फटाके उडवतांना १३ जण घायाळ; लहान मुलांचा अधिक समावेश !
फटाके उडवल्याने पैशांची उधळपट्टी होऊन त्यासमवेत शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. फटाक्यांमुळे होणार्या जखमेच्या यातना आयुष्यभर भोगाव्या लागतात. ही स्थिती पहाता आणि राष्ट्र आर्थिक संकटात असल्याने नागरिकांनी फटाके उडवण्याचे टाळावे !
नागपूर – दिवाळीच्या कालावधीत शहराच्या विविध भागांत आगीच्या १० घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आगींवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली. या घटनांमध्ये प्राणहानी न झाली नाही. जरीपटका भागात फटाक्याचे दुकान असलेल्या इमारतीला आग लागल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली. यंदा आगीच्या घटनांमध्ये गेल्या ३ वर्षांपेक्षा वाढ झाली आहे.
‘आतषबाजीमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणातून कुणाच्याही आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी फटाके फोडणे टाळावे’, असे आवाहन येथील महापालिका प्रशासनासह पोलीस विभागाने केले होते; मात्र नियमांचे पालन न करता शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.
फटाके उडवतांना १३ जण घायाळ !
फटाक्यामुळे भाजणे वा अपघात यांमुळे अनुमाने १३ रुग्ण मेडिकल आणि मेयो या रुग्णालयांत घायाळ म्हणून नोंदवले गेले आहेत, तर खासगी रुग्णालयांतही अशा रुग्णांवर मोठ्या संख्येने उपचार झाले आहेत. फटाक्याने भाजलेल्या रुग्णांत निम्म्याहून अधिक लहान मुलांचा समावेश आहे.