प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा दिवाळीनिमित्त संदेश !
‘नरकचतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य दिवस ! भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य पराक्रमाच्या पूजनाचा हा दिवस ! मदोन्मत्त नरकासुराशी घनघोर युद्ध करून भगवंताने आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला त्याचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातील १६ सहस्र उपवर कन्यांची सुटका केली. या कृतीतून आतंकवाद कसा संपवायचा ? याची शिकवण भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण मानवजातीला दिली. अर्जुनालाही गीतेतून हीच शिकवण दिली. आज बहुसंख्य हिंदु समाज दिवाळी साजरी करतो; पण भगवान श्रीकृष्णाने दिलेली ही शिकवण विसरल्यामुळे तो तेजोहीन आणि दुर्बल बनला आहे. परिणामी जगभरात हिंदूंची दैन्यावस्था झाली असून ते अधर्मियांकडून मार खात आहेत.
नवरात्रोत्सवाच्या काळात बांगलादेशात घडलेल्या घटनेवरून वरील सूत्र ठळकपणे सिद्ध झाले आहे. हिंदु धर्माविषयी पराकोटीचा द्वेष भरलेल्या धर्मांधांनी अतिशय नियोजनबद्धरितीने दंगल घडवून हिंदूंना मारले आणि हिंदु देवतांची विटंबना केली. ही मानसिकता बाळगणार्या धर्मांधांपासून किमान स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तरी हिंदूंनी सिद्ध होणे अपेक्षित आहे.
हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यामुळे ते धर्मबांधवांच्या पाठीशी उभे रहात नाहीत !
२ मासांपूर्वी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील संघर्षामुळे जग थेट मुसलमान विरुद्ध ख्रिस्ती, अशा दोन गटांमध्ये विभागले गेल्याचे स्पष्टपणे समोर आले. ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या समर्थनार्थ बहुतांश इस्लामी राष्ट्रे एकत्र आली. अगदी भारतातील मुसलमानही हमासच्या पाठीशी उभे राहिले, तर इस्रायलच्या बाजूने ख्रिस्ती राष्ट्रे एकवटली. या वादात कुणीही निधर्मीपणा किंवा मानवतावाद यांचे गोडवे गायले नाहीत. याउलट हिंदूंची स्थिती बनली आहे. बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला आणि देवतांच्या मूर्तींचे भंजन करण्यात आले; मात्र तेथील अल्पसंख्य हिंदूंच्या पाठीशी कोणताही देश उभा राहिला नाही. काश्मीर सूत्रावरून कुणीही हिंदूंच्या पाठीशी उभे राहिले नाही आणि शाहीनबाग अन् शेतकरी आंदोलनांमध्ये हस्तक्षेप करून भारताला उपदेश देणारा मानवाधिकार आयोगही बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी उभा राहिला नाही. हे हिंदूंसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे.
बांगलादेशातील दंगलीचा निषेध करण्यासाठी ‘इस्कॉन’ने विविध देशांमध्ये शांततामय मार्गाने निषेध आंदोलन केले. त्याला जगातील कोणत्याच राष्ट्राने उघड पाठिंबा दिला नाही. केवळ ठराविक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘इस्कॉन’चे अनुयायी हेच या आंदोलनामध्ये दिसून आले. भारतातही ‘इस्कॉन’समवेत हिंदु जनजागृती समिती आणि ठराविक हिंदुत्वनिष्ठ संघटना वगळता तितकी एकजूट दिसली नाही. आपल्या धर्मबांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात साध्या शांततामय मार्गाने निषेध करण्यासाठीही हिंदू बाहेर येत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. यामागचे मूळ कारण म्हणजे ‘हिंदूंना स्वतःच्या धर्माविषयी असलेले अज्ञान !’ हे अज्ञान असण्यामागे ‘धर्मशिक्षणाचा अभाव’, हेच कारण आहे.
हिंदूंमध्ये तेज पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
हिंदु जनजागृती समिती प्रत्येक आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यात सहभागी होऊन हिंदूंवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवते. याचे कारण परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेले धर्मशिक्षण हेच आहे. त्यामुळेच समिती अडचणीच्या वेळी अन्य संघटनांच्या साधकांसमवेत कार्य करते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम् । (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.)’ ही भावना समितीमध्ये रुजवली आहे. हीच भावना प्रत्येक संप्रदाय आणि संघटना यांच्यात निर्माण होण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. सर्व संप्रदाय आणि संघटना यांनी त्यांच्या अनुयायांसाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन केले पाहिजे. या धर्मशिक्षण वर्गांतून हिंदूंना त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि उपासना शिकवली पाहिजे. त्याचप्रमाणे अन्य संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याविषयी जवळीक अन् प्रेम निर्माण केले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये एकजूट झाल्यास हिंदूंवर डोळे वटारण्याचे धाडस कुणीही करणार नाही.
आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत; परंतु इतक्या वर्षांत हिंदूंना धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करू शकलो नाही. ब्रिटीश काळापासून गांधीवादी उपनेत्रांतून (चष्म्यातून) शिकवल्या जाणार्या गीतेतील अर्धवट तत्त्वज्ञानामुळे हिंदू नपुंसक बनले असून त्यांच्यातील तेज हरपले आहे. हे तेज पुनर्स्थापित करण्यासाठी श्रीमद्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या रूपात अवतरित होऊन कार्य करत आहे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू केले पाहिजेत. हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे. या धर्मशिक्षण वर्गांमधून परात्पर गुरुदेवांनी दिलेल्या ज्ञानज्योतीने हिंदूंमधील ज्योत प्रज्वलित करून संपूर्ण विश्वालाच अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊया. यासाठी सर्व साधक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांना बळ प्राप्त होवो, हीच सच्चिदानंदस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी दिवाळीनिमित्त प्रार्थना !
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
आपले चरणसेवक,
प.पू. दास महाराज आणि पू.(सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, गौतमारण्य, पानवळ, बांदा, सिंधुदुर्ग (३१.१०.२०२१)