‘मी प्रारब्धात असलेले कटू प्रसंग अनुभवत असतांनाच गुरुकृपेने साधनेत आल्यामुळे सारे सुसह्य झाले. गुरुमाऊलीने अनेक जणांच्या माध्यमातून साहाय्य करून मला पुढे-पुढे आणले. माझ्या व्यवहारातील अडचणी गुरुकृपेने आणि मी साधना करत असल्याने सुसह्य झाल्या. त्या संदर्भातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.
१. लहानपणापासून साधना आणि धर्माचरण करणे, तेव्हा चुकीच्या गोष्टी न पटणे आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन मिळणे
मला लहानपणापासून साधना, तसेच धर्माचरण करण्याची सवय होती; परंतु सभोवताली काही चुकीचे पाहिल्यावर ‘हे सर्व चुकीचे चालले आहे. हे काही योग्य नाही’, असे वाटायचे. त्यानंतर माझा सनातन संस्थेशी परिचय झाला. त्या वेळी कळले की, ‘मला जे चांगले वाटत नाही, ते ही संस्था करत नाही आणि मला ‘जसे व्हावे’, असे वाटते, त्या सर्व गोष्टी ही संस्था करत आहे.’ त्यामुळे मी साधनेकडे वळले.
२. लग्नानंतर घर सोडावे लागणे आणि अनेक अडचणी येऊनही देवाने सांभाळ करणे
लहानपणीच माझे लग्न होऊन मी मुंबईला आले. तिथे सकाळपासून डोक्यावर पदर (घुंघट) घेऊन देवाने माझ्याकडून घरच्यांची म्हणजे १० मासाची नणंद, सासू-सासरे आणि दिरांची २ मुले या सर्वांची सेवा सहजपणे करवून घेतली. एकदा रात्री दीड वाजता घरगुती भांडणातून आम्हाला घरातून बाहेर निघण्यास सांगितले. तेव्हा आम्ही पती-पत्नी पाऊस पडत असतांनाही घराबाहेर पडलो. आम्हाला बर्याच अडचणी आल्या. खायला अन्न नाही. अशा परिस्थितीत सर्व काळजी श्रीकृष्णाने घेतली. अशा अनेक प्रसंगामध्ये देवाने सर्व गोष्टी सुसह्य केल्या.
३. देवाने साधना होण्यासाठी सनातन संस्थेत आणणे आणि जीवनातील विविध कटू प्रसंगातून बाहेर काढणे
वर्ष २००२ पासून माझा सनातन संस्थेशी संपर्क आला. तेव्हापासून साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मला मार्गदर्शनाची दिशा मिळत गेली. त्या वेळी प्रसाराच्या सेवांमध्ये सहभागी होणे आणि सत्संगात रहाणे यांमुळे मला कृतज्ञता वाटायला लागली. देवाच्या कृपेमुळे मला विविध कटू प्रसंगांतून बााहेर पडता आले.
४. जीवनातील कटू प्रसंग आणि त्या वेळी ठेवलेला भाव
अ. अनेक वेळा माझे पती आजारी पडले. एकदा सत्संग झाल्यावर मी घरी आले. दार उघडताच ते बेशुद्ध झाले. त्यांना अतीदक्षता विभागात भरती केले. ७२ घंटे झाले, तरी ते शुद्धीतच आले नाहीत. दोन्ही मुली जवळ नव्हत्या. त्या वेळीही देवाने माझी साधना व्हावी; म्हणून यजमानांना जीवनदान दिले. त्यांची नोकरीही देवानेच टिकवून ठेवली.
आ. माझ्या एका मुलालाही त्रास होता. तो वयाच्या सातव्या वर्षी गेला. त्या वेळीही देवाने ‘भाव कसा असावा ?’, ते शिकवले. ‘देवाने या मुलाला केवळ ७ वर्षे सांभाळण्यासाठी माझ्याकडे दिले होते’, असा मी भाव ठेवला.
इ. मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मी भगवंताचे साहाय्य घेऊन शिवणकाम करू लागले. त्यानंतर मुलींच्या लग्नाच्या वेळीही देवाचे साहाय्य घेऊन केल्यामुळे मला ते अवघड वाटले नाही. सर्व सहजतेने घडत गेले.
ई. मुलांनी नोकरी करत शिक्षण घेतले. त्यांच्या विवाहाच्या प्रसंगीही कुणीच साहाय्याला नव्हते.
