हिंदूंनी यापुढील काळात दिवाळीसह प्रत्येकच सण ‘हलालमुक्त’ साजरा करावा ! – ओंकार शुक्ल, भाजप

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. संतोष देसाई, मध्यभागी श्री. मनोज खाडये आणि बोलतांना श्री. ओंकार शुक्ल

सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना राष्ट्रीय अधिकोष आणि टपाल विभाग हे शासनाचे अधिकृत आस्थापन सुरक्षित वाटते, त्याचप्रमाणे शासनाने अन्न व औषध प्रशासनाला दिलेले प्रमाणीकरण हेच सर्वोच्च आहे. अन्न आणि औषध यांच्या प्रमाणीकरणासाठी केंद्र अन् राज्य शासनाच्या वतीने अधिकृत असलेले कार्यालय जसे अन्न व औषध प्रशासनालय, भारत सरकारचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ असतांना स्वतंत्र हलाल प्रमाणपत्राची आवश्यकताच नाही. त्यामुळे हिंदूंनी यापुढील काळात दिवाळीसह प्रत्येकच सण ‘हलालमुक्त’ साजरा करावा, असे आवाहन ‘भाजप सांस्कृतिक आघाडी’चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी केले. ते सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय ?, त्याचे दुष्परिणाम काय ?,  समिती राबवत असलेली जनजागृती मोहीम यांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते.