हिंदूंच्या मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा आणावा ! – विहिंपची केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांच्याकडे मागणी

धर्मांतरविरोधी कायदा करण्याचीही मागणी

मुळात अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हिंदूहिताचे कायदे केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

नवी देहली – विश्‍व हिंदु परिषदेने केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांना हिंदूंची मंदिरे अन् धार्मिक संस्था यांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा करण्याची, तसेच धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी केली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी ही माहिती दिली.

आलोक कुमार पुढे म्हणाले की,

१. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराविषयी आलोक कुमार म्हणाले की, ही धर्मांतरे प्रलोभने, फसवणूक आणि भीती यांनी प्रेरित आहेत. विहिंप अशा धर्मांतरांचा पूर्ण शक्तीनिशी प्रतिकार करील आणि धर्मांतरित बंधू-भगिनींना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठीची मोहीम अधिक तीव्र करील.

२. उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांप्रमाणे तेलंगाणा सरकारनेही धर्मांतरविरोधी कायदा करावा. आम्ही केंद्र सरकारकडे धर्मांतरांविरुद्ध कायदा करण्याची मागणी केली आहे. त्याविषयी केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले असून ते त्यावर विचार करतील, अशी आशा आहे. मंदिर सरकारीकरण आणि धर्मांतर या दोन्ही सूत्रांवर विहिंप जनजागरण करणार आहे.

३. तेलंगाणामध्ये गोहत्येच्या घटना वाढत असल्याने तेथील सरकारने गायी आणि गोवंश यांच्या रक्षणासाठीही कायदे करावेत.