सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?
‘पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
(भाग १४)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/519513.html |
५९. आधुनिक प्रचलित शिक्षण हे नैसर्गिक मानवी इच्छा आणि वासना यांवर आधारित असल्यामुळे ते विभिन्न दोषांनी ग्रस्त असणे
मानवी इच्छेनुसार शिक्षणप्रणाली निश्चित होऊ शकत नाही. तेथे प्रत्यक्ष प्रमाणच हवे असते. आधुनिक प्रचलित शिक्षण हे नैसर्गिक मानवी इच्छा आणि वासना यांच्यावर आधारित असल्यामुळे ते विभिन्न दोषांनी ग्रस्त आहे. जे मनुष्याला भौतिक संपन्नता प्रदान करण्यासह दैवी संपदा (चारित्र्य निर्मिती) प्राप्त करून देऊ शकेल, मनुष्याच्या अंतर्निहित शक्तींना जागृत करेल, तसेच ज्यात कल्याणकारक ध्येयापर्यंत पोचवण्याचे सामर्थ्य असेल, असे शिक्षण आपल्याला आज हवे आहे.
६०. दैनंदिन जीवनात निश्चयात्मक बुद्धी अपरिहार्य असणे
दैनंदिन जीवन जगणे, ध्येयप्राप्ती करणे आणि शिक्षण घेणे यांसाठी निश्चयात्मक बुद्धी असणे अपरिहार्य आहे. मानवी बुद्धीच्या मर्यादा पहाता निश्चयात्मक बुद्धीच्या आधाराची आम्हाला आवश्यकता आहे. हा आधारच प्रमाण होऊ शकतो. प्रमाणांची आवश्यकता पहाता भारतीय संस्कृतीने पुराव्यांचे (प्रमाणांचे) संशोधन करून महर्षि गौतमप्रणीत ‘न्याय-दर्शन’ नामक ग्रंथ प्रस्तुत केला आहे.
६१. ‘प्रमाण’ म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती
‘प्रमाण’ या शब्दाचा अर्थ आहे, प्रमा (योग्य ज्ञाना) चे करण (साधन) म्हणजे ज्ञानासाठी ज्या साधनाची आवश्यकता असते, ते साधन म्हणजे प्रमाण होय. प्रमाण ही अशी शक्ती आहे की, जिच्याद्वारे अयोग्य किंवा संदेहात्मक ज्ञान, सत्य ज्ञानात परिवर्तित होते. ‘प्रमाण’ या शब्दाचा गूढ भावही आहे. परमात्मा स्वतः प्रमाण (ज्ञानाचे साधन) आहे; कारण समस्त ज्ञान परमात्म्यापासूनच प्राप्त होत असते. परमात्मा ज्ञानाचा स्रोत आहे. तेथूनच समस्त ज्ञान प्रवाहित होते.
६१ अ. प्रमाणांचे प्रकार : न्यायदर्शनाने प्रमाणांचे वर्गीकरण करून त्याचे चार प्रकार सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रत्यक्ष प्रमाण : ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त होणारे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण आहे.
२. अनुमान (Inference) प्रमाण : येथे ‘अनुमान’ या शब्दाचा अर्थ मानसिक कल्पना (Guess) नसून ते प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित दृढ सत्य आहे, उदा. दुरून धूर पाहून तेथे अग्नी असल्याचे अनुमान सत्य असते.
३. उपमान प्रमाण : जर कोणत्याही अदृष्ट (आतापर्यंत कधीच न पाहिलेली) वस्तूचे गुण अन्य मनुष्याद्वारे पाहिले गेलेले आणि सांगितले गेलेले असतात. ती वस्तू समोर आल्यानंतर तिच्या नावाचे जे ज्ञान होते, त्याचे साधन उपमान प्रमाण आहे.
४. आप्त प्रमाण (शब्द-प्रमाण) : आप्त-पुरुषा (साक्षातकृत धर्मा) चा उपदेश (कथन, शब्द) आप्त-प्रमाण किंवा शब्द-प्रमाण आहे. ‘आप्त’ पुरुषाने कोणताही पदार्थ साक्षात किंवा अपरोक्ष रूपाने अनुभवला असेल. वेद हे आप्तप्रमाण आहे.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)