संभाजीनगर येथे भांडण सोडवण्यास गेलेल्या ‘दामिनी’ पथकावरच २ तरुणींचे आक्रमण !

स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक

‘दामिनी’ पथक

संभाजीनगर – शहरात कुठेही महिलांच्या साहाय्यासाठी धावून जाणार्‍या ‘दामिनी’ पथकाला (महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी नियुक्त केलेले पथक) वेगळाच अनुभव आला. नेहरू उद्यान परिसरातील भांडण सोडवण्यास गेलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, ठाणे अंमलदार आशा गायकवाड आणि लता जाधव यांच्यावर भांडणार्‍या महिलांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केली. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ झाला. अखेर काही वेळानंतर पोलिसांचा आणखी फौजफाटा मागवून २ तरुणींना कह्यात घेण्यात आले. पोलिसांनी २ तरुणींवर गुन्हा नोंद केला असून यातील शुभांगी कारके या तरुणीला अटक केली आहे.

शहरातील नेहरू ते उद्यान हे महापालिकेचे असून तेथे एक सुरक्षारक्षक दाम्पत्य रहाते. उद्यानातील संपूर्ण सुरक्षेचे काम पहातात. २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शुभांगी कारके आणि एक अल्पवयीन तरुणी उद्यानातील माती घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना सुरक्षारक्षक दाम्पत्याने विरोध केला. त्यावरून तरुणींनी दाम्पत्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला दिली.