५. व्यावहारिक अडचणी असूनही गुरुदेवांच्या कृपेने त्यातून मार्ग निघणे
घरात व्यावहारिक अडचणी पुष्कळ होत्या. त्रासही होता, तरीही मला त्याची कधी भीती वाटली नाही. ‘मी त्यावर कशी मात करू ?’, असा मला प्रश्न पडल्यावर मी कुणालातरी विचारून घेत असे आणि तशी वागत असे. त्यामुळे पुढील मार्ग मिळत गेला. माझे पती अनेकदा मला म्हणत, ‘‘तुला घरखर्चासाठी पैसे देण्याची मला इच्छा नसते; परंतु मलाच कळत नाही की, मी कसे काय तुला पैसे देतो ?’’ हे ऐकल्यावर मी प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असे. ‘गुरुदेव, तुम्हीच माझा संसार चालवत आहात. ही लेकरे तुमचीच आहेत’, असा मी विचार करत असे.
६. साधकांना विचारून करणे आणि कशातही अडकून न रहाणे, यांमुळे पुढे पुढे जात रहाणे
माझ्याकडून अक्षम्य अशा अनेक चुका घडल्या, तरीही देवाने मला त्या सुधारण्यासाठी पुनःपुन्हा संधी दिली. तेव्हा ‘एक अनामिक शक्ती मला साहाय्य करते’, असे मला नेहमी वाटायचे आणि मला साहाय्यही मिळत गेले. मला नेहमी सत्संगात ठेवून देवाने संसारातील सर्व सांभाळले. मला प्रत्येक ठिकाणी सत्संग मिळत गेला. मी सत्संगात नेहमी इतरांना विचारून सर्व करत असे. काही वेळा साधकांच्या चुका पाहून मी विचार करत असे, ‘जाऊ दे. मला इतरांना नव्हे, तर स्वतःलाच पालटायचे आहे.’ असा विचार करून मी कशातही अडकून राहिले नाही. त्यामुळे सर्व ठीक होत गेले.
७. अनेक अनुभूती आल्याने देवाविषयी कृतज्ञता वाटणे
आता मी प्रत्येक कृती सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करते. मला सजीव-निर्जिव वस्तूंविषयी कृतज्ञताच वाटते. एकदा पुणे येथे सत्संग असतांना ‘प.पू. डॉक्टरांवर सूक्ष्मातून फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला आणि माझ्या मुलींना दिसले. मला आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करायची होती; पण माझ्याकडून तसे प्रयत्न झाले नाहीत. देवाने मला अनेक अनुभूती दिल्या. आता मी घरी राहूनही ‘पूर्णवेळ साधना करत आहे’, असा भाव ठेवते. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे मला गुरुदेवांच्या सदैव सहवासात रहाता येणे शक्य झाले. त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. गुरुदेवा, जेव्हा जेव्हा, जे जे आवश्यक आहे, त्या त्या वेळी, ते ते, आपण मला उपलब्ध करून देता आणि मला आनंद अनुभवायास देता, यासाठी कृतज्ञता व्यक्त करते.
८. परात्पर गुरुदेवांना भेटण्याची ओढ लागणे
आता प.पू. गुरुदेवांच्या कृपेने सारे काही व्यवस्थित आहे. मला गुरुदेवांना भेटण्याची पुष्कळ इच्छा होती; परंतु ते घडत नव्हते. त्या वेळी मी मनाची पुष्कळ समजूत घालत असे. ‘त्यांचे दर्शन झाले नाही, तरी ते सर्वत्र आहेत.’
९. गुरुतत्त्वाची अनुभूती येणे
‘मला रामनाथी आश्रमात जाता येणार’, हे कळल्यावर माझ्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. तेथील संतांचे मार्गदर्शन ऐकून वाटले, ‘गुरुतत्त्व सर्वत्र असते. गुरुदेव सर्वांना ज्ञान देतच असतात. जो सतर्कतेने ग्रहण करू शकतो, त्याला ते मिळते.’ त्यामुळे यात माझे मोठेपण नाही. भगवंत मला भरभरून देत आहे. मला जे आवश्यक असते, ते मला मिळते.
‘गुरुदेवा, ‘माझी साधना व्हावी’, याची तळमळ माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक आहे. तुम्हाला अपेक्षित असे विचार आणि कृती तुम्हीच करून घ्यावी’, अशी आपल्या श्रीचरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’
– सौ. सुधीरा नंदकुमार झा, पुणे (३०.४.२०१८)