तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी क्षेत्रातील प्राचीन मंकावती तीर्थकुंड स्वत:च्या नावावर करून हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध केल्याच्या प्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर या दिवशी जामीन संमत केला आहे. मंकावती तीर्थकुंड प्रकरणात सुनावणीअंती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख स्वाती लोंढे यांनी रोचकरी यांच्या नावाची नोंद रहित करत महाराष्ट्र सरकारची नोंद लावली आहे. या प्रकरणी अनेक कागदपत्रे पोलिसांनी अन्वेषणामध्ये हस्तगत केली आहेत, तसेच अनेक साक्षीदार हे सरकारी अधिकारी आहेत. रोचकरी यांच्यावर वैद्यकीय उपचाराविषयी कागदपत्रे न्यायालयात मांडल्याने त्यांना जामीन संमत झाला.
श्री तुळजाभवानी मंदिरासमोरील १ सहस्र २४४ चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई माहात्म्य आणि देवीविजय पुराणात आहे. देवानंद रोचकरी बंधूंना १८ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. २४ ऑगस्टपासून २ मास त्यांना धाराशिव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. मंकावती तीर्थकुंड प्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार चौकशीअंती गुन्हा नोंद करण्यात आला आहे.