तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. ३१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १६)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/523243.html

पू. डॉ. शिवकुमार ओझा

६९. तर्काची निरर्थकता

‘तर्क’ शब्दाचा शास्त्रीय अर्थ म्हणजे कापणे. जो कात्रीसारखे कापत जातो, त्याला ‘तर्क’ म्हटले जाते. आपल्या बुद्धीच्या कल्पनेला युक्तीने किंवा कुशलतेने मांडणे याला ‘ तर्क’ म्हटले जाते. तर्क केवळ प्रत्यक्ष आणि अनुमानापर्यंत (येथे ‘अनुमान प्रमाण’ अपेक्षित नसून ती मनाची केवळ कल्पना आहे) जाऊ शकतो.

तर्क निरर्थक असतो. त्यात स्थैर्य, दृढता इत्यादी नसते; कारण आपल्या मतावर ठाम असलेल्या एका व्यक्तीच्या तर्काला दुसरी व्यक्ती मानत नाही. त्यामध्ये दोष दाखवून दुसरी व्यक्ती आपला तर्क मांडते. या प्रक्रियेमुळे संबंधित गोष्टीविषयी निर्णय संदिग्ध रहातो. तो निश्चित होऊ शकत नाही.

मनुष्याच्या वासना (राग, द्वेष, ईर्ष्या, भय इत्यादी), संस्कार, अज्ञान, प्रलोभने, सामाजिक वातावरण, राजकीय हस्तक्षेप इत्यादींच्या प्रभावांमुळे तर्क मलीन असल्यामुळे सत्य निश्चित होऊ शकत नाही. केवळ तर्क करून पाण्यात पोहता येत नसते.

७०. शास्त्रानुकूल आणि श्रेष्ठ तर्काचे महत्त्व

तर्क नाही, तर शास्त्रानुकूल तर्काचे तात्पर्य हेच निर्णायक असते. शास्त्रानुकूल तर्क शास्त्रांद्वारे प्रतिपादित प्रमाणे आणि युक्तीवाद यांच्यावर आधारित केला जातो. हा तसाच प्रकार आहे.

आधुनिक न्यायालयांना सर्वसाधारण जनतेचा तर्क मान्य नसतो. केवळ अधिवक्त्यांद्वारे सादर केलेला तर्क मान्य होतो; कारण ते न्यायशास्त्रानुसार तर्क करतात. जो तर्क प्रमाणाच्या आधाराविना, केवळ आपल्या बुद्धीनुसार कल्पना करून मांडला जातो, असा शुष्क तर्क निर्णायक होत नाही. शास्त्रानुकूल तर्काचा तो अर्थ निश्चयासाठी साहाय्यक म्हणून निवडला जातो. त्यामुळे भारतीय ऋषींनी श्रेष्ठ तर्काला उपेक्षित न मानता त्याचे महत्त्व स्वीकारले आहे. मनुष्याची दैनंदिन कामे आणि व्यवहार यांसाठी तो तर्क उपयोगी पडतो.’

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/529180.html