तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. ७ नोव्हेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘तर्काची निरर्थकता’ आणि ‘शास्त्रानुकूल तर्काचे महत्त्व !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १७)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/524921.html

पू. डॉ. शिवकुमार ओझा

७१. शिक्षणप्रणाली निर्धारित करतांना व्यापक दृष्टीकोन आवश्यक !

७१ अ. आहार, निद्रा, भयापासून रक्षण आणि मैथुन या चार प्राथमिक आवश्यकतांच्या पूर्ततेसाठीच मनुष्य बुद्धीचा अधिक वापर करत असणे अन् त्यातूनच होणार्‍या पशू संस्कृतीच्या विकासातून कलह, तसेच वैमनस्य वाढणे : आधुनिक शिक्षणाचा दृष्टीकोन अतिशय संकुचित आणि सीमित असून तो केवळ मनुष्याच्या सहज नैसर्गिक प्रवृत्ती किंवा आवश्यकता/गरजा यांच्यावर आधारित आहे. मनुष्याला त्याच्या सहजप्रवृत्तीनुसार वाटत असते की, आहार (भोजन), निद्रा (आराम), भयापासून रक्षण आणि मैथुन या त्याच्या चार प्राथमिक आवश्यकता आहेत; परंतु मनुष्य आणि पशू या दोघांमध्ये त्या समान रूपाने विद्यमान आहेत. या आवश्यकतांची पूर्तता झाल्यावर मनुष्य अधिकाधिक प्रमाणात त्यांची पूर्तता करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करतो. आधुनिक मानवाच्या बुद्धीचा अधिकांश वेळ या चार आवश्यकतांची पूर्तता करण्यातच जात असतो. यासाठी तो अनुकूल शिक्षण प्राप्त करून किंवा प्रदान करून पशू संस्कृती विकसित अन् अलंकृत करण्याच्या मागे लागलेला असतो. हा दृष्टीकोन अत्यंत संकुचित असून एकांगीही आहे. त्यामुळेच आधुनिक मानव समाजात सर्वत्र कलह पसरलेला आहे. आंतरराष्ट्रीय वैमनस्य वाढत चालले आहे. मोठ-मोठी राष्ट्रे आपल्याला सर्वांत महान सिद्ध करण्यासाठी परस्परांशी संघर्ष करत आहेत. या सगळ्याचा अंत कुठेच दिसून येत नाही. परिस्थितीने अधिक विक्राळ स्वरूप धारण केले आहे. आधुनिक भौतिक पदार्थांप्रती आकर्षण आणि आसक्ती एवढी वाढली आहे की, मनुष्याला हेही समजेनासे झाले आहे की, व्यापक दृष्टीकोन काय असतो ? हे जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळही नाही आणि त्याला त्याची इच्छाही होत नाही.

७२. व्यापक दृष्टीकोनांवर आधारित असलेले शिक्षणच ‘सर्वोत्तम’ ठरते !

मनुष्याची जीवन जगण्याची पद्धत, तसेच शिक्षणप्रणाली यांत पूर्णत्व येण्यासाठी व्यापक (विशाल) दृष्टीकोन जाणून घेणे आणि तो आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे, उदा. जर पुराव्यानिशी हे सिद्ध झाले आहे की, मनुष्याचा पुनःपुन्हा विविध रूपांत जन्म होतो, मनुष्य पुढील जन्मात पशूसुद्धा होऊ शकतो आणि विविध प्रकारचे भयंकर भोग भोगत रहातो, तर मनुष्याला पुनर्जन्मापासून रोखण्याचे शिक्षण का दिले जाऊ नये ? कोणत्याही मनुष्याला पुनःपुन्हा दुःख यावे, अशी मुळीच इच्छा नसते; परंतु ते येतच रहाते. प्रत्येक मनुष्य सदैव सुखी राहू इच्छितो, अखंड आनंदाची इच्छा करतो. जर हे शक्य असेल (ज्याप्रमाणे भारतीय संस्कृती आणि तिची शिकवण विविध पुराव्यांनिशी हे सांगते), तर ते प्राप्त करण्याचे शिक्षण का दिले जाऊ नये ? मानवी जीवनाची ज्ञात-अज्ञात बंधने कोणती आहेत, याचे ज्ञान असायला पाहिजे. या बंधनांतून मुक्ती प्राप्त करण्याचे शिक्षण का दिले जाऊ नये ? हे सर्व प्रश्न, तसेच अन्यही अनेक प्रश्न या व्यापक दृष्टीकोनाच्या अंतर्गत येतात. जे व्यापक दृष्टीकोनावर आधारित असेल, तेच शिक्षण ‘सर्वोत्तम’ म्हणता येईल.’

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)