रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर साधिकेला ‘रामनाथी आश्रमात रामराज्याची स्थापना झाली आहे’, असे जाणवणे आणि साधनेचे प्रयत्न सहजतेने होणे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी वास्तव्याला आल्यावर साधिकेला ‘रामनाथी आश्रमात रामराज्याची स्थापना झाली आहे’, असे जाणवणे आणि साधनेचे प्रयत्न सहजतेने होणे !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘रामनाथी आश्रमात रामराज्याची स्थापना झाली आहे’, अशी अनुभूती येणे

भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने २४ ते २७.४.२०१९ या कालावधीत आम्हाला रामनाथी आश्रमात रहायला मिळाले. आश्रमात आल्यापासून सातत्याने प्रार्थना आणि नामजप होत असल्याने त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नव्हते. ‘रामनाथी आश्रमात रामराज्य स्थापन झाले आहे’, याची अनुभूती मला सतत येत होती.

२. मनात आलेला विचार काही वेळातच पूर्ण होत असल्याने तो देवाचा विचार असल्याचे जाणवणे

मनात एखादा विचार आला की, काही वेळातच तो पूर्ण होत होता. याचा अर्थ ‘तो विचार माझा नसून देवाचा आहे आणि त्याचा विचार असल्यामुळे तो लगेच पूर्ण होत आहे’, असे मला जाणवले.

३. आश्रमातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूप्रती कृतज्ञता वाटणे

आश्रमात आल्यापासून माझ्या मनातील कृतज्ञताभाव वाढून आश्रमातील सर्व सद्गुरु, संत, साधक, वस्तू, खोल्या, झाडे, फुले इतकेच नव्हे, तर हवा आणि पाणी या सर्वांप्रती कृतज्ञता वाटू लागली.

४. ध्यानमंदिर प्रकाशमान आणि तेजस्वी दिसणे अन् प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

२६.४.२०१९ या दिवशी सकाळी ध्यानमंदिरात आरतीला गेले असता माझ्याकडून श्रीकृष्णाला आपोआपच पुढील प्रार्थना झाली, ‘हे भगवंता, साक्षात् वैकुंठलोकी तू आम्हाला घेऊन आलास. मला तुझे अस्तित्व अनुभवता येऊ दे.’ त्यानंतर श्रीकृष्णाची आरती चालू झाल्यावर मी डोळे मिटले. तेव्हा मला ध्यानमंदिरात प्रकाश दिसत होता आणि परत डोळे उघडले की, ध्यानमंदिर अत्यंत तेजस्वी दिसत होते. सद्गुरूंची आरती चालू असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे बघून मी आरती म्हणत असतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांच्याऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. असे तीन वेळा झाले. हे सर्व अनुभवतांना माझी भावजागृती होत होती.

५. गुरुकृपा आणि आश्रमातील चैतन्य यांमुळे गुडघ्यांचा त्रास असतांनाही लागवड पहाता येणे

२७.४.२०१९ या दिवशी आम्हाला आश्रमाच्या मागील लागवडीचा परिसर दाखवला. मला उजव्या गुडघ्याचा तीव्र त्रास असल्याने (माझ्या उजव्या गुडघ्याची हाडांची रचना पालटली आहे.) माझ्यासाठी पायर्‍या चढणे त्रासदायक आहे; पण आश्रमातील चैतन्य आणि गुरुकृपा यांच्यामुळे मी लागवड परिसरात शेवटपर्यंत चढत जाऊ शकले. तेव्हा ‘चढण्याची आणि उतरण्याची शक्ती श्री गुरूंनीच दिली’, असे मला जाणवले.’

– सौ. वंदना संकपाळ, चिंचवड, पुणे. (२७.४.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक