ईश्वराप्रती भाव असलेल्या आणि साधनेची तळमळ असलेल्या इंग्लंड येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना ईश्वराची अमूल्य भेट

कु. ॲलिस स्वेरदा

रामनाथी (गोवा) – मायेची ओढ अल्प असलेली, ईश्वराप्रती भाव असलेली आणि तळमळीने झोकून देऊन सेवा करणारी इंग्लंड येथील कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) या साधिकेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, असे ६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगात घोषित करण्यात आले. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. देयान ग्लेश्चिच, साधक श्री. पीटर कॉर्नवेलिस आणि कु. ॲलिस स्वेरदा हे भारतातून काही काळासाठी मायदेशी जाणार असल्याने त्यांच्यासाठी समारोपीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पू. देयान ग्लेश्चिच यांनी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकून उपस्थित असलेल्या काही साधकांना पुष्कळ आनंद झाला, तर काही साधकांची भावजागृती झाली. या सत्संगाला एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले, पू. (सौ.) भावना शिंदे, पू. रेन्डी इकारान्तियो, पू. (सौ.) योया वाले, पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर आणि पू. देयान ग्लेश्चिच यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. देयान ग्लेश्चिच यांनी कु. ॲलिस यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. जगभरातील अनेक साधकांनी ‘ऑनलाईन’ स्वरूपात या सत्संगाचा लाभ घेतला.

कु. ॲलिस स्वेरदा यांना भेटवस्तू देऊन सत्कार करतांना पू. देयान ग्लेश्चिच

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांनी सांगितलेली कु. ॲलिस यांची गुणवैशिष्ट्ये

१. सद्गुरु सिरियाक वाले – कु. ॲलिसने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे तिला आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय गाठणे साध्य झाले आहे. आध्यात्मिक त्रास असूनही तिने एका वर्षात चिकाटीने प्रयत्न केले.

२. पू. (सौ.) योया सिरियाक वाले – कु. ॲलिसचे मन निर्मळ आहे. तिच्यात पुष्कळ भाव आहे. तिने काढलेल्या देवतेच्या चित्रांतून तिचा भाव दिसून येतो. तिने काढलेल्या देवतांच्या चित्रांत जिवंतपणा जाणवतो.

३. पू. (सौ.) भावना शिंदे – कु. ॲलिसची आध्यात्मिक प्रगती ही प.पू. गुरुदेवांच्या महानतेची साक्ष आहे. त्यांच्या कृपेमुळे कु. ॲलिसमध्ये एवढे परिवर्तन झाले. कधी कधी कु. ॲलिसला वाटायचे की, तिची आध्यात्मिक प्रगती कधी होणार नाही; परंतु आज प.पू. गुरुदेवांच्या कृपेने तिची आध्यात्मिक प्रगती झालेली आहे.

४. पू. देयान ग्लेश्चिच – कु. ॲलिस प्रतिदिन स्वयंसूचनांची १८ सत्रे करायची. व्यष्टी आढावा, विभागातील कार्यासंदर्भातील अभ्यासवर्ग येथे जे सांगितले जाते, त्याप्रमाणे ती कृती करते.

५. पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर – तळमळीने आणि भावपूर्ण साधनेचे प्रयत्न कसे करायचे ? याचा कु. ॲलिसने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

या वेळी कु. ॲलिस यांच्या सहसाधकांनीही त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

अध्यात्म संशोधन केंद्रात राहून साधना शिकण्याची संधी मिळाल्याविषयी कृतज्ञता ! – कु. ॲलिस यांनी व्यक्त केलेले मनोगत

‘‘मी मध्यंतरी काही कामांसाठी इंग्लंडला गेले होते, तेव्हा मायेतील लोक आणि साधक यांच्या रहाणीमानातील भेद लक्षात आला. साधकांच्या डोळ्यांत तेज जाणवते. मायेत रमलेल्या लोकांमध्ये ते तेज जाणवत नाही. तेव्हा मला कृतज्ञता वाटली की, मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अध्यात्म संशोधन केंद्रात राहून साधकांकडून साधना शिकण्याची संधी मिळाली. देवाची माझ्यावर अनंत कृपा आहे; कारण आध्यात्मिक त्रासामुळे मला महाप्रसाद ग्रहण करणे, कपडे धुणे हेही स्वतःचे स्वतः करणे जमत नव्हते. साधकांनी या काळात पुष्कळ साहाय्य केले. (हे सांगतांना कु. ॲलिस यांची पुष्कळ भावजागृती होत होती.) आश्रमात आणून देवाने मला जणू पुनर्जन्म दिला आहे. साधनेला आरंभ करण्यापूर्वी आध्यात्मिक त्रासामुळे शाळेत जाणेही मला शक्य व्हायचे नाही. स्वत:हून काहीच करायला जमायचे नाही; परंतु साधनेत आल्यामुळे स्वत:चे स्वत:ला करणे जमू लागले. मला एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांच्या मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता वाटते. मी पू. (सौ.) भावनाताईंचे चरण पहाते, तेव्हा श्रीकृष्णाच्या चरणांचे स्मरण होते. देव कसा दिसतो, हे संतांना पाहिल्यावर लक्षात येते’’, असे हृद्य मनोगत कु. ॲलिस यांनी व्यक्त केले.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक