धगधगते त्रिपुरा !

संपादकीय

सत्ता जाऊनही काँग्रेसच्या हिंदुद्वेषी वृत्तीत फरक पडला नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

सध्या देशभर त्रिपुरा राज्यातील घडामोडींची चर्चा होत आहे. ‘ही चर्चा एकांगी आहे’, असे म्हणण्यास निश्चितच वाव आहे; कारण प्रसारमाध्यमे असोत वा राहुल गांधींसारखे लोकप्रतिनिधी असोत, हे सर्व जण हिंदूंच्या भूमिकेवर टीका करत सुटले आहेत. त्रिपुरामधील हिंसाचार थांबवण्याची मागणी करत आहेत. त्रिपुरासह संपूर्ण देशात शांतता नांदावी, अशी खरेच ज्यांची सद्भावना आहे, ते अशी एकांगी भूमिका मात्र नक्कीच घेणार नाहीत. परिस्थितीचे अवलोकन न करता निवळ हिंदूंना झोडपणे हा ज्याचा-त्याचा स्वार्थ आहे, मग तो टी.आर्.पी.साठी असो वा मतांसाठी ! या स्वार्थी भूमिकेत हिंदू मात्र भरडले जात आहेत. त्रिपुरा येथील स्थानिक हिंदूंचा उद्रेक का झाला? ते कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत ? याविषयी अन्यत्रच्या हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे. त्रिपुरामधील हिंदूंवरही आक्रमणे होत आहेत, ही वस्तूस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. असे झाल्यासच संपूर्ण भारतातील हिंदू संघटित होऊन स्वबांधवांच्या रक्षणासाठी सिद्ध होऊ शकणार आहेत.

हिंदूंची अपकीर्ती थांबवा !

बांगलादेशात नवरात्रीत हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांच्या विरोधात त्रिपुरामध्ये पडसाद उमटले, अशी चर्चा आहे. इथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीपासून आजतागायत तेथील हिंदूंवर भयंकर अत्याचार झाले. याविरोधात हिंदूंनी कधीच कुठले हिंसक कृत्य केल्याचे ऐकिवात नाही. त्रिपुराच्या जवळ असलेल्या बंगाल राज्यात धर्मांध दंगली घडवतात. त्यामुळे तेथील हिंदू असुरक्षित आहेत. हे आघातही त्रिपुरासह देशभरातील बहुतांश जन्महिंदू गप्प राहून सहन करतात. काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद होऊनही हिंदू शांत आहेत. हिंदूंना संरक्षण मिळेल, ते आश्वस्त होतील, अशी पोलिसांनी कधी भूमिका घेतलेली नाही. याउलट अनेक वेळा पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांनाच नाहक त्रास दिल्याचा अनुभव आहे. मोठ्या संख्येने आणि अमानुष पद्धतीने धर्मांधांकडून स्वबांधवांना (हिंदूंना) ठार मारले जात असेल, तर हिंदूंच्या मनात संताप उमटणार नाही का ? स्वधर्मातील माता-भगिनींवर क्रूरतेने अत्याचार केले जात असतांना हिंदूंचा उद्रेक होणार नाही का ? हिंसेचे समर्थन कुणीच करत नाही. लोकशाहीत न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यासह नागरिकांचे रक्षण करण्यासाठीही यंत्रणा आहे; मात्र ही यंत्रणा हिंदूंसाठी काहीच करत नाही, हे कळीचे सूत्र आहे. हिंदूंवरील आक्रमणे थांबल्यास हिंदू शांतच रहाणार आहेत; मात्र हिंदूंना नामशेष करेपर्यंत धर्मांध त्यांच्या हिंसक कारवाया चालूच ठेवणार आहेत, हे सत्य टीका करणार्‍यांनी लक्षात घ्यायला हवे. स्वतःवर, तसेच स्वबांधवांवर होणारे अत्याचार यांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षित भावनेतून हिंदू आक्रमक झाले आहेत, तर धर्मांध हे जिहादी मनोवृत्ती आणि हिंदुद्वेषी मानसिकता यांमुळे आक्रमक झाले आहेत. हा भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘हिंदू आक्रमक आहेत’, ‘ते हिंसक आहेत’, असे चित्र रंगवणे, ही बौद्धिक दिवाळखोरी होय.

