देगलूर-बिलोली (जिल्हा नांदेड) विधानसभा पोटनिवडणूक
आतापर्यंत निवडणुकीत पैसे वाटले जात होते, वेगवेगळी आमीषे दाखवली जात होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी प्रचारसभेत किती खालच्या पातळीला जाऊन जनतेला आवाहन करू शकतात, हेच यातून दिसते. असे स्वार्थी लोकप्रतिनिधी विजयी झाल्यावर जनतेची विकासकामे कधीतरी करतील का ?
नांदेड – पंढरपूरमध्ये जी चूक मतदारराजाकडून घडली आहे, तशी चूक येथे घडू देऊ नका, अशी माझी येथील मतदारांना विनंती आहे. तुमचे मत मीठ-मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक एक कार्यालय ३० सहस्र कोटी रुपयांचे आहे. आता दिवाळी आहे. पैसे आले, तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके आणि फराळ घ्या. निवडणुकीत भाजपचा पैसा घ्यायचा; पण काँग्रेसला मतदान करायचे, असे आक्षेपार्ह आणि खालच्या दर्जाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी येथे केले आहे. जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका सभेत ते बोलत होते. (भरसभेत असे बोलायला अशा लोकप्रतिनिधींना काहीच कसे वाटत नाही ? अशा लोकप्रतिनिधींची स्वार्थी वृत्तीच यातून दिसते ! – संपादक)
या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर या दिवशी येथे मतदान होणार असून २ नोव्हेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ज्या गावात भाजपला एकूण मतदानाच्या ७० टक्के मते मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातले जाईल. त्यासमवेतच ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल, तेथील अध्यक्षांना विशेष पारितोषिकही दिले जाईल’, असे घोषित केले होते.