फटाक्यांच्या दुकानांत अग्नीप्रतिबंधक उपाययोजना केल्या नसल्याचे उघड
सरकारी नियम डावलणार्या दुकानांना अनुमती मिळतेच कशी ? या अटी न पाळणारी दुकाने अवैधच म्हणावी लागतील. यास उत्तरदायी असणारे प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित दुकानदार यांच्यावर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे ! – संपादक
मुंबई – गेल्या २ वर्षांपेक्षा यंदाच्या दिवाळीच्या दिवसांत आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या ५ दिवसांत ५८ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. वर्ष २०२० मध्ये दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या ३५, तर वर्ष २०१९ मध्ये ४७ घटना घडल्या होत्या.
मुंबई शहर आणि उपनगरे येथे अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या भागांतील रस्ते, पदपथ, किंवा चौक येथे फटाक्यांची छोटी-मोठी दुकाने उभारण्यात आल्याचे आणि त्या ठिकाणी अग्नीप्रतिबंधक उपाययोजना केली गेली नसल्याचेही निदर्शनास आले. मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग चालू झाला होता. त्यामुळे त्यावर्षी दुर्घटनांचे प्रमाण न्यून होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे लोकांची गर्दी वाढली. यासह फटाक्यांची आतषबाजीही वाढली आणि फटाक्यांमुळे आगीच्या घटनांतही वाढ झाली.
मुंबई अग्नीशमन दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५ नोव्हेंबर या ५ दिवसांत फटाक्यांमुळे आग लागल्याच्या ५८ तक्रारी झाल्या, तर अन्य कारणांमुळे आग लागण्याचे १४० तक्रारी प्राप्त झाल्या.