सुंभ जळला तरी पीळ जात नाही !

त्रिपुरा येथील घटनेसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ‘त्रिपुरामधील मुसलमान बांधवांवर अत्याचार होत असतांना शासन आंधळे-बहिरे होण्याचे कधीपर्यंत नाटक करणार ?’, असे ट्वीट केले आहे. ‘हिंदूंची मते मिळवण्यासाठी हिंदूंविषयी कळवळा असल्याचे नाटक करणारे राहुल गांधी बर्‍याच दिवसांनंतर स्वत:च्या मूळ पदावर आले आणि त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन चालू केले’, असे यावरून म्हणता येईल. एरव्ही राहुल गांधींना हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील कवर्धा येथे धर्मांधांच्या उन्मत्तपणामुळे हिंदूंवर अन्याय झाला, तेव्हा राहुल गांधी गप्प होते. त्यांनी स्वपक्षातील छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली का ? याचे उत्तर राहुल गांधी यांनी आधी द्यायला हवे. काश्मीरमधील हिंदूंना ‘बांधव’ म्हणणार्‍या राहुल गांधींना मध्यंतरी काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या हत्या दिसल्या नाहीत. त्या वेळी धर्मांधांवर टीका करण्यात राहुल गांधी पुढे का आले नाहीत ? हे त्यांनी प्रथम सांगायला हवे. यावरून पीडित हिंदूंविषयी काँग्रेसला काही देणेघेणे नाही, हे स्पष्ट होते. भारतात धर्मांधता वाढण्यास एकप्रकारे काँग्रेसही कारणीभूत आहे. आता पुन्हा त्याच भूमिकेचे समर्थन करत रहाणे, हिंदूंवरील अत्याचारांकडे सोयीस्कर डोळेझाक करणे यांतून काँग्रेस तिच्या मूळ स्वरूपावरच ठाम आहे, हे लक्षात येते. ‘सुंभ जळला, तरी पीळ जात नाही’, असे म्हणतात, ते याच वृत्तीला ! सत्ता जाऊनही काँग्रेसच्या हिंदुद्वेषी आणि अल्पसंख्यांकधार्जिण्या वृत्तीत जराही फरक पडलेला नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! अशी काँग्रेस ही लोकशाहीला घातक आहे. भविष्यात मतपेटीद्वारे हिंदू काँग्रेसला प्रत्युत्तर देतील. त्यामुळे येणार्‍या काळात काँग्रेस नामशेष झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राची वैध मागणी करा !

केवळ इस्लामी राष्ट्रांमध्येच नव्हे, तर हिंदूबहुल भारतातही हिंदू असुरक्षित आहेत, हे लज्जास्पद होय ! धर्मांधांच्या वाढत्या अत्याचारांमुळे आज हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रक्षणकर्ते म्हणवणारे पोलीसही हिंदूंना संरक्षण देण्यात असमर्थ ठरले आहेत. अशा कठीण परिस्थितीत हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची वैध मागणी करणे हितावह आहे. हिंदु राष्ट्र हे हिंदूंचे सार्वभौमत्व जपणारे आणि सर्वार्थाने हित करणारे असेल, हे लक्षात घेऊन हिंदूंनी आता या मागणीसाठी जोर धरायला हवा. तसेच हिंदु राष्ट्रासंदर्भात अधिकाधिक जागृती करायला हवी. हिंदु राष्ट्राच्या मागणीस जनाधार वाढल्यास तिची पूर्तता करणे अपरिहार्य होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी आता स्वत:सह स्वधर्मातील बांधवांच्या रक्षणासाठी एकवटायला हवे !