जहाजावरील कारवाईच्या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप चालूच
मुंबई – आर्यन खान याला जहाजावर (‘क्रूझ’वर) बोलावण्यात आले होते. अभिनेते शाहरुख खान याच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी आर्यन याच्या अपहरणाचा डाव आखण्यात आला होता, असा आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. या सर्व प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहीत कम्बोज आहेत. अमली पदार्थांच्या माफियांना अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा खेळ वानखेडे खेळत आहेत, असाही गंभीर आरोप मलिक यांनी या वेळी केला.
मलिक पुढे म्हणाले, ‘‘प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान याला २ ऑक्टोबरला ‘क्रूझ’वर बोलावण्यात आले. मोहीत कम्बोज यांच्या भाच्याच्या माध्यमातून हे जाळे टाकण्यात आले. आर्यन याचे अपहरण करून २५ कोटी रुपये खंडणी मागण्याचा खेळ चालू झाला. प्रत्यक्ष व्यवहार मात्र १८ कोटी रुपयांत ठरला. त्यांतील ५० लाख रुपये उचललेही गेले होते; मात्र किरण गोसावी याने आर्यनसमवेत काढलेल्या ‘सेल्फी’मुळे खेळ बिघडला. मोहीत कम्बोज आणि समीर वानखेडे मित्र असून खंडणीच्या खेळात कम्बोज यांनी वानखेडे यांना सहकार्य केले.’’
नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – मोहित कम्बोज
माझ्यावर आरोप करून नवाब मलिक माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत; पण मी घाबरत नाही. नवाब मलिक यांच्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे, अशी चेतावणी मोहित कम्बोज यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. जहाजावरील अमली पदार्थांच्या मेजवानीचे मुख्य सूत्रधार मोहित कम्बोज असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्याला कम्बोज यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
या वेळी मोहित कम्बोज म्हणाले, ‘‘या प्रकरणी मागील मासापासून खोटी कथा सिद्ध करण्यात आली आहे. या प्रकरणाचे सूत्रधार सुनील पाटील असून त्यांची आणि नवाब मलिक यांची ओळख आहे. नवाब मलिक खोटे आरोप करत आहेत. आता त्यांचे खरे स्वरूप जनतेपुढे येईल.’’