गोव्यातील राजकीय पर्यटन !

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?

गोव्यात निवडणुकीनंतर होऊ शकणारा घोडेबाजार पुन्हा लोकशाहीची शोकांतिकाच दर्शवेल !

गोव्यामध्ये मार्च २०२२ पूर्वी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आदी पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आम आदमी पक्ष अधिकच प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर बंगालमध्ये भाजपला पराभूत करणारी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पहिल्यांदा गोव्यात डाव खेळत आहे. भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्याचा दावा केला आहे, तर उर्वरित पक्ष ‘आपल्याला अधिक जागा कशा जिंकता येतील ?’, याचा विचार करत आहेत. त्यांना ठाऊक आहे की, आपल्याला पूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे; मात्र अधिक जागा मिळवून ‘किंगमेकर’ (निर्णायक होणे) होण्याचा प्रयत्न ते करत आहेत. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर निवडणुकीनंतर युती करून सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडे अधिक आमदार आहेत, असे पक्ष करतात; मागील निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा अल्प होऊनही त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली होती. भाजपने प्रारंभी मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली; पण नंतर मगोपच्या २ आमदारांसह काँग्रेसच्या १० फुटीर आमदारांनाही भाजपमध्ये घेतले आणि बहुमताचे सरकार स्थापन केले. मागच्या वेळी भाजपकडे अनुभवी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर होते. या वेळी त्यांच्यासारखी व्यक्ती भाजपकडे नाही, हे लक्षात घ्यायला हवे. गोव्याचा २ दशकांपूर्वीचा इतिहास पहाता गोव्यात फोडाफोडीचे राजकारण करून सरकार स्थापन करण्याचे अनेक प्रयत्न झाले. प्रत्येक ६ मासांनी गोव्यात नवीन सरकार आणि नवीन मुख्यमंत्री येत होते, हे भारतीय जनतेने पाहिले आहे. पर्रीकर प्रथम मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकार थांबला. आता हा प्रकार पुन्हा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांना संधी अल्पच !

भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड दिसत असल्याने निवडणूकपूर्व युती करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे दिसत आहे. मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनीही भाजपने त्यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे म्हटले आहे; मात्र १२ मतदारसंघ मगोपसाठी सोडल्यावरच युती करण्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. केवळ ४० मतदारसंघ असलेल्या गोवा विधानसभेसाठी १२ जागा सोडणे भाजपसाठी व्यवहार्य नसल्याने ही युती होणे कठीणच वाटते. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदाच गोव्यात पाय ठेवला आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केल्याने गोव्यातील काही अडगळीत पडलेल्या नेत्यांना आणि सत्तेची फळे चाखण्यास आसुसलेल्या काही पक्षांना तृणमूल काँग्रेस म्हणजे एक चालून आलेली संधी असल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर काही पक्ष युती करण्याच्या प्रयत्नांत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचीही भूमिका मांडली जात आहे. आम आदमी पक्षालाही ‘गोव्यात काही जागांवर विजय मिळवू’, अशी निश्चिती वाटत आहे. तृणमूल असो कि आम आदमी पक्ष, त्यांची धोरणे गोव्यातील हिंदु आणि ख्रिस्ती मतदारांना मान्य आहेत का ? हे पहाणे आवश्यक आहे. हे दोन्ही पक्ष गोव्याबाहेरील आहेत. त्यांचे नेते जरी स्थानिक असले, तरी पक्षांचा लगाम गोव्याबाहेर असणार आहे, हे स्पष्ट आहे. त्या तुलनेत भाजप राज्यातील कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा पक्ष आहे. त्याचे केंद्र देहलीत असले, तरी मनोहर पर्रीकर यांच्यामुळे केंद्राचा प्रभाव कधी दिसला नाही. भाजपचे नेते पंतप्रधान मोदी असल्याने गोव्यातील लोकांना त्यांच्याविषयी अधिक जवळीकता आहे. त्या तुलनेत आपचे केजरीवाल आणि तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्याविषयी गोमंतकियांना जवळीक वाटत नाही. त्यामुळे अशा पक्षांना गोमंतकीय किती साथ देतील ? हा प्रश्न आहे. बंगालमध्ये तृणमूलने भाजपला धूळ चारली असली, तरी तेथे मुसलमानांची मते निर्णायक ठरली होती, हे विसरता येणार नाही. तशी गोव्यात स्थिती नाही, हे लक्षात घ्यायला हवे. येथे मगोपसारखा जुना पक्ष आहे आणि त्यालाही ‘येत्या निवडणुकीत मागच्या तुलनेत अधिक जागा मिळतील’, अशी आशा आहे.

तृणमूलच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री यांनी गोव्याचा ४ दिवसांचा निवडणूक प्रचारपूर्व प्रसार दौरा केला. यात त्यांनी मंदिरात जाऊन देवतांचे दर्शनही घेतले. मंगेशी मंदिरात गेल्यावर त्यांना देण्यात आलेले तीर्थ त्यांनी प्राशन करण्याऐवजी सर्वत्र शिंपडले. ‘ज्यांना गोव्याची संस्कृती, हिंदु संस्कृती यांविषयी ज्ञान नाही, त्यांना गोव्यातील धार्मिक हिंदू कधीतरी मत देतील का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंदिरांपेक्षा चर्च आणि मशिदी अधिक प्रिय आहेत, असे आतापर्यंत दिसून आले आहे. श्रीराममंदिराविषयी त्यांनी ‘मशीद पाडून मंदिरे बांधणे अयोग्य आहे’, असे विधान केले होते. असे केजरीवाल गोव्यातील हिंदूंना कधीतरी मान्य असतील का ? गोव्यातील जनता धर्मप्रेमी आणि कला रसिक असण्यासह चांगली चिंतक आणि विवेकशील आहे. तृणमूलसारख्या हिंसाचारी आणि उथळ नेतृत्व असणार्‍या पक्षाला कधीही भीक घालणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येऊन केवळ राजकीय पर्यटन करून परत जावे, असे गोमंतकियांना वाटत असणार, यात शंका नाही.

घोडेबाजाराला लगाम घालणे आवश्यक !

निवडणूकपूर्व युती झाली नाही, तर निवडणुकीनंतर युती करण्याचा प्रयत्न होणार, हे १०० टक्के सत्य आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप अधिक प्रयत्न करत असणार, यात शंका नाही. त्यासाठी त्याला सध्यातरी मगोपच जवळचा पक्ष दिसत आहे. समजा हे शक्य झाले नाही, तर नेहमीप्रमाणे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. ही लोकशाहीची शोकांतिकाच झालेली आहे आणि त्याचा प्रयोग पुनःपुन्हा भारताच्या राजकीय मंचावर दिसत असतो.