भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २४ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शिक्षणप्रणालीला प्रमाणांचा आधार असणे आवश्यक !’ याविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

(भाग १५)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/521404.html
पू. डॉ. शिवकुमार ओझा

६२. प्रमाणांच्या आधारामुळेच भारतीय संस्कृती सनातन, निश्चयात्मक बुद्धीवर आधारित, तसेच अद्वितीय आणि विलक्षण गुणांनी युक्त असणे

आप्त प्रमाणासंबंधीचे (शब्दप्रमाणासंबंधीचे) विशेष विचार संपूर्ण भारतीय संस्कृतीचे आधारभूत प्रमाण अर्थात् विशेष प्रमाण आहेत. प्रमाणांचा आधार असल्यामुळेच भारतीय संस्कृती सनातन, निश्चयात्मक बुद्धीवर आधारित, तसेच अद्वितीय आणि विलक्षण गुणांनी युक्त आहे. भारतीय संस्कृती आणि तिच्या द्वारे प्रतिपादित शिक्षणात आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व अधिक आहे.

६३. आप्त प्रमाण असणारे विचार स्वयंस्फूर्तीने ऋषींच्या बुद्धीमध्ये आपोआप प्रगट झालेले असणे

आप्त प्रमाणांना ‘अपौरुषेय’ म्हटले गेले आहे. मनुष्याने स्वतः त्या विचारांना निर्माण केले नाही, तर ते स्वयंस्फूर्तीने ऋषींच्या बुद्धीमध्ये आपोआप प्रगट झाले आहेत; पण सामान्यजनांना हे सत्य (तथ्य) समजणे कठीण होते, त्याविषयी विश्वास वाटत नाही आणि तो ते नाकारतो. व्यावहारिक मनुष्याच्या मनातसुद्धा पुष्कळ विचार आपोआपच येत असतात. मनुष्याच्या प्रयत्नांमुळे ते येत नाहीत.

६४. मनातील विचारांकडे लक्ष ठेवणे आणि त्यांचा उगम शोधणे हे कठीण असणे

आपण प्रथम मनात आलेल्या विचारांचेच काही वेळ निरीक्षण करूया. मन किंवा बुद्धी यांमध्ये येणार्‍या विचारांकडे लक्ष देऊन विचार करावा की, कोणत्या प्रकारचे विचार किंवा संकल्प-विकल्प आपल्या मनात येत आहेत ? या विचारांना रोखण्याचा, मन स्थिर करण्याचा किंवा ध्यान लावण्याचा प्रयत्न करा. हे ध्यान कोणतीही मूर्ती, चित्र, स्थान किंवा विचार यांचे असू शकते. तेव्हा लक्षात येईल की, ध्यान लावणे पुष्कळ कठीण होत आहे. मनही स्थिर होऊ शकत नाही किंवा काही क्षणांसाठी स्थिर रहाते; पण पुन्हा लगेचच ते इतर विचार ग्रहण करते. कोणता विचार कधी येईल, याचे आपल्याला ज्ञान नसते. ते विचार कोणत्याही पूर्वसूचनेविना येतातच. हे सर्व विचार मनात कुठून येतात आणि कुठे निघून जातात, याचीही जाणीव होत नाही.

कधी कधी असेही होते की, आपण कोणत्यातरी कार्यात व्यस्त असतो आणि आपले लक्ष त्या कार्यातच गुंतलेले असते; परंतु तरीही अन्य कुठला तरी विचार मनात अकस्मात् अनायासेच येतो.

६४ अ. स्वप्नाविषयीही मनुष्य अनभिज्ञ असणे : मनुष्याची प्रतिभा (Intution) सुद्धा कधी चमकून जाते किंवा ‘ती कधी जागृत होईल’, हे कुणीही सांगू शकत नाही. मनुष्याने रात्री झोपेत पाहिलेल्या स्वप्नांवर मनुष्याचा कसलाही अधिकार नसतो, स्वप्न कधी पडेल आणि कधी संपेल अन् ते स्वप्न कसे असेल, ते आधीच कुणीही जाणू शकत नाही.

६५. मनुष्य हा विचार किंवा दृश्य यांचा रचयिता नसणे आणि दोषरहित अंतःकरण असलेल्या मनुष्याच्या वचनावरच विश्वास ठेवला जाणे

या विभिन्न उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, मन किंवा बुद्धी यांमध्ये आलेले विचार किंवा दृश्य यांचा मनुष्य केवळ द्रष्टा असतो; पण तो रचयिता नसतो. मनुष्याच्या मनात व्यावहारिक विचारच येतात आणि आपोआप आलेले विचारही व्यावहारिक असतात. संसारिक मनुष्याच्या विचारांमधील दोष म्हणजे ते अंतःकरणातील (मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार) दोषांनी मलीन असतात, उदा. अज्ञान, अस्मिता, राग, द्वेष, लोभ, मोह, भय, तृष्णा, ईर्ष्या इत्यादी. ज्याचे अंतःकरण दोषरहित असते, त्याच मनुष्याच्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकतो.

६६. मनुष्य दैवी सत्तेशी कधी जोडला जातो ?

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना (मल, विक्षेप आणि आवरण) जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.

६७. दैवी सत्तेशी संबंध स्थापित झाल्यावर होणारे परिणाम

दैवी सत्तेशी संबंध स्थापित झाल्यावर विचारांचा प्रवाह आपोआपच होतो आणि ते विचार सत्य, सात्त्विक, निश्चयात्मक, दैवी संपदेने (सद्गुण) युक्त, अद्भुत (विलक्षण) आणि इंद्रियातीत असतात. अशा पुरुषाला (मनुष्याला) ‘आप्त पुरुष’ म्हटले जाते आणि त्याच्या कथनाला ‘आप्त-प्रमाण’ (किंवा ‘शब्द-प्रमाण’) म्हटले जाते. या विचारांना ‘अपौरुषेय’ (म्हणजेच कोणत्याही सांसारिक पुरुषाद्वारे बनवले नसलेले) असेही म्हटले गेले आहे; कारण हे विचार आपोआपच (स्वयंस्फूर्तीने) ऋषींच्या अंतःकरणात प्रकट झालेले आहेत. त्यांच्या परिश्रमाने झालेले नाहीत, हे सत्य स्वतः ऋषींनीही स्वीकारले आहे. त्यामुळे ऋषींना ‘मंत्रद्रष्टा’ असे म्हटले जाते. मंत्र रचणारे म्हटले जात नाही.

६८. वेदग्रंथ आणि भारतीय शिक्षणप्रणाली

समस्त वेदग्रंथ हे अपौरुषेय आणि आप्त प्रमाण आहेत. त्यांच्या आधारामुळे भारतीय संस्कृती अन् तिच्याद्वारे प्रतिपादित शिक्षणप्रणाली अन् तिचे स्वरूप निर्माण झाले आहे. ते विभिन्न प्रकारच्या श्रेष्ठ गुणांनी संपन्न झाले आहे. अशी ही संस्कृती शिक्षणाचा उद्देश अन् त्या उद्देशांच्या पूर्तीचा मार्ग सांगते.’

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/524921.html