु.) दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (कु.) दीपाली मतकर

१. सेवेची तळमळ

अ. सौ. सुमनकाकू यांना शारीरिक त्रास असूनही त्या तळमळीने सेवा करतात. ‘सौ. सुमन स्वामीकाकू सेवा करतांना कधी थकत नाहीत. त्या सतत सेवारत रहाण्यासाठी प्रयत्न करतात.

आ. काकूंकडे अनेक सेवा आहेत. काकू प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात. काकूंना सेवेसंबंधी एखादे सूत्र लक्षात आले नसल्यास त्या ते विचारतात आणि ती सेवा परिपूर्ण करतात.

इ. मुलीच्या घरी गेल्यावर तेथे ओळखीचे कुणी नसतांनाही काकूंनी ‘सनातन पंचांग’ आणि सनातनचे ग्रंथ यांचे वितरण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले.

२. ‘सेवा करण्यासाठी भ्रमणभाष कसा वापरायचा ?’, हे शिकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

३. साधकांना साधनेत साहाय्य करणे

त्या ‘साधकांना साधनेत साहाय्य कसे होईल ?’, असा विचार करतात आणि ‘त्यांचे कुठे चुकते ?’, हे सांगून त्यांना प्रेमाने साहाय्य करतात.

४. परिस्थिती स्वीकारणे

काही वर्षांपूर्वी काकूंच्या तरुण मुलाचे अपघाती निधन झाले, तसेच मुलीच्या घरी गेल्यावर ‘घरकाम आणि नातवंडांना सांभाळणे’, यांमुळे त्यांना सेवेला अधिक वेळ देता येत नसे. तेव्हा त्यांनी परिस्थितीला दोष न देता ती स्वीकारली. त्या वेळी त्यांचा ‘भगवंत माझे प्रारब्ध संपवत आहे’, असा भाव असायचा.

जीवनात संकटे येत असली, तरी त्यावर त्यांनी सकारात्मकतेने मात करून साधना चालूच ठेवली आहे.

५. काकू सतत भावजागृतीचे प्रयत्न आणि गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण करतात.

६. भाव

अ. काकूंचा आवाज मधुर आणि भावपूर्ण आहे. त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. काकू माझ्याशी भ्रमणभाषवर बोलत असतांना ‘मी भाववृद्धी सत्संगच ऐकत आहे’, असे मला वाटते आणि माझा गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होतो.

आ. काकूंना ‘त्यांचा प्रत्येक श्‍वास गुरुचरणी अर्पण व्हावा’, असे वाटते. ‘गुरुदेवांमुळेच माझा श्‍वास चालू आहे’, असे त्या सांगतात.

७. श्रद्धा

मध्यंतरी काकू आणि त्यांचे यजमान यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा काकू स्थिर होत्या. त्या काळात ‘गुरुदेव मला तारणारच आहेत’, या श्रद्धेने त्या नामजपादी उपाय आणि सेवाही करत असत.’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (२५.१०.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक